

डॉ. राजेश रेणुकादास चौधरी मानवत तालुक्यातील वांगी (थार) येथील मूळ रहिवासी. आयुर्वेदात एम.डी. झालेले. 2009 मध्ये कुष्ठरोग सहाय्यक संचालक पदावरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. तेव्हापासून ते गायींची सेवा करीत आहेत. विशेष म्हणजे एका खाजगी महाविद्यालयात शिकविण्यासाठी मिळणारं मानधन तसंच 30 एकर शेतीतून मिळणारं उत्पन्नही ते गोसेवेसाठीच वापरत आहेत.

घरी पूर्वापार गायींचा सांभाळ आणि आजोबांच्या पिढीपासून शेती. वांगी शिवारात असलेल्या 30 एकरावर निरनिराळी पिकं घेताना डॉ. चौधरी यांनी सेंद्रीय पद्धत अवलंबली. परभणीत दर गुरुवारी भरणार्या खंडोबा बाजारातून त्यांनी तब्बल 25 गायी कसायांच्या तावडीतून सोडवून घेतल्या. आजूबाजूचे शेतकरीही त्यांच्याकडे गायी आणून सोडतात. या गायींचा चारापाणी तसंच इतर व्यवस्था करण्यासाठी त्यांनी शेतामध्ये मोठा गोठा बांधला असून 5 माणसंही देखरेखीसाठी ठेवली आहेत. सुमारे 100 गायी आणि वासरं वांगी येथे शेतात असून परभणीतल्या घरी 13 गायी आहेत.
डॉ. चौधरी यांनी मुलीच्या वाढदिवसासाठी मोबाईल घेण्याकरीता तिला 8 हजार रुपये दिले होते. त्या दिवशी बाजारात पाहिलेली गाय विकत घेण्याचा विचार असूनही पैसे नसल्याने ते घरी परत आले. त्यावेळी मुलीने आपल्याकडीत पैसे देऊन ती गाय घरी आणण्यास सांगितलं. मुलानेही आपल्या वाढदिवसाला कोणतेही गिफ्ट न घेता गाय विकत घ्यायला लावली.
डॉ. चौधरी यांनी गोक्रांतीकारण गोपालमुनी महाराज लिखित 'धेनुमानस' या 700 पानी हिंदी ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला आहे. तसंच गोसेवा प्रदर्शन भरविण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला आहे. गोसेवा नावाचा ग्रंथही त्यांनी लिहिला आहे.
-बाळासाहेब काळे.
No comments:
Post a Comment