Sunday 28 January 2018

ग्रीन सिग्नल

मुख्याध्यापिका आरती परब शाळेत आल्यावर बालवाडीतल्या एका बछडीने सांगितलं, “बाई, मी काल खूप मार खाल्ला, पण भीक नाही मागितली.” बछडीने मार खाल्ला यामुळे आरतीताई कळवळल्या, पण त्यांना तिच्यातल्या बदलामुळे समाधानही वाटलं. 
आपण येताजाता रेड सिग्नलला थांबतो. या एक-दीड मिनिटाच्या अवधीत बरीच लहान मुलं वस्तू विकायला येतात. चित्र रंगवण्याची पुस्तकं विकणाऱ्या या मुलांना, यातलंच एखादं पुस्तक घेऊन रंगवावसं वाटलं तरी ते हे करू शकत नाहीत. कारण अपेक्षित रक्कम हातात नाही आली, तर त्यादिवशी उपवास ठरलेला असतो. आपण क्षणभर त्यांच्या शिक्षणाबद्दल विचार करतो, सिग्नल सुटल्यावर ते विचार तिथेच थांबतात. पण ठाण्याच्या तीन हात नाक्याचा सिग्नल जरा वेगळा आहे. या सिग्नललाही लहान मुलं विक्रेती आहेत, पण संध्याकाळी शाळा सुटल्यावर. या मुलांकरता तीन हात नाक्याच्या पुलाखालीच एका मोठ्या कंटेनरमध्ये शाळा भरवली जाते. हीच सिग्नल शाळा. गेले दीड वर्ष समर्थ व्यासपीठातर्फे आणि ठाणे महापालिकेच्या मदतीने हा उपक्रम सुरू आहे. या शाळेत आज बालवाडी ते दहावी इयत्तेतली 50 मुलं शिक्षण घेत आहेत.
राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेला पारधी समाज या सिग्नलपाशी वसला आहे. या समाजाची ही चौथी पिढी.
अहमदनगरमध्ये दुसरीपर्यंत शिक्षण झालेला किरण सिग्नल शाळेत यंदा पाचवीत आहे. त्याला शिक्षक व्हायचं आहे आणि गावी एक शाळा उघडायची आहे. याचं कारण विचारल्यावर तो सांगतो, “गावी सर खूप मारतात, इथं आम्हांला मारत नाहीत. छान समजावून सांगतात. इथं शिकण्यासोबत राहायला, खायला, खेळायला मिळतं. आमच्या शाळेतल्या बाई आणि ‘उंबटू’मध्ये कसे सर आहेत तसं मी पण होणार”. आणि हे सांगून झाल्यावर मला उंबटू चित्रपटाची पूर्ण कथाच ऐकवली पठ्ठ्याने. त्याच्यामते गावात चांगल्या शाळा असल्याच पाहिजेत. वडिलांनी आईला सोडल्यावर, तो आईसोबत ठाण्यात आला. आई मोगऱ्याचे गजरे, चाफ्याची वेणी बांधते आणि हा ते विकतो.



सहावीत शिकणारा शंकर सांगतो, “शाळेमुळे मी वाचलो. शाळा नसती तर मी आता नसतो. मी आधी आठ दिवसांनी आंघोळ करायचो. आता रोज करतो. स्वच्छ राहायला मला आता आवडतं. रविवारी पण शाळा हवी, सुट्टी नको”. शाळेबद्दल शंकर अतिशय भरभरुन बोलतो. त्याला कारणही तसंच आहे. एका रात्री ट्रकने शंकरला उडवलं. ट्रकवाला पळून गेला. सिग्नल शाळेतल्या मित्राने भटू सावंतांना फोनवरून अपघाताची माहिती दिली. शंकरला लगेचच सिव्हिल हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. शंकरच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. ऑपरेशन्स, प्लॅस्टिक सर्जरी साधारण तीनेक महिने हॉस्पीटलमध्ये काढावे लागले. समर्थची टीम, डॉक्टर मित्र यांच्या सहाय्याने त्याच्यावर उपचार झाले. शाळेमुळे शंकर आपल्या पायावर परत उभा राहू शकला. या सर्व कालावधीत त्याला पौष्टीक आहार, त्याचा अभ्यास, त्याला एकटेपणा वाटू नये याकरता भरपूर पुस्तकं या सर्वाची काळजी शाळेतल्या सर्वांनी घेतली. बीडमधून तो ठाण्यात आला तेव्हा त्याला इथं आवडायचं नाही. पण शाळेमुळे त्याला आता ठाणं आपलसं वाटतं. आईवडील कधी गावी गेले तरी तो जात नाही. कारण त्याला एकही दिवस शाळा चुकवायची नाहीये. चार भावंडांमध्ये शंकर थोरला. आजही तो शाळा सुटल्यावर चाफा, गजरे विकतो. सिझनप्रमाणे वस्तू बदलतात. रात्री तो शाळेतच झोपतो. शाळेने अवांतर वाचनासाठी पुस्तकांची सोय केली आहे. मोठं झाल्यावर त्याला पत्रकार व्हायचं आहे. कारण आपल्याला जशी मदत मिळाली, तशीच आणखी कोणाला लागणारी मदत उभारता येईल, असा विश्वास शंकरला आहे. 
दशरथ आणि मोहन दहावीत. हे दोघही सिग्नल शाळेत जाणं जास्त पसंत करतात. कारण इथं या दोघांकडेही वैयक्तिकरित्या लक्ष द्यायला, शिकवायला त्या त्या विषयांचे शिक्षक आहेत. मोहन सातवीपर्यंत उस्मानाबादमध्ये, तर दशरथ लातूरमध्ये नववीपर्यंत शिकला. विशेष बाब म्हणून ठा.म.पा. आयुक्तांच्या प्रयत्नांमुळे त्यांना नियमित दहावीच्या परिक्षेला बसता येत आहे. विविध खाजगी शाळांमधून निवृत्त झालेले नामवंत शिक्षक या दोघांनाही दहावीचा अभ्यास शिकवत आहेत. त्यांच्या शंका, अडचणी दूर करतात. 



आज ही मुलं-मुली शाळेत छान रुळली आहेत. पण त्यांना शाळेत आणणं एवढं सोपं नव्हतं. मुलं शाळेत गेली तर धंदा कमी होणार, म्हणून पालकांचा शाळेत पाठवायला खूप विरोध होता. मग मुलांना दोन वेळचं खाणं, कपडे मिळतील, संध्याकाळी ते धंद्यावर येतील अशी विनवणी करून पालकांचं मन वळवलं. मुलं शाळेत आल्यावर त्यांचं हरवलेलं बालपण परत मिळवून देण्याकरता आधी प्रयत्न सुरू केले. त्यांना स्वच्छता आणि आरोग्याच्या चांगल्या सवयी लावण्याकडे आधी भर दिला गेला. काउन्सलर्स, बालरोगतज्ज्ञ यांची मदत घेऊन मुलांचं विडी-तंबाखूचं व्यसन सोडवलं. भीक मागायची नाही स्वाभिमानाने कसं जगावं याबाबत मुलांना गप्पांच्या माध्यमातून सांगितलं गेलं. 
त्यांना नेहमीप्रमाणे अ- अननस, आ-आई किंवा फळ्यावर अंकगणित शिकवणं कठीण नाही तर अशक्य होतं. कारण त्यांची मातृभाषा आणि प्रमाणित मराठीत असणारा फरक. पारधी भाषेत आजा म्हणजे आई, मग आ- आजा, ‘च’ चमचा न सांगता ‘च’- चोखा (भात), द – दांतो (ससा) असा शब्दसंग्रह बनू लागला. हातवारे आणि चित्रांच्या माध्यमातून शिक्षक आधी मुलांची भाषा शिकले, मग मुलांना हळूहळू प्रमाणित भाषेकडे वळवलं. नोटांचा हिशोब करण्यात ही मुलं पटाईत, पण फळ्यावरील अंकगणित जमेना. मग गणिताशी गट्टी जमवायला नोटा आल्या. 
सकाळी 10 ते 4 शाळा. 6.30 पर्यंत तिथंच थांबून गृहपाठ आणि उजळणी केली जाते. एकाग्रता वाढवण्यासाठी मुलांकरता आठवड्यातून दोन तास योगवर्ग असतो. समर्थचा बचतगटच या मुलांकरता पौष्टीक जेवण बनवतो. कॉम्प्युटरपासून पथनाट्यापर्यंत अनेक गोष्टी या मुलांना शिकवल्या जातात. मुलं भावनिकदृष्ट्या शाळेशी चांगलीच बांधली गेली आहेत.
आजही मुलं शाळा सुटल्यावर आपल्या पालकांना वस्तू विकायला मदत करतात. पण भीक मागत नाहीत. “आम्हीही छान शिकून मोठे होणार, उपाशी राहू पण भीक नाही मागणार” असं आता मुलं म्हणतात. या मुलांमधली उपेक्षेची भावना जाऊन आम्हीही या समाजाचा भाग आहोत हा विश्वास सिग्नल शाळेमुळे आला आहे. परिस्थितीमुळे रेड सिग्नल मिळून बालपण कोमजून गेलं होतं, पण आज सिग्नल शाळेच्या ग्रीन सिग्नलमुळे सुजाण पिढी घडवली जातेय.

No comments:

Post a Comment