Saturday 2 December 2017

आदिवासी वस्तीतील आदर्श शाळेचा वस्तुपाठ- टेंभेपाडा

सुजाण शिक्षक, जाणत्या शाळा :
टेंभेपाडा- धुळे जिल्ह्यातील 100 टक्के आदिवासी लोकवस्तीचं गाव. टेंभेपाडा जिल्हा परिषद शाळेने शिरपूर तालुक्यातील सर्व खाजगी आणि सरकारी शाळांना मागं टाकत सर्वप्रथम आयएसओ मानांकन मिळविलं आहे. शाळेची उत्तम रंगविलेली इमारत, अपंग विद्यार्थ्यांसाठी असलेला रॅम्प, प्रोजेक्टर असलेली डिजिटल क्लासरुम, हात धुण्यासाठी हँड वॉश स्टेशन, दर आठवड्याला स्वच्छ धुतली जाणारी पिण्याच्या पाण्याची टाकी आणि नानाविध उपक्रम राबविणारे तळमळीचे शिक्षक ही शाळेची काही प्रमुख वैशिष्ट्यं आणि याहीपेक्षा महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे गावातील पावरा आदिवासी समाजाचा शाळेच्या विकासात असलेला सक्रिय सहभाग.

मात्र काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली होती, वर्गात मुलांची उपस्थिती टिकवून ठेवणंही अवघड होतं. पण इथले मुख्याध्यापक, शिक्षक आणि धुळे DIECPD च्या प्राचार्या डॉ. विद्या पाटील मॅडम यांच्या एकत्रित प्रयत्नातून या शाळेने गरूडझेप घेतली. पाटील मॅडम यांनी गावात प्रेरणासभा घेऊन आदिवासींच्याच पावरी बोलीभाषेत त्यांच्याशी संवाद साधला. गावातील प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळायला हवं याचा आग्रह आणि शाळेच्या सुधारणेसाठी आर्थिक मदतीचं आवाहन त्यांनी केलं. गावकऱ्यांनी 35 हजार रुपयांची मदत शाळेला केली. त्यातून शाळेची रंगरंगोटी आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध झालं.                                                                     शिवाय या शाळेचे शिक्षक स्वत: दरवर्षी सुमारे 10 हजार रुपयांची वर्गणी गोळा करुन शाळेच्या विकासासाठी देतात. शिक्षक विद्यार्थ्यांच्या विकासासाठी धडपडत आहेत, हे ठाऊक असल्याने ग्रामपंचायतही शाळेच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. 'पेसा' (पंचायत एक्सटेंशन टू शेड्युल्ड एरिया अॅक्ट) योजनेअंतर्गत या शाळेला सुमारे 1 लाख 15 हजारांची देणगी मिळवून दिलेली आहे. शाळेने हा सर्व पैसा डिजिटल वर्गखोलीसाठी वापरला आहे. शाळेत प्रोजेक्टर, लॅपटॉप, इंटरनेट आहे. या आदिवासी गावातील मुलांना शाळेत बोक्या सातबंडे, तारे जमीं पर, ब्ल्यू तोता यासारखे चांगले चित्रपट आवर्जून दाखविले जातात. 

इतर ज्ञानरचनावादी शाळांप्रमाणे या शाळेतदेखील गणित- भाषेच्या मूलभूत संकल्पना तळफळे आणि शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने समजावून सांगण्यात येतात. तसंच या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षक आवर्जून आजूबाजूच्या शेतांमध्ये मशागत, पेरणी, खत आणि सिंचन, धान्याची मळणी- कापणी असे अन्ननिर्मितीचे वेगवेगळ्या टप्पे पाहण्यासाठी घेऊन जातात. शिवाय गावातील 'कुशल कारागिरांची भेट' असा एक वेगळा उपक्रमही घेतला जातो. यातंर्गत विद्यार्थी चर्मकार, लोहार, सुतार, कुंभार यांना भेट देऊन त्यांची कामं जाणून घेतात आणि प्रात्यक्षिकही करून पाहतात. बुद्धिकौशल्य आणि शारीरिक मेहनत, या दोहोंचाही आयुष्यात पुढे जाण्यासाठी उपयोग होतो, हे मुलांना कळावं म्हणून या भेटींचं आयोजन केलं जातं.
टेंभेपाड्याच्या शाळेत लिंगसमभावासाठी 'मीना- राजू मंच' कार्यरत असून त्यांचे अनेक उपक्रम नियमित घेतले जातात. शाळेतील विद्यार्थ्यांची आसनव्यवस्थाही नेहमीपेक्षा वेगळी आहे. या शाळेत मुले आणि मुलींची वेगवेगळी बैठकव्यवस्था नसून मुलगे आणि मुली एकत्र बसतात, एकत्रच गटात काम करतात. या शाळेत मातापालक आणि शिक्षकपालक सभांचं नियमित आयोजन केलं जातं. गावातील अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका शाळेत येऊन पौगंडावस्थेतील मुलांना आवश्यक मार्गदर्शन करतात. या शाळेतील विद्यार्थ्यांची नियमित वैद्यकीय चाचणीही होते आणि डॉक्टरांकडूनही 'वयात येताना' या विषयावरचं मार्गदर्शन मिळतं. 
- स्नेहल बनसोडे- शेलुडकर.

No comments:

Post a Comment