Thursday 21 December 2017

कुरुंजीतलं गमभन

कुरुंजीतलं गमभन : रंजना बाजी
कुरुंजीत भाड्याने घर घेऊन राहायचं ठरल्यावर आम्ही कुरुंजीत घर शोधत फिरत होतो. एका घराच्या अंगणात तीन चार बायका गोधडी शिवत बसल्या होत्या.त्यातली एक पुढं येऊन म्हणाली, माझ्या मुलीचं हाये घर ! बघा. आम्ही बघितलं. गावाच्या साधारण मध्यभागी घर आणि समोर शेत. छानच होतं ते.
‘घराचं भाडं पाश्शेच हाये, मागं टॉयलिश बांधलंय त्याचं दोनशे जास्ती.’ या बोलीवर घर ठरलं आणि घर दाखवणाऱ्या सरुबाईबरोबर ओळख झाली आणि पुढे मैत्रीही.



सरुबाईला तीन मुली आणि एक मुलगा. दोन मुली लग्न झालेल्या, तिसरी नववीत शाळा सोडून घरी बसलेली सोळा सतरा वर्षांची एक मुलगी आणि आय टी आय झालेला पुण्यात नोकरी करणारा मुलगा. घरात म्हातारी सासू आणि नवरा.
कुरुंजीत स्वैपाकाचा घाट घालायचा नव्हता. त्यामुळे जाईन तेव्हा मी सरुबाईच्या घरी दोन्ही वेळा जेवते. त्यातून तिची माझी जास्त ओळख होत गेली.
सरुबाई म्हणजे मूर्तीमंत कष्ट आणि ग्रामीण निरागसता यांचं मिश्रण आहे. मळे गावातून, तीन किमी अंतरावरच्या कुरुंजीत ती लग्न करून आली. शाळेत न गेल्यामुळे लिहिता वाचता येत नाही. पण तिच्या परिघामध्ये त्याला महत्त्वही नसावं.
वर्षभर कोणत्या ना कोणत्या कामात ती व्यग्र असते. दिवसभर कष्ट करणं, घरी येऊन काम आणि झोपणं. तिचा कष्ट करण्याचा आवाका बघितला, की थक्क व्हायला होतं आणि त्याची अपरिहार्यता समजली, तर वाईटही वाटतं.
भाताच्या पावसाळी हंगामात ती इरलं घालून सकाळी बाहेर पडते, ते अंधारापर्यंत शेतात काम करत असते.


इतर अनेक जमीनधारकांसारखं तिचे पण वेगवेगळ्या ठिकाणी जमिनीचे तुकडे आहेत. एक माझ्या घरासमोर तर बाकीचे गावापासून पलिकडे. लावणीच्या काळात एका तुकड्यावर काम संपलं, की दुसरीकडे असं सतत सुरू असतं. त्या दिवसांत रात्रीच्या जेवणाला गेले, तर अत्यंत दमलेली सरुबाई खाटेवर पडलेली असते किंवा चुलीकडं पाय करून शेकत बसलेली असते. मी वाढून घेते, असं म्हटलं तरी ती लगबगीनं वाढायला येते.
लावणी, तण काढणं, भात कापणं, झोडणं, मळणी या सगळ्या गोष्टी सरुबाई नवऱ्याच्या बरोबरीनं करते. थंडीत, इतर गावकऱ्यांच्या बरोबर दिवसभर डोंगरावर गवत कापून भारे वाहून आणते. शेतात काम नसेल तेव्हा गावात किंवा आजूबाजूला कुठे काम असेल तर दिवसभर घर बांधंणं, मजुरी करणं, अशी कामं करून ती उत्पन्नात भर घालते.
सरुबाईंचे (त्यांच्या भाषेत मालक ) अण्णा हे उत्तम गृहस्थ. त्यांना कधी मी ओरडताना, भांडताना बघितलं नाही. गावात पण त्यांचं नाव चांगलं. दारू न पिणारा अत्यंत सज्जन माणूस!



सरुबाईचा नवऱ्यावर खूप जीव. बरेचसे नवरे बायकांना मारतात, आयमाय उद्धारतात, हे सांगताना सरुबाई अभिमानानं म्हणाली होती, आमच्या मालकानं कधी रागात माझ्या आईचं नाव काढलं नाही बघा ! जेवताना अण्णांच्या ताटात भरपूर भाजी, भात, वशाट वाढत तिचं प्रेम व्यक्त होत असतं.





सरुबाईची एक मुलगी खूप लांब राहते, असं तिनं सांगितलं होतं. कुठं लांब तर अकुर्डीला. पिंपरी चिंचवड भागात. ही मुलगी नंतर वेल्हे भागात सासरी राहायला आली. एके दिवशी संध्याकाळी सरुबाईच्या घरी गेले तर सरुबाई अत्यंत कासावीस होऊन बसली होती. ‘ पोरींना एकटं जायाला काय हुतं? बाप कश्याला लागतो सोडवायला?’ अशी बडबड सुरू होती. विचारल्यावर समजलं, की अण्णा सकाळी लेकीला सासरी सोडायला गेलेत. कुरुंजी ते हायवे, तिथून नसरापूर आणि तिथून तिचं गाव असा वेडावाकडा प्रवास होता. सरुबाईच्या दृष्टीनं प्रवास म्हणजे माणसानं सकाळी जाऊन अंधाराच्या आत परत आलं पाहिजे. अण्णांचा अजून पत्ता नव्हता. फोन लागत नव्हता. मुलीचं गाव दरीत असल्यामुळं रेंज नसायची. सरुबाईचा धीर सुटला होता. स्वतःच्या मुलीला ती बोल लावत होती. अन्नाला शिवायला पण तयार नव्हती. कशीबशी समजूत घालून, दटावून तिला जेवायला लावलं. दुसऱ्या दिवशी अण्णा सकाळी परतल्यावर तिचा जीव भांड्यात पडला.




सरुबाईच्या विश्वात इंग्रजी नाही. त्यामुळं तिचे शब्दप्रयोग कधी कधी मजेशीर असतात. गावात एक आज्जी खूपच आजारी होती. तिला काय झालंय असं विचारलं तर सरुबाई म्हणाली, तिचा डीपी लई हललाय. खूप विचार केल्यावर लक्षात आलं की त्या आज्जीचं बीपी वाढलं होतं.
अशी ही भाबडी,जीव लावणारी बाई. खूप दिवस नाही गेले तर गेल्यावर गालावरून हात फिरवणारी, खा, खा असा आग्रह करणारी, जत्रेच्या वेळेला लागतील म्हणून थोडे जास्त पैसे दिल्यावर मिठी मारत डोळ्यात पाणी आणणारी! 

No comments:

Post a Comment