Friday 5 January 2018

इंग्लीश शिकणे गोडीचे

शहापूरच्या आदिवासी मुलींची यशकथा -
मुंबईजवळचं, तरीही दुर्गम डोंगराळ गाव. तिथली आदिवासी मुलंमुली. एवढं वाचल्यावर, काय चित्र येतं मनात? सोयीसुविधांचा अभाव, शिक्षक नाहीत, मुलांच्या शिक्षणात बरेच अडथळे...वगैरे. पण इथेच, एका शिक्षकाला दिसली संधी. हे शिक्षक इंग्रजी शिकवणारे. आदिवासी भागात इंग्लिश! मुळात आदिवासींची बोलीभाषा मराठी प्रमाणभाषेपेक्षा वेगळी. तिथे इंग्लिश कुठलं यायला? असं मनात येऊ शकतं. पण 2009 पासून शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा शेणवे, ता. शहापूर, जि. ठाणे इथे शिकवणारे शरद पांढरे यांनी, बरंच काही घडवलंय. 8 वर्षांपूर्वी, या आश्रमशाळेत 300 मुली होत्या. आता, 568 मुली निवासी राहून शिक्षण घेत आहेत. इंग्लीश भाषा शिकणं त्यांच्यासाठी आनंदाचं झालं आहे, पांढरे सरांमुळेच. विद्यार्थिनींना इंग्रजी भाषा अवगत करणं सोपं व्हावं, यासाठी त्यांना भाषा जास्तीत जास्त ऎकवणं गरजेचं आहे, हे त्यांनी जाणलं. स्वतः शिकवलेले, वाचलेले पाठ स्मार्टफोनवर रेकॉर्ड करून त्यांनी मुलींना पुन्हा पुन्हा ऐकवले. मुलींच्या वारली, कातकरी, ठाकर व महादेव कोळी या बोलीभाषांचा वापर इंग्लीश शिकवताना केला. यामुळे मुलींना गोडी लागली. त्यांची श्रवण, वाचन, भाषण कौशल्यदेखील वृद्धिंगत झाली. ऑडिओ शब्दकोश, चित्ररूप कोश यांचा वापर मुली सहज करू लागल्या. शाळेत विद्यार्थिनींचे इंग्रजी आणि मराठी भाषा क्लब, स्पोकन इंग्लिश यासारखे अभ्यासक्रमही सुरु आहेत. ‘अ प्रोव्हर्ब अ डे’ या उपक्रमानेदेखील विद्यार्थिनींची शब्दसंपत्ती वाढवली.
आश्रमशाळेत, 2010 पासून, डिजिटल क्लासरूम साकारण्यात आली आहे. तिथे इ-लर्निंग सॉफ्टवेअर्स, पीपीटीज, व्हिडीओ, प्रेझेंटर वगैरेंचा नियोजनबद्ध वापर होतो. 2014-15 पासून 8 कॉम्प्युटर्स, इंटरनेट, वायफाय, 2 मोठे एलसीडी टीव्ही, स्मार्टबोर्ड, प्रोजेक्टर्स या सुविधांच्या मदतीने अध्यापन सुरू आहे. विद्यार्थिनीही आता या वस्तू स्वतः हाताळतात.
शिकण्याची गोडी निर्माण झाल्याने गळतीचं प्रमाण कमी होऊन मुलींच्या उपस्थितीचं प्रमाण वाढलं आहे. 8 वर्षांपूर्वी, शाळेचा 10 वी चा पट 23-24 असायचा. आत्ता, 10वीत 61 विद्यार्थिनी आहेत. 8 वर्षांपूर्वी, 12 वीत, 20 विद्यार्थिनी असायच्या. आता, 50ते 60 असतात. आदिवासी समाजामध्ये मुलींच्या शिक्षणाप्रती आस्था निर्माण करून संस्कारक्षम विदयार्थी घडविल्याबद्दल अपर आयुक्त, ठाणे यांच्या वतीने, 2016 सालचा पुरस्कार पांढरे सरांना मिळाला. उत्कृष्ट आश्रमशाळेचा पुरस्कारदेखील शाळेला मिळाला आहे.
पांढरे सर सांगतात, “आमच्या विद्यार्थिनींची स्वयंशिस्त, प्रामाणिकपणा, जिद्द, समायोजन वाखाणण्याजोगं आहे. कला, क्रीडा, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणार्‍या या मुली आहेत. समर्पित शिक्षक सहकार्‍यांमुळेच या मुलींची एवढी प्रगती होऊ शकली.”
शरद पांढरे २०१५ पासून 6वी,7वी , 9वी च्या इंग्रजी, मराठी व इतर माध्यमांच्या पुस्तकांच्या लेखनात सहभागी आहेत. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अणि ब्रिटीश कौन्सिल आयोजित व्हर्चुअल प्रशिक्षण उपक्रमात, ते मास्टर ट्रेनर आणि मेंटॉर म्हणून महाराष्ट्रातल्या इंग्रजी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं कामही अनेक वर्षांपासून करत आहेत.


अजिता विश्वास.

No comments:

Post a Comment