Friday 22 December 2017

मुलांनी सभोवतालातून स्वतःहून मिळवलेल्या ज्ञानावर विश्वास ठेवला म्हणून...

नाशिक इथली कुरुडगाव जिल्हा परिषद शाळा. बाहेरून पाहताना कुठल्याही सामान्य शाळेसारखी दिसणारी ही शाळा आत गेल्यानंतर मात्र वेगळीच आहे हे जाणवतं. सगळ्या शाळांमध्ये मुलं रांगेत बसतात, हा प्रकार इथं नव्हताच. मुलं मस्त वर्गाच्या भिंतीना टेकून बसली होती. मध्यभागी राहिलेल्या मोकळ्या जागेत फरशीवर अनेक तक्ते ऑईल पेंटने रंगविले होते. त्यात गणिती क्रियांसाठीचे रंगीबेरंगी फुलपाखरी तक्ते, आकड्यांची सापशिडी, भाषेचे खेळ, इंग्रजी रंगांची नावं असं बरंच काही होतं. मध्यभागी असलेल्या या मोठ्या मोकळ्या जागेत विद्यार्थी येऊन खडू हातात घेऊन स्वयंअध्ययन करीत होते.या शाळेचे मुख्याध्यापक अंबादास म्हस्के सांगतात, "आज माझी शाळा 100 टक्के प्रगत आहे, पण अगदी तीन वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. वर्गात काही विद्यार्थी हुशार असतात, काही मध्यम गुणवत्तेचे असतात आणि काहींच्या समोर डोकं फोडलं तरी ते शिकू शकत नाहीत अशी असंख्य शिक्षकांप्रमाणे माझीही प्रिय समजूत होती. पण 2015 मध्ये नाशिकच्या काही शिक्षकांनी कुमठे बीटला भेट दिली आणि आमचा शिकविण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला."






विचारप्रक्रियेत झालेल्या बदलाबद्दल ते म्हणाले, "ज्ञानरचनावादी- मुलांनी सभोवतालातून स्वतःहून मिळवलेल्या ज्ञानावर आधारित - शिक्षण देणारे संपूर्ण प्रगत बीट म्हणून कुमठे बीटची ख्याती होती. आमच्या गटाला बाहेरून सर्वसाधारण दिसणारी शाळा पाहणीसाठी मिळाली होती. माझ्या तर मनात येऊन गेले की, 'का आलो आपण ही शाळा पाहायला? यापेक्षा तर माझी शाळा चांगली आहे.' पण आम्ही आत गेलो आणि तिथल्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, संवादकौशल्य, हुशारी पाहून हा गैरसमज गळून पडला. तिथली मुलं चुटकीसरशी वजाबाकी, भागाकार अशा अवघड समजल्या जाणाऱ्या गणिती क्रिया करीत होती. 'रेन' हा एक शब्द दिल्यावर तिसरीतील मुलाने चक्क 28 इंग्रजी वाक्ये स्वत:हून घडाघडा बोलून दाखविली. पहिलीत दाखल झालेली मुलं जुलै महिन्यातच वाचन करीत होती आणि मग माझी खात्रीच पटली, गड्या आपलं चुकतंय!!"







"तिथून परत आल्यानंतर वर्गातील विद्यार्थी अप्रगत आहेत, कारण त्यांच्या घरी शैक्षणिक वातावरण नाही, त्यांना खोड्या करायलाच खूप आवडतं असे शिक्के मारणं, मी पूर्णपणे थांबवलं. शिक्षक म्हणून प्रत्येक मुलाला सर्वोत्तम शिकवणं आणि प्रगत करणं, हेच आपलं सर्वात महत्त्वाचं कर्तव्य आहे, याची नव्याने जाणीव झाली. मग शाळेत काही मूलभूत बदल करण्यास सुरुवात केली. सर्वात प्रथम मुलांशी संवाद वाढवला, प्रत्येक विद्यार्थ्याला 'तू शिकू शकतोस/ शकतेस' असा विश्वास बोलण्यातून देण्यास सुरुवात केली. आम्ही शाळेत कमीत कमी खर्चातील ज्ञानरचनावादी साहित्य तयार केले. मण्यांच्या माळा, लाकडी चमचे, शब्द- चित्र कार्ड, खोट्या चलनी नोटा असं बरंच साहित्य बनविलं. वर्गात ऑईल पेंटने विविध गणिती क्रियांचे तळफळे रंगवून घेतले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सतत समोर उभं राहून न शिकविता वर्गात मुलांच्या गटात जाऊन त्यांच्यासोबत बसून शिकवणं सुरु केलं." म्हस्के सर बदलाची प्रक्रिया सांगत होते.
- स्नेहल बनसोडे- शेलुडकर.

No comments:

Post a Comment