Friday 29 December 2017

कुरुंजीतलं गमभन



कुरुंजीबद्दलच्या माझ्या अनुभवांची ही शेवटची पोस्ट. खरं तर मी एवढ्या चिकाटीनं लिहीन असं वाटलं नव्हतं. पण नवी उमेदमुळे हे शक्य झालं. आणि अशा सुसंगत लिहिण्यामुळं मलाच काही गोष्टी स्पष्ट दिसायला लागल्या. वाचणाऱ्या लोकांच्या प्रतिसादामुळं हुरूपही वाढला.
कुरुंजीला जायला लागून दोन वर्षं होऊन गेली. प्रत्येक आठवड्याला गेलेच, असं नाही.

आजारपणं, अती पाऊस, अती थंडी, घरातली कामं, कार्यक्रम अश्या कारणांमुळं अनियमितता आहे. पण जाण्याची ओढ असतेच. मुलांना मिस करते. मुलांची चांगली सवय झाली आहे. त्यांना पण माझी. तुम्ही शंभर दिवस जाऊ नका असं गौरव नेहमी सांगत असतो. मी घराचं दार उघडलं की एकेक जण यायला लागतो / लागते. सांगायला लागत नाही. माझ्या केसात हात फिरवत असे कसे तुमचे केस असं म्हणण्या इतपत लहान मुली जवळ आल्या आहेत. थोड्या मोठ्या मुला मुलींना शाळेत कॉलेजात घडलं ते सांगायचं असतं. मुलांसाठी माझं घर हक्काचं ठिकाण बनलंय.
भारतात असलेल्या अनेक बारीक खेड्यांसारखंच कुरुंजी हे एक खेडं. ना वाहनांची चांगली सोय ना आरोग्याची, ना भरपूर उत्पन्नाची शेती, ना जवळपास उपलब्ध रोजगार ! घरटी एक माणूस पैसे कमवण्यासाठी पुण्यात किंवा मुंबईत !
मुलं लहानपणापासूनच प्रत्यक्ष आयुष्यालाच भिडत असल्यामुळं एक प्रकारची हुशारी, चुणचुणीतपणा आहे, हातानं काम करायची सवय आहे. दुर्दैवानं या मुलांना शहरातल्या मुलांसारख्या अभ्यासाच्या सोयी नाहीत. आईवडिलांना पोट भरण्यामागे पळापळ करावी लागते, त्यामुळं मुलांकडे लक्ष देऊ शकत नाहीत. शहरापासून एकदम लांब असलेल्या शाळांचे जे प्रश्न असतात ते इथल्या शाळेचे पण आहेत. गाव इतकं लांब की एक दोन तासासाठी कुणी येणार असेल तरी अख्खा दिवस काढावा लागतो.
                                                                      अशा वेळी, गावात मुलांसाठी एक जागा असावी जिथं मुलं एकमेकांसोबत शिकतील. सुतारकाम, शिवणकाम, वेतकाम अश्या त्यांना माहीत असलेल्या गोष्टींच्या वर्कशॉपपासून सुरुवात करता येईल. त्यात इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर यासारख्या गोष्टी आणता येतील. मुलांना कॉम्प्युटरचं आकर्षण आहेच आणि त्यांना ते येणं गरजेचं आहे. कॉम्प्युटर शिकण्यासाठी कन्टेन्ट म्हणून त्यांचे या कामातले अनुभव वापरता येतील.

त्यातून खूप गोष्टी साध्य होतील. मुलं या वर्कशॉप मधून स्वतः झालेलं आकलन शब्दात मांडतील, त्या कामाचे फोटो काढून तेही कॉम्प्युटर मध्ये अपलोड करतील. अशी वेगवेगळी माध्यमं वापरायची सवय त्यांना होत राहील. आता जी त्यांचं जगणं आणि त्यांचं शिक्षण यात तफावत आहे ती यामुळं कमी होईल. मुलं वेगवेगळी स्किल्स शिकतील. यातून कुणाचे करियर उभे राहू शकेल.
सोबत मुलांना शालेय परीक्षा पास होण्यासाठी लागेल ती मदत करायची आहे. या बरोबरच आपल्या गावाचा इतिहास समजावून घेणं, पूर्वापार होत आलेला औषधी वनस्पतींचा आणि घरगुती औषधांचा वापर पुन्हा समजावून घेणं अश्या अनेक गोष्टी मुलांसोबत करायच्या आहेत. मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी / गावी नेऊन काही चांगल्या गोष्टी दाखवायच्या आहेत. गावात दहावीच्या आधी - नंतर शाळा सोडलेल्या मुली आहेत. त्यांना या कामात जोडून घ्यायचे आहे.
एक गोष्ट पहिल्यापासून ठरवली आहे. या कामात जागा खरेदी करणं, इमारती बांधणं अशा गोष्टीत गुंतायचं नाही. गावात गरज असेल त्या प्रमाणात काम असावं. गावातल्या मुलामुलींनी ते चालू ठेवावं. आजूबाजूच्या गावातली मुलं पण येऊ शकतील.
सुतारकाम तर सुरू केलं आहे. मुलांना कॅमेरा हाताळायला पण शिकवलंय. लवकरच शिलाई मशीन नेईन. आपल्या सविता दामले या मैत्रीणीनं त्यासाठी पैसे दिलेत. यासाठी गावातल्या मोठ्या मंडळींची साथ लागेलच. त्यांच्याशी संवाद वाढवायचा आहे. शहरी बाई, त्यात पुन्हा केस कापलेली, बांगडया कुंकू न बाळगणारी बाई बघून त्यांना बिचकायला होत असावं. आपल्या खेड्यातल्या लोकांबद्दल समजुती असतात तश्या त्यांच्याही शहरातल्या लोकांबद्दल असतात. त्यामुळं ही दरी भरून काढायची आहे.
या कामासाठी साधनांची गरज आहेच. सध्या मी माझ्या कुटुंबातलेच पैसे खर्च करते. पण ते पुरेसे नाहीत. या केंद्रात काम करणाऱ्या मुलांना काही मानधन द्यावेसं वाटतं. वस्तूखरेदी आहे, चांगले कॉम्प्युटर लागतील.
आम्ही Existential Knowledge Foundation ही संस्था स्थापन केली आहे. यात पालक, शिक्षकांसाठी कार्यशाळा घेतो, natural learning या विषयावर संशोधन सुरू आहे. कुरुंजीचं कामही या संस्थेचा भाग आहे. आम्ही सभासद वेगवेगळ्या पातळीवर काम करतो. कुरुंजीचं काम मी सुरू केल्यामुळं ही पूर्णपणे माझी जबाबदारी आहे.
या कामासाठी मदतीची गरज आहे. बिचाऱ्या गरीब मुलांना मदत असा विचार न करता साधनं सगळ्यांसाठी असतात. ती या मुलांपर्यंत पण पोचवूया अशा विचारानं मदत आली तर ते जास्त आवडेल!
  : रंजना बाजी

No comments:

Post a Comment