Tuesday 26 December 2017

आपल्या बाळांच्या डोळ्यांची इडापिडा टळो


“आमच्याकडे आणेपर्यंत बाळ ३-४ महिन्याचं झालं होतं. बाळाला डोळ्यात Retinopathy of prematurity (ROP) हा विकार उद्भवला होता. प्रोब्लेम चौथ्या स्टेजला पोचला होता. म्हणजे रेटीना जवळजवळ सुटा झाल्यात जमा असतो, आंधळेपणच आलेलं असतं. डॉक्टर प्रीतमनी बाळाच्या डोळ्यांचं ऑपेरेशन केलं. पण एक डोळा ते वाचवू शकले नाहीत. नॉर्मल दृष्टी घेऊन जन्माला आलेल्या बाळांना, योग्य त्या चाचण्या वेळीच केल्या गेल्या नाहीत तर उपचार होत नाहीत. आणि पुढे आयुष्यभरासाठी एक किंवा दोन्ही डोळे गमवायला लागतात.” अर्भकांना होणार्‍या डोळ्यांच्या विकाराविषयी डॉ. हेमालिनी सामंत सांगत होत्या. डॉ. प्रीतम आणि डॉ हेमालिनी सामंत दोघेही आठवड्यातून २-३ दिवस जेजे हॉस्पिटलमध्ये रुग्णांची विनामूल्य तपासणी करतात.


कोणत्या बाळांना डोळ्याच्या विकाराचा धोका असतो?
डॉ हेमालिनी सांगतात, “कृत्रीम गर्भधारणा तंत्राचा वापर करून जन्मलेल्या, अथवा अपूर्ण वेळेत जन्मलेल्या बाळांना या डोळ्यांच्या विकारांचा धोका असतो. गर्भवती स्त्रीने गर्भारपणात ड्रग्स घेतले असल्यास किंवा तिला ताप आल्यास, काही इन्फेक्शन झाल्यास किंवा ती एचआयव्ही पोझिटिव्ह असेल तरी. यासाठी गर्भारपणात अल्ट्रासाऊंड आणि टोर्च टायटर या चाचण्या करून गर्भाच्या निरोगी वाढीची खात्री करून घेणं आवश्यक असतं. काही समाजात एकाच कुटुंबात विवाह केले जातात. अशा कुटुंबात जन्मणार्‍या बाळांना आनुवंशिक आणि अन्य दोषांबरोबरच डोळ्यांचे दोष असण्याची शक्यता फार जास्त असते. काही वेळा अल्ट्रासाऊंड आणि टोर्च टायटर करूनही काही दोष जन्मापूर्वी समजू शकत नाही. उदा. बाय लेटरल कॅटेरेक्ट, Albinism, ROP हा अपूर्ण वेळेत जन्मलेल्या, कमी वजनाच्या अर्भकांमध्ये आढळून येणारा गंभीर, पण टाळता येण्याजोगा रोग. यासाठीच बाळाच्या जन्मानंतर ते नवजात बाळांसाठीच्या ICU मध्ये असेपर्यंतच्या काळातच त्याची डोळ्यांची तपासणी होणं जरुरी असते. बऱ्याच वेळा या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं किंवा याबद्दलची माहितीच नसते. बाळाला ROP असतो, तेव्हा पहिल्या किंवा दुसऱ्या अवस्थेत परीक्षण झाल्यास, उपचार करून बाळाची दृष्टी वाचवणं शक्य असतं. पण चौथ्या अवस्थेत रेटीना पूर्णपणे सुटलेला असतो. अणि काही मदत होणं जवळ जवळ अशक्य असतं. काही वेळा पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली असूनसुद्धा केवळ हॉस्पिटलमध्ये बाळाच्या डोळ्यांच्या तपासणीचा सक्तीचा कायदा नसल्यामुळे डोळे तपासले जात नाहीत. वेळीच तपासणी आणि उपचार न झाल्यामुळे दृष्टी गमावलेली कितीतरी बाळं आम्ही पाहातो. जेजे हॉस्पिटलमध्ये औषधोपचार कमीतकमी खर्चात किंवा विनामूल्य केला जातो.”
“आपल्याकडे, नवजात बाळाला लसीकरण केलं जातं, ज्या तपासण्या केल्या जातात, त्यात डोळ्यांसाठी असलेल्या तपासण्या सक्तीच्या नाहीत. त्यामुळे त्या सगळीकडे केल्या जात नाहीत. त्याची माहिती नसते. आणि महत्वही लोकांना कळत नाही. खरं तर अशा तपासण्यांची सक्ती आणि त्या करण्याची व्यवस्था सर्व प्रसुतीगृहांमध्ये होणं, फार गरजेचं आहे.” डॉक्टर हेमालिनी पोटतिडकीने सांगत होत्या.
बाहेरगावाहून येणाऱ्या रुग्णांसाठीही जेजेमध्ये व्यवस्था आहे. त्यांनी सांगितलं, “लातूर, औरंगाबाद आणि आसपासच्या गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातले प्रशिक्षित कर्मचारी, तिथल्या लोकांच्या डोळ्यांची प्राथमिक तपासणी करतात आणि गरजू रुग्णांना बसने जेजे हॉस्पिटलमध्ये पाठवतात.” दर सोमवारी, काही समाजसेवी संस्थांतर्फे, गरजू रुग्णांना आणलं जातं. इथे डॉ. तात्याराव लहाने (अलिकडे निवृत्त झाले), डॉ. रागिणी, डॉ. प्रीतम आणि डॉ हेमालिनी यांची सक्षम टीम या रुग्णांची मोफत तपासणी करते. त्यांच्या गरजेनुसार त्वरित उपचार केले जातात अथवा त्यांना एक निश्चित तारीख देऊन त्यांच्यावर उपचार केले जातात. “खर तर पूर्वी आम्ही शाळांमध्ये प्रबोधन करण्यासाठी शिबीरं घेत होतो. पण त्याला पालकांचा तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. मुलांपेक्षा पालकांचं प्रबोधन करण्याची जास्त गरज आहे. आणि जेव्हा जेव्हा बालरोगतज्ञांकडे लहान मुलं डीपीटी किंवा तत्सम प्रतिबंधक लस टोचण्यासाठी जातात तेव्हा त्यांना डोळे तपासून घेण्यासाठी मार्गदर्शन करणं फार गरजेचे आहे.”
जन्मजात अधू दृष्टी असलेल्या बालकांना १८ – १९ वर्ष पूर्ण होईपर्यंत चष्म्याचा नंबर घालवण्याचे, लेझर किंवा तत्सम उपाय करणं शक्य नसतं. कारण वाढत्या वयाबरोबर मुलांच्या डोळ्यांमधलं भिंग, पटल इ. सुद्धा वाढत असतं. पण निदान जे धोके किंवा आजार टाळणं शक्य आहे, त्यासाठी तरी बाळाच्या आई-बापांनी, कुटुंबियांनी सजग राहायला हवं. आणि शासनाने नवजात बाळांच्या डोळ्यांची तपासणी सक्तीची करणंही गरजेचं आहे.
- मनीषा बिडीकर.

No comments:

Post a Comment