Sunday 28 January 2018

अनाथ प्राण्यांची ‘सृष्टी’

"एकदा एक जखमी वानरी आमच्याकडे उपचारासाठी हाेती. सर्व शुश्रृषा करुन तिला जंगलात सोडलं. तर दुसऱ्या दिवशी ती दारात हजर. पुन्हा काही दिवस ठेऊन तिला जंगलात सोडलं. तरी दोन दिवसांनी ती प्रकल्पावर आलीच. शेवटी तिला ठेऊनच घेतलं. बसंती आता आमच्या कुटुंबाची सदस्यच झाली आहे. असाच प्रकार आखुड कानाच्या घुबडाच्या बाबतीत घडला. उपचारानंतर त्याला जंगलात सोडलं. त्यालाही आता तीन वर्ष झाली. तरी दरवर्षी हे घुबडं थेट प्रकल्पावर येेतं. हे विश्वास बसण्यासारखं नाही. मुके जीव असा लळा लावतात. माणसं विसरली, तरी प्राणी प्रेम विसरत नाहीत". ‘सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राच्या सृष्टी सोनावणे सांगत होत्या.



जस्त्र अजगर असो की आईपासून दुरावलेलं पाडस, देवीच्या आजाराने अंध झालेला मोर किंवा जखमी कोल्हा हे सगळे प्राणी एकत्र नांदताना पाहायला मिळाले, तर?
पाणी, भक्ष्य याच्या शोधात मानवी वस्तीत आल्याने जखमी झालेल्या आणि आईपासून दुरावून अनाथ झालेल्या वन्य जीवांची ‘सृष्टी’ म्हणजे तागडगाव (ता. शिरुर जि. बीड) येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र! सिद्धार्थ आणि सृष्टी सोनवणे या निसर्गप्रेमी दांपत्याने हे वन्य प्राण्यांचे अनाथालय उभं केलं आहे. 
सर्पमित्र असलेल्या सिद्धार्थ यांनी 2001 मध्ये ‘वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड सेक्युअरी असोसीएशन’ (WPSA) संस्था सुरु केली. साप पकडण्याची प्रशिक्षण कार्यशाळा घेताना त्यांची ओळख सृष्टीशी झाली. निसर्गप्रेमी असलेल्या दोघांचे बंध जुळले, 2010 साली. तेही अनोख्या पद्धतीने. हारांऐवजी एकमेकांच्या गळ्यात साप घालून आणि अक्षतांऐवजी वऱ्हाड्यांनी फेकलेल्या विविध झाडांच्या बियांचे आशीर्वाद घेऊन. सृष्टी सांगतात, “सर्पमित्र ओळख मिळाल्यावर परिसरात कुठंही साप निघाला की फोन येत आणि सिद्धार्थ ते पकडून त्यांना पुन्हा जंगलात सोडत.”



बीड जिल्ह्याने पाच वर्ष दुष्काळ सोसला. जंगलातील पाणीसाठे संपले. आणि वन्यप्राणी मानवी वस्तीत येऊ लागले. पाण्याच्या शोधात कोल्हा विहिरीत पडून जखमी होण्याच्या, हरिण रस्त्यावर आल्याने वाहनाच्या धडकेत जखमी होण्याच्या घटना वाढल्या. सिद्धार्थ म्हणाले, “अशा घटनांची माहिती लोक फोन करुन द्यायला लागले. या प्राण्यांनाही आम्ही घरी आणून त्यांच्यावर उपचार सुरु केले. यातूनच वन्यजीव पुनर्वसन केंद्र सुरु करायचं सुचलं. आणि 2012 मध्ये ते उभं राहिलं. आतापर्यंत माकड, मोर, उदमांजर, घोरपड, कोब्रा, अजगर, घुबड, गरुड, खोकड अशा अनेक प्राण्यांवर आम्ही प्रकल्पात उपचार केले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे या प्राण्यांची नोंद करुन पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार होतात. सर्पराज्ञी केंद्र आता जखमी प्राण्यांचे माहेरघर झालं आहे”. 
2013 च्या दुष्काळी परिस्थितीत ‘डब्लूपीएसए’ने ‘मूठभर धान्य पक्ष्यांसाठी, एक रुपया पाण्यासाठी’ हा उपक्रम राबवला. त्यातून 50 क्विंटल धान्य आणि 70 हजार रुपये जमा झाले. या निधीतून जिल्हाभरात 500 पाणवठे तयार केल्याचं सोनवणे सांगतात. तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी गारपीट झाली. त्यावेळी शेकडो पक्षी गारांच्या माऱ्याने जखमी झाले. त्यावेळी शक्य तितक्या पक्ष्यांवर सोनवणे दांपत्यांनी उपचार केले. संक्रांतीच्या काळातही मांजाने जखमी झालेले पक्षी सापडतात. कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय हे केंद्र सोनवणे दांपत्य चालवत आहे. वनविभाग आणि पशूवैद्यकीय विभागाचे अधिकारी या दांपत्याची धडपड पाहून प्राण्यांवर उपचार करतात. आजवर सिद्धार्थ यांची सापांवर दोन पुस्तके, एक माहितीपट प्रसिद्ध झाला आहे. 



सिद्धार्थ सोनवणे यांचा संपर्क क्र.: 9923688100

No comments:

Post a Comment