
“मी अनाथ
आहे. आपल्याला पालक नाही याची खंत नेहमीच वाटत आली. पण ज्यांना पालक आहेत
अशी मंडळी केवळ कौटुंबिक वादामुळे घरातील मोठ्यांना बाहेरचा रस्ता दाखवतात,
त्यांची अवहेलना करतात. हे बघून मी अस्वस्थ होते. या व्यक्तींचं
मन:स्वास्थ्य हरवलेलं दिसतं. ते बघूनच त्यांच्यासाठी काही करता येईल का,
असा विचार सुरू झाला.” आणि यातूनच ‘मनोयात्री’चा प्रवास सुरू झाल्याचं
सुलक्षणा आहेर सांगते.
चार चौघांसारखं बालपण तिच्या वाट्याला आलं नाही. जेमते
म
१२ दिवसांची असतांना नाशिकच्या ‘आधार’ आश्रमात ती आली. आणि वयाची १८ वर्षे
पूर्ण होताच तिथून बाहेर पडली. या कालावधीत तिचा अमित वसंत यांच्या
‘माणुसकी’ व डॉ. भारत वाटवाणी यांच्या ‘श्रध्दा फाऊंडेशन’शी परिचय झाला.
एकीकडे ‘एकच धर्म मानव धर्म’ संस्थेच्या वतीने समाजातील अनाथ मुला
मुलींसाठी काम सुरू केलं. त्याचवेळी तिला रस्त्यावर चित्र विचित्र हावभाव
करत शिवीगाळ करणारे, वेळप्रसंगी अंगावर धावून येणारे मनोरूग्ण खुणावत होते.
त्यांच्यासाठी तिने आपल्या सहकाऱ्यांसमोर ‘मनोयात्री’ची संकल्पना मांडली.
हेतु हाच की त्यांच्यासाठी काही करता येईल का, त्यांना हक्काचा निवारा
मिळावा, त्यांच्या किमान मुलभूत गरजा पूर्ण व्हाव्या यासाठी त्यांना
हक्काचे घर मिळवून देणे. गेल्या काही महिन्यापासून सुलक्षणा व तिचे सहकारी
शहर परिसरातील उड्डाणपुलाखाली असलेल्या मनोरूग्ण स्त्री, पुरूषांना
शोधतात. त्यांच्याशी संवाद साधतात, त्यांना अन्न, वस्त्र पुरवितात.
पुरूषांची दाढी, केस कापणे यासह त्यांना अंघोळ घालणे तर स्त्रियांनाही
अंघोळ, त्यांचे केस कापणे, त्यांचं शरीर स्वच्छ करण्याचं काम ही टीम करते.
सुलक्षणा, रिकी धोंड, पुष्कराज मंडलीक, आनंद कवळे, संतोष वैद्य, सुरज धोंड
अशी मनोयात्रीची टीम.
त्यासाठी पाणी, न्हावी, आंघोळीचे सामान व अन्य
साहित्य जमवाजमव ते मनोरुग्ण मंडळी शोधणं हे काम ही मुलं उत्साहाने करत
आहेत. हे काम करत असतांना खुप विचित्र अनुभव आल्याचे ही मंडळी सांगतात.
केवळ घरातील अन्य सदस्यांशी पटले नाही, शारिरीक पंगुत्व यामुळे वृद्धांना
रस्त्यावर आणून टाकलं जातं. वृध्दांना घरी जायचं असतं, पण कुटुंब त्यांची
जबाबदारी नाकारत असल्याचा विचित्र अनुभव सुलक्षणा व तिचे सहकारी घेत आहे.
यातील एका प्रकरणात तिने पोलीसांची मदत घेत एका वृध्देला तिच्या हक्काच्या
घरात मानाचं स्थान मिळवून दिलं आहे. पण उर्वरीत लोकांचं काय ? या प्रश्नाने
ती अस्वस्थ होते.
सध्या एक जागा भाडेतत्त्वावर तिने घेतली आहे. या
ठिकाणी मनोरुग्णांना एकत्र करत त्यांना निवारा देण्याचा तिचा प्रयत्न आहे.
तसंच नगर किंवा कर्जत येथील सामाजिक संस्थामध्ये ती या मनोरुग्णांना दाखल
करत आहे. डॉ. वाटवाणी त्यांच्यावर उपचार करणार आहेत. तसेच जिल्हा
रुग्णालयाच्या मनोरूग्ण विभागाचं सहकार्य त्यांना मिळतं आहे. त्यामुळे
सुलक्षणा अन्य उपक्रमांची आखणीत गर्क आहे. मात्र असे रुग्ण परिसरात दिसूच
नये यासाठी कुटुंबातील अन्य सदस्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. मतभेद
बाजुला ठेवत ज्येष्ठांना सांभाळले नाही तर उद्याा ही परिस्थिती आपल्यावर
येऊ शकते ही भितीही सुलक्षणाने व्यक्त केली.
- प्राची उन्मेष.
No comments:
Post a Comment