Friday 5 January 2018

इथं मिळतं हसतखेळत शिक्षण

निफाडमधील कोठुरे फाट्याची शाळा आधी वस्तीशाळा होती. या शाळेत सध्या कार्यरत असलेल्या रामदास चोभे सरांच्या वडिलांनी स्वत:ची पाच गुंठे जमीन शाळेला दान केली आणि इथं नियमित जिल्हा परिषद शाळा सुरु झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका आरती बैरागी तीन वर्षांपूर्वी या शाळेत रुजू झाल्या आणि शाळेचं रुप हळूहळू इतकं पालटलं की 2015 साली या शाळेला आयएसओ मानांकन मिळालं.
सुरुवातीपासून बैरागी मॅडम आणि चोभे सरांनी हसत- खेळत, शैक्षणिक साहित्याचा आधार घेत शिकवणं चालू केलं. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्वत:च्या मुलांनाही याच शाळेत दाखल केलं. वारंवार पालकांशी संवाद साधून शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळतं हे पटवून दिलं. या शाळेने पालक तसेच ग्रामपंचायतीकडून सुमारे अडीच लाखांचा निधी उभारला आहे. त्यात स्वत:ची भर टाकून शिक्षकांनी जमा झालेल्या निधीतून शाळेची रंगरंगोटी, तळफळे, इंग्रजी- मराठी शब्द, तसेच गणिती क्रियांचे आरेखन, स्वच्छतागृहासाठी पाण्याची सोय, पाईपलाईन, अॅक्वागार्ड इ. कामं केली आहेत.
गेल्या वर्षी इंग्रजी माध्यमातील 11 मुलं कोठुरे फाट्याच्या शाळेत दाखल झाली आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांवर शिक्षक विशेष मेहनत घेत आहेत. काही शब्द दिले असता त्यावरून विद्यार्थी गोष्ट आणि कविता तयार करतात. उदा. कावळा- आवळा- सावळा- बावळा हे शब्द दिले असता विद्यार्थी खालीलप्रमाणे शीघ्रकविता तयार करतात.
'एक होता कावळा, दिसायचा सावळा|
होता जरा बावळा, पण खायचा तो आवळा||'
दुसरीकडे निफाडमधील सुंदरपूरच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची हुशारी पाहून चकित व्हायला होतं. या शाळेतील विद्यार्थ्यांचा भूगोल, इतिहास आणि इंग्रजी विषय मुळापासून पक्का करण्याचं संतोष मेमाणे सरांनी ठरविलं आहे. या शाळेतील तिसरी- चौथीचे विद्यार्थी उत्तम नकाशावाचन करतात. सरांनी कार्डबोर्डचा महाराष्ट्राचा नकाशा आणि कार्डबोर्डच्या छोट्या तुकड्यांवर जिल्हे, राज्यातील महत्त्वाच्या नद्या, शिखरं इ.ची नावं टाकली आहेत. विद्यार्थी नकाशावर प्रत्येक जिल्हा बरोबर लावतात. इतकेच नाही तर प्रत्येक जिल्ह्यातील नद्या, पर्यटनस्थळे, अभयारण्ये सुद्धा मिनिटभरात नकाशात ठेवून दाखवितात. त्यांच्यापेक्षा लहान असणारे दुसरीतील विद्यार्थी अशाच प्रकारे नाशिक जिल्ह्याचा नकाशाही तयार करतात.
त्यांच्या वर्गांमधे नाशिकची वैशिष्ट्ये म्हणजे चलनी नोटांचा कारखाना, एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र असं सगळं तक्त्यावर लावलेलं आहे. शिवाय प्राचीन काळातील राज्य आणि राजांची नावे, गडांची पूर्वीची आणि प्रचलित नावं, राज्ये आणि त्यांच्या राजधान्या यांचे रंगीत बोर्ड टांगलेले आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेवर मेमाणे सर विशेष मेहनत घेत आहेत. त्यात तळफळ्यावर एखादे इंग्रजी मुळाक्षर लिहून त्यापासूनचे शब्द तयार करण्याचा खेळ, एखादी वस्तू उदा. बाटली हातात घेऊन त्याद्वारे क्रियापदांसकट इंग्रजी वाक्ये तयार करण्याचा खेळ (I am drinking the water, I will throw this bottle, I want to sell this bottle etc.) घेतला जातो. सुंदरपूरच्या शाळेतील चौथीचे विद्यार्थी इंग्रजीच्या सर्व काळात वाक्ये तयार करु शकतात. गाणे आणि नाचातून क्रियापदांचे वेगवेगळे काळ विद्यार्थी शिकतात. शिवाय विद्यार्थ्यांचा इंग्रजीचा शब्दसंग्रह वाढण्यासाठी सरांनी चित्र- शब्दाच्या रुपातली अनेक इंग्रजी कार्डस् तयार करून घेतली आहेत.
- स्नेहल बनसोडे- शेलुडक.

No comments:

Post a Comment