Wednesday 31 January 2018

कौशल्याची डोळस गोष्ट

कौशल्या बीएच्या दुसऱ्या वर्षाला होत्या. व्हायरल इन्फेक्शनचं निमित्त झालं आणि अंधत्व आलं. ऑपरेशननंतर एका डोळ्यांने दिसू लागलं. नंतर एक दिवस डोळ्यावर टेबल धडकलं. पुन्हा दृष्टी गेली. आता मात्र खरोखरच डोळ्यासमोर अंधार पसरला. शिक्षण थांबलं. २००९ मध्ये पुण्याच्या अंधशाळेविषयी कळलं. मग तिथं प्रवेश घेऊन त्यांनी ब्रेल लिपी शिकून घेतली. एमए पूर्ण केलं. व्यावसायिक प्रशिक्षणही तिथून घेतलं.
त्यांचं पूर्ण नाव कौशल्या साठे. वय ३२. सोलापूर येथील माळशिरस तालुक्यातील खंडाळी हे त्यांचं गाव. “मी अंध झाले नसते तर काहीच करू शकले नसते”, असं त्या सांगतात. कलाकुसरीची पूर्वीपासून आवड असल्याने त्यांनी तेही शिक्षण घेतलं. दाराचं तोरण, झूटच्या बॅग्ज, झूला, लग्नाच्या रूखवताला लागणारं सर्व साहित्य त्या बनवतात. त्यांचा मुख्य व्यवसाय हा डिझाईनच्या कँडल बनवणं. स्वेटर, मफलर विणायचं मशीन त्या स्वतःच चालवतात. दिवाळीत मेणबत्ती व्यवसायात त्यांनी ३२ हजार रूपयांची गुंतवणूक केली. आणि त्यातून ५७ हजार रूपये निव्वळ नफा मिळवला. इतर कलाकसुरीच्या वस्तूविक्रीतून २५ ते ३० हजार रूपये, तर स्वेटर, मफलर या थंडीच्या हंगामातील कपडे विकून ३० ते ४० हजार रूपये वार्षिक निव्वळ नफा त्यांना मिळतो.
वस्तूही त्याच तयार करतात आणि त्याचं मार्केटींगही. आपल्या वस्तू विकण्यासाठी फिरणं गरजेचं आहे. मार्केटींग करणं गरजेचं आहे, असं त्या सांगतात. गेल्या तीन वर्षांपासून त्या हा व्यवसाय करत आहेत. “अंधत्व नसतं, तर माझ्यात जिद्द निर्माण झाली नसती. अंध असल्याचं दुःख वाटत नाही”, असं त्या आत्मविश्वासाने सांगतात. “सुरूवातीला कसं होणार याचा तणाव होता. पण आता डोळे नसूनही डोळस झाले आहे”, असं त्यांचे म्हणणं आहे. सध्या पुणे येथील वेद वासुदेव प्रतिष्ठान संचलित ‘जिव्हाळा’ या अंध मुलामुलींच्या शाळेत मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचं काम कौशल्या करत आहेत.

- गणेश पोळ.

No comments:

Post a Comment