Wednesday 24 January 2018

साजिदाला मिळाली ओळख

मुंबई स्पेशल
साजिदा बेगम मिर्झापूर, उत्तर प्रदेशची. लग्न झाल्यावर 1989 साली ती मुंबईत आली. 1995 पर्यंत सायनच्या वस्तीत राहिल्यानंतर ती कुटुंबासह मानखुर्दच्या वस्तीत राहायला आली. सायनला असताना तिच्या शेजारी राहणारी एक मुलगी शाळेत नापास झाली. तिला अभ्यासात मदत करायचं साजिदाने ठरवलं. आणि आश्चर्य म्हणजे दुसऱ्या वर्षी ती मुलगी वर्गात चक्क पहिली आली! ही घटना साजिदाला 'आपण शिकवू शकतो' असा आत्मविश्वास देऊन गेली. त्यातूनच ती मुलांना उर्दू आणि अरबी प्राथमिक पातळीवर शिकवू लागली.
परंतु तिची शिक्षिका म्हणून व्यापक ओळख मानखुर्दमध्ये (पश्चिम) निर्माण झाली. ते 1997-98 चं वर्ष असावं. 'प्रथम'चे काही कार्यकर्ते त्या भागात 'सर्व्हे' करीत होते. त्या भागात किती मुलं आहेत हे बघायचं, त्यानुसार तिथल्या बालवाड्यांची संख्या निश्चित करायची आणि संबंधित महिलांना प्रशिक्षित करून त्या सुरु करायच्या, असं ठरलं होतं. वस्त्यांमधली बरीच मुलं शाळेबाहेर आणि 3 ते 5 वयोगटातील मुलं पहिलीत जाण्याआधी कोणतीही सोय नाही. ही नव्वदच्या दशकातील मुंबईतील शिक्षणाची अवस्था. बालवाडी सुरु करून ही पोकळी भरून काढायची जबाबदारी साजिदासारख्या काही महिलांवर होती. तिथला अजून एक प्रश्न महत्त्वाचा होता. ही शाळा असणार होती, मानखुर्दच्या पूर्व भागात, आणि पश्चिमेकडून तिथं जायचं तर रेल्वेरूळ ओलांडून जावं लागायचं. साहजिकच कोणतेही पालक आपल्या लहान मुलांना तिथं पाठवत नसत. आणि आपल्या व्यापात अडकल्यामुळे मुलांना शाळेत सोडायलाही जात नसत. मग हीच जबाबदारी साजिदाने उचलली.
मुलं साजिदासोबत शाळेत जाऊ लागली. आणि घरी आल्यावर आई-वडिलांशी बोलायला लागली. त्यामुळेच तिथल्या पालकांना शिक्षणाचं महत्त्व कळू लागलं. पुढं साजिदाने आणखी 6 महिला तयार केल्या. बघता बघता त्या वस्तीत 7 बालवाड्या तयार झाल्या. आज, मानखुर्दच्या त्या वस्तीत जवळ जवळ सगळी मुलं शाळेत जातात. आता गरज आहे, ती मुलांना योग्य पद्धतीने शिकविण्याची. कारण, शाळेत जात असली तरी मुलांना शिकण्याची, लिहिण्या-वाचण्याची गोडी लागली पाहिजे.
तिने एकदम सुरुवातीला शिकविलेली मुलं आता मोठी झाली आहेत, काही नोकरी देखील करतात. काहींनी तर शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारली. अधून मधून त्यांची भेट होते. काही विद्यार्थ्यांना ओळखणं अवघड होऊन जातं, पण त्यांनी वाकून नमस्कार केला की तिला लक्षात येतं, 'हा आपला विद्यार्थी!' 'शिक्षिका' म्हणून स्वतःची ओळख निर्माण झाल्यामुळे साजिदा आज समाधानी आहे.
- आशय गुणे.

No comments:

Post a Comment