Friday 12 January 2018

थेंब थेंब मोलाचा, आयुष्याच्या तोलाचा!!

मी नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आसखेडा गावात कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. पावसाळ्यात खळाळून वाहणारं, सगळ्यांना आनंदी करणारं पाणी उन्हाळ्यात मात्र डोळ्यात पाणी आणतं. 2016 सालच्या उन्हाळ्यात तर मराठवाड्यातील लातूरसारख्या जिल्ह्याला चक्क रेल्वेने पाणी पुरवावं लागलं. पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा आहे आणि त्याचं योग्य नियोजन करणं अत्यावश्यक आहे. ही जाणीव सर्व नागरिकांमध्ये आणि प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये बिंबवणं गरजेचं वाटल्याने, गेली काही वर्षे मी आमच्या शाळेत पाणीबचतीचे काही प्रयोग केले.
त्यातला पहिला प्रयोग आहे तो घरगुती नळांच्या गळतीतून वाया जाणारं पाणी वाचविण्याचा. घरातील नळाला भरपूर पाणी असलं की ते गरजेपेक्षा जास्त वापरण्याकडे लोकांचा कल असतो. शिवाय अनेकदा नळ नीट बंद न करणं, नळ गळत असेल तर तो वेळीच दुरुस्त न करुन घेणं या सवयी लोकांमधे रुजलेल्या असतात. अशी गळती वरवर पाहता छोटीशी वाटत असली तरी महिने आणि वर्षाच्या पटीत हिशोब केला तर कित्येक लीटर पाणी वाया जात असतं. ही गळती विद्यार्थ्यांना सप्रमाण सिद्ध करुन दाखवावी, असं माझ्या मनात आलं.
त्यानुसार जुलै 2013 मध्ये प्रथम शाळेतच हा प्रयोग आम्ही करुन पाहिला. शाळेच्या टाकीचे सुमारे 20 नळ आहेत. प्रत्येक गळणाऱ्या नळाखाली विद्यार्थ्यांना रिकामं चंचुपात्र ठेवायला सांगितलं. एका तासानंतर किती पाणी गळालं ते मोजलं आणि त्यानुसार दिवसभरात शाळेच्या नळांमधून किती पाणी गळतं, याचा हिशोब विद्यार्थ्यांना करायला लावला. तोच हिशोब पुढे नेत विद्यार्थ्यांनी महिन्याभरात 576 लीटर पाणी गळतं हा अंदाज काढला. आपल्या शाळेत एवढं प्रचंड पाणी गळतं, याची कोणालाच कल्पना नव्हती. पाणी बचतीचं महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितलंच शिवाय शाळा प्रशासनाकडून नळ दुरुस्त करुन घेतले.
त्यानंतर हाच प्रयोग आमच्या आसखेडा गावातील निवडक 25 कुटुंबावरही करुन पाहायचं विद्यार्थ्यांनी ठरविलं. विद्यार्थ्यांच्या टीम प्रत्येक घरी गेल्या. तिथंही शाळेप्रमाणेच गळक्या नळाखाली एक तासभर चंचुपात्र ठेवून पाण्याची गळती मोजली. त्यानुसार महिन्याभरात केवळ या 25 कुटुंबामधूनच 2721 लीटर इतकी प्रचंड पाणीगळती होत असल्याचं आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केलं. हा आकडा ग्रामस्थांसाठीही धक्कादायक होता. त्यानंतर शाळेने महिनाभर ही पाणीगळती टाळण्यासाठी नळ दुरुस्त करण्याचे तसेच चांगल्या प्रतीचे नळ बसविण्याबाबतची जनजागृती विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केली. मुलांनी प्रभातफेरी काढून घोषणा दिल्या, छोटी नाटुकली करुन जनजागृती केली.
हाच प्रयोग पुन्हा ऑगस्ट 2013 च्या शेवटच्या आठवड्यात 25 कुटुंबासमवेत केला. यावेळी पाणीगळतीचे प्रमाण परिणामकारकपणे घटलेलं दिसलं. आता महिन्याला 655 लीटर पाणीगळती होत असल्याचं आकडेवारीतून पुढं आलं. ही गळतीसुद्धा पूर्णपणे थांबावी याकरिता विद्यार्थी आणि शाळेने पुन्हा प्रयत्न केले. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायतीची जी सार्वजनिक नळ योजना होती, त्यातील काही नळांना तोट्याच नव्हत्या. ग्रामस्थांनी हा विषय ग्रामसभेत लावून धरला आणि रातोरात नळांची दुरुस्ती करुन तोट्या लावण्यास भाग पाडले. हा आमच्या जनजागृतीचा सुखद विजय होता.


- जयवंत ठाकरे.

No comments:

Post a Comment