Sunday 17 December 2017

वेबमाध्यम आणि मुलांच्या मेंदूचा प्रतिसाद


"आजची तरुण पिढी सतत मोबाइल-सोशल मिडिया- इंटरनेटमध्ये गुंग असते." ही एक ठरलेली तक्रार. पण तरुण पिढीला नावं कशासाठी ठेवायची? लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण इंटरनेटने वेढलेले आहेत. काहींना कामासाठी, काहींना बिनकामाचं, काहींना खेळण्यासाठी, तर काहींना मित्र-मैत्रिणी गोळा करण्यासाठी. आपण आत्ता कुठे आहोत, काय करत आहोत, मनात कोणता विचार चालू आहे हे सगळं दुसऱ्याला सांगण्यासाठी इंटरनेट हवंच. असं, सतत गॅझेट्स वापरण्याचे मेंदूवर, मुलामणसांच्या क्षमतांवर काही परिणाम होत आहेत. त्याबद्दल काही निरीक्षणं, काही शंका, काही प्रश्न.
- इंटरनेट ऍडिक्शन डिसऑर्डर (IAD) हा आजार लोकांना होतो आहे.
- सायबर रिलेशनशिप ऍडिक्शन या नावाचा आजार होतो आहे. अशी मुलं सर्व वेळ आभासी मित्र-मैत्रिणींशी बोलत असतात, ते नवनवे आभासी मित्र-मैत्रिणी गोळा करत राहतात. त्यामुळे त्यांना खरोखरच्या मित्र-मैत्रिणींमध्ये फारसा रस उरत नाही. अशी मुलं प्रत्यक्ष भेटणं टाळतात. मोबाईल हातात घेऊन, एकमेकांना त्यातलं काही दाखवत गप्पा मारणं हे नेहमी दिसणारं दृष्य आहे.
- सायबर सेक्स ऍडिक्शन हाही प्रकार दिसून आला आहे. हाताशी सहज उपलब्ध असलेली अतिरेकी माहिती, चित्र, फोटो, व्हीडिओ, गोष्टी, विनोद याकडे एक चाळा म्हणून लोक वळतात. पुन्हा पुन्हा तेच तेच बघत राहतात. यातून मेंदूतली संबंधित क्षेत्र पुन्हा पुन्हा उद्दीपित होत राहतात.
- कारपेल टनेल सिंड्रोम - वजन वाढणं, डोळे कोरडे होणं, डोळ्यांवर आणि मानेवर ताण येणं. त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे.
- दीर्घकाळ लक्ष देऊन एखादं काम पूर्ण करणे हा प्रकार कदाचित कमी होण्याची शक्यता आहे. मुळातच अटेंशन स्पॅन कमी होतो आहे, त्यामुळे सराव करणं, पुन्हापुन्हा एखादी गोष्ट जमेपर्यंत सराव करणं ही गोष्ट कमी होईल. याचा परिणाम अभ्यासावर होतो आहे. वेळखाऊ पण आवश्यक कामं पूर्ण करण्यासाठी लागणार्‍या चिकाटीवर होऊ शकतो. संगीत कलेसाठी, वाद्यवादन यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी जो रियाझ लागतो, तो ही मुलं कसा करू शकतील?
एखाद्या विषयाच्या संशोधनासाठी वर्षानुवर्ष काम करावं लागतं. आजची पिढी ते करू शकेल का?
यावर उपाय काय?
ज्या मुलांसमोर खरोखर एखादी ध्येयासक्ती असेल, एखादी पॅशन असेल तर ती मुलं कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता पुढे जातातच. म्हणून आपल्या मुलांमध्ये अशी पॅशन निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
 : डॉ. श्रुती पानसे

No comments:

Post a Comment