Monday 11 December 2017

सहजीवनाची आगळीवेगळी सुरूवात

लग्न म्हटलं की अहेर, भेटवस्तू, हार-तुरे, पुष्पगुच्छ, साड्या, दागिने, कपडेलत्ते आलंच. अलिकडे, देणं-घेणं टाळणं, अहेरही न घेणं, अगदी पुष्पगुच्छही नको, असं काही लग्नांत ठरवून केलं जातं. जालना इथल्या एका नवदांपत्याने लग्नात अहेर स्वीकारला नाहीच. अणि द्यायचंच असेल, तर शालेय मुलांसाठी पेन, वही, पुस्तकं हे शालेयसाहित्य द्या, असं आवाहन लग्नपत्रिकेतून केलं. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून, हजाराहून अधिक वह्या,पेनं वगैरे जमा झालं. या साहित्याचं वाटप लवकरच गरीब विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे. 
ऋषिकेश ढासाळकर हे जालनारहिवासी. ते मुंबईत शासकीय सेवेत वर्ग दोनचे अधिकारी. मुंबईत, मंत्रालयात न्याय व विधी विभागात वर्ग दोनच्या अधिकारी असलेल्या दीपाली जोशी यांच्याशी त्यांचा विवाह गेल्या महिन्यात जालन्यात झाला. नवदांपत्याने सहजीवनाची, सुखी संसाराची स्वप्न पहायची, हौसमौस करायची...सगळेच करतात. मात्र, सुशिक्षित सरकारी अधिकारी असलेल्या या दाम्पत्याने, आपल्या सहजीवनाची सुरुवात एका सत्कार्याने केली.
अहेरात भेटवस्तू, हारतुरे न घेता त्या ऐवजी गरीब मुलांना देण्यासाठी शैक्षणिक साहित्य स्वीकारावं, हे त्यांना सुचलं आणि त्यांनी ते अंमलात आणलं. आपल्या लग्नपत्रिकेवरच तशी विनंती करून हा विचार त्यांनी पसरवला. दोघांनी आपल्या सहजीवनाची सुरूवातच अशी आगळीवेगळी केली.
ऋषिकेश- दीपाली यांनी भेटवस्तूंवर होणारा खर्च टाळून मंगलप्रसंगी असं सामाजिक कर्तव्य केलं. हे खरोखरच प्रशंसनीय आणि अनुकरणीय आहे.
या दोघांना सगेसोयरे, मित्रमंडळी यांनी शुभेच्छा दिल्या,आशिर्वाद दिले.
उद्या हे शालेय साहित्य ज्या गरीब विद्यार्थ्यांना मिळेल आणि त्यांच्या चेहेऱ्यावर समाधान, हसू फुलेल, ते या नवदंपतीला लाखोगणती आशीर्वादापेक्षा भारी असेल. 
- अनंत साळी.

No comments:

Post a Comment