Friday 15 December 2017

शेतीची ‘विद्या’

विद्या रुद्राक्ष, राहणार डिघोळअंबा, ता.अंबाजोगाई, जि बीड. शिक्षण बीएस्सी, मायक्रोबायोलॉजी. २५ वर्षांपासून शेती करणार्‍या विद्याताई शेती परवडतच नाही असे म्हणणाऱ्यांसाठी आदर्श आहेत. उत्तम शेतीने त्यांनी स्वत:च्या कुटुंबाची उन्नती साधली आहेच. परिसरातील शेतकऱ्यांसाठीही त्या मार्गदर्शक ठरल्या आहेत. शिवाय, बचतगटांच्या सदस्यमहिलांना त्यांनी रोजगारही मिळवून दिला. विद्याताईंची यशकथा त्यांच्याच शब्दांत - “घरातल्या बायका म्हणजे, शेतीत राबवणारं हक्काचं मजूर.


शेतीच्या निर्णयप्रक्रियेत महिलांच स्थान नगण्यच! पण गुंतवणुकीच्या तुलनेत नफ्याचा विचार आणि काटकसर करणं, या बायकी स्वभावगुणांचा उपयोग शेतीत कधीच करुन घेतला नाही. अन् मी नेमकं हेच केलं. १९९३ साली मी १५ एकर शेतीची धुरा खांद्यावर घेतली. नोकरीनिमित्ताने कोकणात गेलेल्या पतीसोबत मीही गेले होते. पण तिथलं वातावरण न मानवल्याने दोन मुलांसह मी गावी परतले आणि शेतीत लक्ष घातलं. बेभरवशी पाऊस आणि तितकीच बेभरवशी भावाची हमी, त्यामुळे गुंतवणूक अधिकची होऊन फार तोटा पदरी पडू नये असं वाटायचं. गहू, ज्वारी, पिवळी ज्वारी, कार्‍हळ, तूर, मुग, उडीद या हंगामी पिकांसाठी सेंद्रीय शेतीचा पर्याय निवडला. सुरुवातीला गायी घेतल्या, विक्रीसाठी दूध आणि खतांसाठी शेण असा दुहेरी उद्देश! मग कंपोस्ट सुरु केलं. तेच खत शेतीसाठी वापरलं. शेणाचा आणखी उपयोग करुन घेत बायोगॅस केला. तो अजून सुरु आहे. त्यामुळे रासायनिक खतांच्या माऱ्याने शेतीच बिघडलेलं आरोग्य सुधारलं अन् खतांचा अवाढव्य खर्च कमी झाला. दुधाचे पैसे झाले अन् घरच्या गॅसचाही खर्च घटला!



सगळं व्यवस्थित जमण्यात अन् चुकांमधून शिकण्यात तीन वर्ष गेली. उत्पन्न घटलं. “बायकांनी ‘किचन बजेट’च पहावं, ‘शेतीच बजेट’ नाही. बायकांना शेतीतलं काय कळतं? आमच्या पिढ्यान् पिढ्या शेतीत गेल्या. आता बायकांकडून शेती शिकायची का?” असे टोमणे मिळायला लागले. पण पतीचा पाठींबा होता. ३ वर्षानंतर मात्र सुपरिणाम दिसू लागले. शेतीच्या झिरो बजेटकडे त्यांनी अधिक लक्ष दिलं. गांडूळ खत, कंपोस्टमुळे खतांचा खर्च कमी झाला, गायी होत्याच. त्यामुळे गोमुत्र आणि कडूनिंबाचा पाला यांचा कीटकनाशक म्हणून फवारणीसाठी उपयोग केला. बीजप्रक्रियेसाठी प्रभावी ठरणारं गोमुत्र वापरलं. पेरणीसाठी घरी तयार केलेलं बियाणं वापरलं. यामुळे शेतीचा खर्च निम्म्यावर आला. गुंतवणूक कमी झाल्याने एखाद्या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पन्न घटलं तरी फार तोटा झाला नाही. शिवाय, ज्या पिकांची विक्री होते, त्यांच्या काढणीनंतर उरलेला भाग जनवारांना चारा म्हणून आणि उर्वरित भाग कंपोस्टसाठी वापरता येतो अशाच पिकांना प्राधान्य दिलं. कारण, गाईंना चारा, कंपोस्टसाठी कच्चा माल, गोमूत्रापासून फवारणी, शेणापासून बायोगॅस अशी ही साखळी होती. पिकांमध्ये फेरपालट केला, मिश्रशेती केली, एकमेकांना पूरक पिकं घेतली. याचा फायदा झाला. मुरमाड जमिनीत गाळ टाकला, बांधावर लिंबाची झोड लावल्याने पक्षीथांबे झाले. हे पक्षी पिकांवरील किडे खाऊ लागले. विहिरीच्या मोजक्या पाण्यावर ठिबक, तुषारसिंचन करुन पिकं घेतली. विविध प्रयोग करताना २५० केशर आंबा लावला. परिसरात प्रसिद्ध झाल्याने बाहेर पाठवण्याऐवजी स्थानिक बाजारपेठेतच या अंब्याला मोठी मागणी आहे.
 “खंर मी शेतीतच रमले होते. पण २०१४ मध्ये बचतगटांचं ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन’ माझ्यासाठी एक टर्निंग पॉइंट ठरलं. मुंबईच्या या प्रदर्शनाने खूप शिकवलं. सभाधीटपणा, आपल्या उत्पादनांची बाजू पटवून सांगायची कला. १९९७ साली, पहिल्यांदा, आम्ही कल्पना चावला बचतगट सुरु केला. महिला सहकाऱ्यांना २ रुपये शेकडा, अशा अल्प व्याजदरात दिलेल्या कर्जाचा फायदा महिलांच्या कुटुंबांना झाला. कुणाच्या मुलाच्या शिक्षणाला, कुणाच्या मुलीच्या लग्नावेळी हे पैसे कामी आले. आज या गटाची उलाढाल सात लाखांवर आहे. पाच वर्षांपूर्वी दुसरा, सरोजनी नायडू बचतगट सुरु केला. यामध्ये ४० महिला आहेत. नव्या बचतगटाने अवघ्या एक रुपया शेकडा दराने कर्ज दिलं. याचीही उलाढाल ३ लाखांपर्यंत गेली. आमच्या बीड जिल्ह्याने चार वर्ष दुष्काळ सोसला. शेतीचं उत्पन्न नसल्यात जमा, हातालाही काम नाही, अशी स्थिती. अशा वेळी बचतगटांनी विविध उत्पादनं घेऊन प्रदर्शनात विक्री केली. अशी, महिलांनीच कुंटुंबं सावरली. तूर, मूग, हरभरा या डाळी प्रदर्शनात मांडल्या. सेंद्रीय उत्पादनं असल्याने प्रतिसाद मिळाला. पिवळी ज्वारी, गहू ज्वारी, काऱ्हळं यांचं पॅकींग करुन विक्री केली. सुरुवातीला शासनाच्या तेजस या ब्रॅण्डनावाने विक्री केली. आता रुद्राक्ष ऑरगॅनिक फुड हा स्वत:चाच ब्रॅण्ड तयार केला आहे.”
“२५ वर्षांपासून शेती करताना अजूनही मी थकले नाही. पहाटे चारपासूनच दिवस सुरु होतो. मागे वळून पाहताना सुखद अनुभव आहेत. मोठा मुलगा अविनाश कानपूर आयआयटीमध्ये शेवटच्या वर्षाला आहे. धाकटा आशुतोष अमरावतीमधून बीटेक झाला. तो नागपूरला एका नामांकित कंपनीत आहे. पतींने स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने सध्या दोघं मिळून शेती करतो. जमेल तसं इतरांना मार्गदर्शनही सुरुच आहे.
- अमोल मुळे.

No comments:

Post a Comment