Monday 15 January 2018

उर्मिला पालची बालवाडी

मुंबई स्पेशल
मुंबईतल्या बोरिवली आणि दहिसर ह्या दोन उपनगरांमध्ये एक छोटी खाडी आहे. ह्या खाडीच्या किनाऱ्यावर एक मोठी झोपडपट्टी आहे - गणपत पाटील नगर. इथे बाहेरच्या राज्यातून कामाला आलेली अनेक लोकं झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. ही वस्ती इतकी वाढली आहे की एक छोटं नगरच वाटावं. आत छोटे उद्योग, छोटी दुकानं. बोरिवली आणि दहिसरच्या इमारतींमध्ये इथल्या बायका घर-कामगार म्हणून, स्वयंपाकी म्हणून जातात. मुंबईतल्या छोट्या-मोठ्या कारखान्यांमध्ये इथलं 'लेबर' जातं. मात्र, ही जागा अनाधिकृत आहे. त्यामुळे कॉर्पोरेशनचा बुलडोझर इथं अधून-मधून येत असतो. उर्मिलाने इथं आपली बालवाडी सुरु केली आणि फुलवली!

उर्मिला जौनपूर जवळच्या एका खेड्यातली. "आमच्या खेड्यात ब्राह्मण कुटुंब सोडून कुणीही जास्त शिकत नसे. मी एकमेव मुलगी ब्राह्मण नसून बारावीपर्यंत शिकले. मला शिक्षक व्हायचं होतं. मात्र लग्न होऊन मुंबईत आले आणि हे शक्य होणार नाही असं वाटलं. परंतु 'प्रथम' माझ्या आयुष्यात आलं!" झालं असं, की २००४ ह्या वर्षी प्रथम (प्रथम एज्युकेशन फौंडेशन, देशभरात शिक्षणक्षेत्रात काम करणारी संस्था) ह्या भागात बालवाडी सुरु करणार होतं आणि त्यांना थोडं शिक्षण झालेल्या महिला हव्या होत्या. उर्मिला लगेच तयार झाली आणि काही दिवसात तिची बालवाडी सुरु झाली. त्या वेळेस महानगरपालिकेच्या शाळेतून इ. दुसरी-तिसरीमधून मुलांची गळती होत होती. सधन घरातील मुलं पहिलीच्या आधी बालवाडीत (pre-school / kindergarten) जात असत. त्यामुळे त्यांचा शैक्षणिक पाया मजबूत असायचा, आणि पहिलीत शिकवलेलं त्यांना समजायचं. परंतु गणपत पाटील नगरातली मुलं पहिलीत प्रवेश घेतल्यानंतर काही वर्षात शाळा सोडून द्यायची. कारण, पाया मजबूत नसणं! म्हणून उर्मिलासारख्या महिलांवर जबाबदारी मोठी होती.
इथंच 'उर्मिला पाल की बालवाडी' चा जन्म झाला! आणि पुढील चार ते पाच वर्षात आजूबाजूच्या घरातील मुलं तिच्या घरी जमू लागली. अक्षरं-अंकांचा सराव सुरु झाला. नंतर हीच मुलं पहिलीत जाऊन पुढं शिकू शकली कारण त्यांचा पाया मजबूत झाला होता. परंतु ह्या वस्तीत अशी बरीच मुलं होती ज्यांनी अर्ध्यावर शाळा सोडली होती. जवळच्या दारूच्या दुकानांबाहेर पकोडे विकत बसायची, किंवा दिवसभर इकडे-तिकडे फिरत राहायची. उर्मिलाने त्यांना अक्षरशः पकडून आणलं आणि 'प्रथम'च्या मदतीने शिकवून, तयार करून पुन्हा शाळेत दाखल केलं. पण, ह्या सगळ्याच्या पलीकडे एक फार मोठं काम उर्मिलाकडून घडलं. तिला बघून वस्तीतील इतर महिलांनी देखील बालवाडी चालविण्याची तयारी दाखवली. आणि चालवली देखील. त्यामुळे शिक्षणाचं वातावरण तयार होण्यासाठी मदत झाली. बोलता बोलता उर्मिलाने सांगितलं, "आमच्यासारख्या बऱ्याच जणांची घरं ह्या बालवाडीमुळे वाचली आहेत. कॉर्पोरेशनचा बुलडोझर आमची घरं उध्वस्त करायला येतो. परंतु हातात पुस्तकं घेतलेली मुलं पाहिली की ते घर आणि त्याच्याभोवती असलेल्या घरांना तो सोडून देतो."
उर्मिला आता बालवाडीसोबत मुलांच्या शिकवण्याही घेते. सोबत शिवणकाम करते. तिचा नवरा जवळच्या एका कंपनीत काम करतो. घरच्या वातावरणाचा फायदा म्हणा, तिचा मुलगा बँकेत कामाला आहे आणि मुलगी डॉक्टर झालेली आहे. 'गणपत पाटील नगर'मधील मुलांसाठी आता शाळा ही नित्याची गोष्ट झालेली आहे. पण त्यामागे उर्मिलासारख्या महिलांचा हात आहे, हे विसरून चालणार नाही.
- आशय गुणे.

No comments:

Post a Comment