Monday 11 December 2017

वेबमाध्यम आणि मुलांच्या मेंदूचा प्रतिसाद


या तंत्रज्ञानाच्या युगात मोठ्या होणार्‍या मुलांच्या संदर्भात काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या आहेत. आधीच विभक्त कुटुंब पद्धती, मुलांना खेळायला पुरेशी मोकळी जागा नसणं, अभ्यासाचं ओझं, यामुळे मुलांचं जग लहान होत चाललं आहे. त्यातून ते जर तंत्रज्ञानाने आणखीच आक्रसलं, तर? तर, एरवी सहजपणे शिकता येणारी काही मूलभूत कौशल्य त्यांना शिकता येणार नाहीत. उदाहरणार्थ, दुसर्‍यांशी संवाद, समोरच्या व्यक्तीचा चेहरा वाचून अंदाज घेणं, अशा प्रकारे अंदाज घेत आपण वागणं, टीमवर्क, स्वतः च्या आणि दुसऱ्या व्यक्तीच्या समस्या सोडवणं, या सर्व कौशल्यांमध्ये आजची मुलं मागे पडत आहेत, असं संशोधनातून समोर येत आहे. आज गॅझेट्सचा अतिवापर करणारी मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा इतरांशी जुळवून घेणं ही मूलभूत कौशल्य नसल्यामुळे त्यांना अडचणीचं ठरणार आहे. उद्याच्या प्रौढ समाजाबद्दल विचार करताना हे लक्षात नको का घ्यायला? गॅझेट्सना सुरक्षित अंतरावर ठेवणं म्हणूनच आवश्यक आहे.
आज मोठ्या असलेल्या माणसांवर ही तंत्रज्ञानाच्या अतिवापराचे परिणाम वेगवान आहेत. त्यांना त्यांचे ताणतणाव कमी करायचे असतात. तऱ्हेतऱ्हेची आव्हानं असतात, प्रत्येकाचे आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक प्रश्न असतात. या प्रश्नाशी झुंजण्यात दिवस जातो. हे सगळं विसरण्यासाठी माणसं स्वतःला रमवण्याचा प्रयत्न करतात. तरीही, काही जणांवर या गॅझेट्सचा घट्ट विळखा पडतोच.
मेंदूची क्षमता अफाट आहे. पूर्ण आयुष्यात आपण आपल्या मेंदूचा पुरेपूर वापर करू शकत नाही. मेंदू खूप सारी कौशल्य शिकू शकतो, हातांनी करण्याच्या गोष्टीसुद्धा अभिनव पद्धतीने करू शकतो, पण आपणच मेंदूला पुरेसं काम देत नाही, अशी आजची स्थिती आहे. क्षमता असताना मेंदूला काम दिलं नाही तर तो उलट क्रमाने उत्क्रांत होत जाणार की काय ? बापरे!
तसं नको व्हायला.
म्हणून मुलांना मोबाईल पासून दूर ठेवायचं असेल तर -
1. वेळेची मर्यादा पाळणं आवश्यक. ठराविक वेळेनंतर मोबाईल पाहायचाच नाही. यासाठी स्वतःशी किंवा मुलांशी कठोर वागावं लागेल.
2. मुलं-मुलं, मोठी माणसं एकत्र येतील, समोरासमोर बसून बोलतील याच्या संधी, निमित्त शोधून काढा.
3. मेंदूला चालना देणारे उपक्रम करा.
4. आनंदी संवेदना देणारं डोपामाईन द्रव्य मुलांना कोणकोणत्या कृतीतून मिळेल त्याची योजना करा.
 : डॉ. श्रुती पानसे

No comments:

Post a Comment