Wednesday 24 January 2018

एजाजला बालशौर्य पुरस्कार



30 एप्रिल 2017, दुपारची वेळ. पार्डी गावातील आफरीम बेगम, तब्बसुम, सुमय्या, आणि अफसर बेगम या चौघी गावाजवळील बंधा-यावर कपडे धुऊन परतत होत्या. बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला उथळ पाण्याची एक जागा होती. तिथं कमरेइतक्या पाण्यात तिघीजणी खेळू लागल्या. खेळण्याच्या नादात पलीकडे २०-२५ फूट खोल पाण्याचा डोह आहे, हेही विसरून. १४ वर्षाची सुमय्या अचानक खोल पाण्याकडे गेली. आणि बुडायला लागली. जवळच्या आफरीनला तिने पकडण्याचा प्रयत्न केला पण ती हाताला येत नव्हती. हे सगळं काठावरून अफसर बेगमने बघितलं. लगेचच ती मदतीसाठी वाकली. पण, तिचाही तोल गेला. पाणी खूपच खोल असल्याने दोघी बुडू लागल्या. आता त्यांना वाचवायला तब्बसुम आणि आफरिम दोघीही खोल पाण्यात शिरल्या. पोहता मात्र कुणालाच येत नव्हतं. त्यामुळे गटांगळ्या खाऊ लागल्या. “वाचवा, वाचवा” या त्यांच्या आवाजाने लोक बंधाऱ्याकडे धावले. पण कोणीही खोल पाण्यात उतरेना.  दरम्यान एका लग्नात जेवण करून शेताकडे परतणाऱ्या सोळा वर्षाच्या एजाजनंही हा आवाज ऐकला. लोकांना बाजूला सारत तो पुढं झाला. आणि क्षणभरात त्याने पाण्यात उड़ी घेतली. तेव्हा बघ्यापैकी एक म्हणाला, “हा कशाला मरायला पाण्यात गेला?” पण दुसरा लगेच म्हणला, “तो चांगला पोहणारा आहे. मुलींना तो बाहेर काढील”.
दरम्यान आफरिम बेगम एक गटांगळी खाऊन वर आली होती. ती गळ्याला पडण्याचा धोका ओळखून अंतर ठेऊन एजाजने तिला पकडलं. काठावर सोडलं.
पुन्हा सुळूक मारून एजाज तब्बसुम जवळ पोचला. नाकातोंडात बरंच पाणी गेल्याने ती गुदमरत होती. त्याने तिच्या हाताला मजबूत पकडले. आणि स्वत: पाण्यात बुडून तिचं डोकं वर राहील याची काळजी घेत काठाकडे येऊ लागला. तेवढ्यात राजेश्वर देशमुख आणि पुंजाराम मदने यांनी एक साडीचे टोक एजाजच्या दिशेने फेकले. ते पकडून एजाजने तिला वाचविलं.
आता मुली बुडत असल्याची बातमी गावभर पसरली होती. सारा गाव बंधाऱ्यावर जमला होता. काही जण पाण्याबाहेर काढलेल्या मुलींच्या पोटातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. एजाज पाण्याबाहेर येणार; तेवढ्यात काठावर उभी असलेली शन्नो एजाजला म्हणाली, “बाबा, मेरी बहन अफसर बेगमभी डूब गई है, उसेभी बाहर निकाल.”
एजाज परत फिरला. पुन्हा खोल पाण्यात जाऊन तिसरीचा शोध घेऊ लागला. इतक्यात केसांची हालचाल दिसली आणि त्याने जोरात सूर मारून केस पकडून तिला काठाच्या दिशेने खेचून आणलं. पुंजाराम मदने, भास्कर कल्याणकर, राजेश्वर देशमुख यांनी तिला बाहेर काढायला मदत केली. कोणी तरी म्हणाले, “और एक अंदर है सुमय्याSS”. आपली वर्ग मैत्रीण सुमय्या पण या बंधाऱ्यात बुडाली आहे, हा एजाजाला पण धक्का होता.
२५ फूट खोल पाण्यात एजाज सुमय्याचा शोध घेत राहिला. तो वेगवेगळ्या ठिकाणी तळ गाठायचा. पण सुमय्या दिसत नव्हती. अखेरचा प्रयत्न म्हणून त्याने पुन्हा एकदा तळ गाठला. तेव्हा पायाला काही जाणवलं. श्वास रोखून तिला वाचवायला त्यानं पुन्हा डुबकी मारली. तिचे पाय धरून वर आणलं खरं पण तोवर सुमय्या सर्वांना सोडून खूप दूर गेली होती. एजाजने तब्बसुम आणि आफरीनचे प्राण वाचवले. अफसर आणि सुमय्याला मात्र तो वाचवू शकला नाही. याची त्याला आजही खंत वाटते आहे.
अतिशय कठीण प्रसंगी साहस दाखवून दोन मुलींचे प्राण वाचविणाऱ्या एजाजचा गावाने सत्कार केला. आता त्याच्या या साहसाची नोंद राष्ट्रीय पातळीवरही झाली आहे. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याला बालशौर्य पुरस्कार दिला गेला. 7 मुली आणि 11 मुले अशा एकूण 18 बालकांना 2017 साठीचा राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार दिला गेला. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात एकट्या एजाजची निवड करण्यात आली आहे.
खेळात हुशार असलेला एजाज अब्दुल नदाफ पार्डी येथील राजाबाई कनिष्ठ महाविद्यालयात १० व्या वर्गात शिकतो. अतिशय गरीबीमुळे कुणाचे ट्रक्टर रोजंदारीवर चालवून, पडेल ते काम करून तो कुटुंबाला आर्थिक मदत करतो.
दहावी झाल्यावर ड्रायव्हरची नोकरी करावी या एजाजचा विचाराला बालशौर्य पुरस्काराने नवी दिशा दिली आहे. आता त्याला सैन्यात जाऊन देशाची सेवा करायची आहे.
 - सु.मा.कुळकर्णी.

No comments:

Post a Comment