Thursday 18 January 2018

कृष्णा पुजारी आणि त्याची टीम. मुक्काम: धारावी.

मुंबई स्पेशल

स्लम टुरिजमविषयी ऎकलंय का तुम्ही? मुंबईनगरीतली गेट वे ऑफ इंडिया, ताजमहाल, मरीन ड्राइव्ह ही टुरिस्टांची आवडती ठिकाणं आहेत. यात आणखी भर पडली आहे स्लम टुरिझमची. मुंबईत माहीम, माटुंगा, सायन, वांद्रा, कुर्ला, बीकेसी – इथे येता-जाताना धारावीशी गाठ पडते. आता, खरं तर, तिचं वर्णन कुणी पूर्वीसारखं झोपडपट्टी म्हणून करतच नाही. आणि नकोच करायला. पण टूरिझमसाठी मात्र ती अजूनही ‘स्लम’ आहे.
धारावीत स्लम टुरिझम सुरू करणारी संस्था ‘रिॲलिटी टूर्स आणि ट्रॅव्हल’. तिचा एक संस्थापक कृष्णा पुजारी. माहीम रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडून नव्वद फुटी रस्त्यालगतच्या गल्लीत, कुंभारवाड्याजवळ रिॲलिटी टूर्सचं ऑफिस आहे. २००८-०९ मध्ये ऑस्करविजेता ‘स्लमडॉग मिलियनेअर’ चित्रपट गाजला होता. मुंबईतल्या झोपडपट्टीत जगणार्‍या मुलांची ती कथा होती. खुद्द कृष्णाचीच जीवनकहाणी एखाद्या सिनेमाच्या कथेहून कमी नाहीये.
कन्नड मातृभाषा असलेला कृष्णा मराठी नीट बोलतो, परदेशी पर्यटकांशी सफाईदार इंग्लीशही बोलतो. तेरा वर्षांचा असताना कर्नाटकातल्या आपल्या गावाहून, काम करण्यासाठी तो मुंबईत आला. वडाळ्याच्या प्रतीक्षानगर वस्तीत राहिला. कृष्णाने बावीसाव्या वर्षी धारावीत काम सुरू केलं. मग स्वतःचा कॅफेटेरिया काढला. २००५-०६ च्या दरम्यान त्याला मूळचा बर्मिंगहॅमचा असलेला ख्रिस वे हा माणूस भेटला. ख्रिसने लॅटिन अमेरिकन समाजाचा अभ्यास केलेला. ब्राझीलमध्ये रिओ शहरात त्याने वस्त्यांमधलं पर्यटन पाहिलेलं. ‘बाहेरच्या’ लोकांना अशा वस्त्यांत आणल्याने वस्त्यांचा विकास व्हायला मदत होऊ शकते, अशी त्याची धारणा झाली होती. धारावीत स्लम टुरिझम सुरू करण्याची हीच प्रेरणा ठरली.
धारावीत हे काम करण्यासाठी स्थानिक माणूस म्हणून त्याने स्मार्ट, तरूण कृष्णाला हेरलं. आणि २००४ मध्ये ‘रिॲलिटी टूर्स आणि ट्रॅव्हल’ची जमवाजमव सुरु केली. कृष्णा तेव्हा फक्त पंचवीस वर्षांचा होता. ख्रिसने त्याला तयार केलं. आता ख्रिसने स्वतःला धारावीतल्या कामातून मुक्त करून घेतलंय. तो आता फिलिपिन्स, मनिला वगैरे ठिकाणी याच प्रकारचं मॉडेल सुरू करण्याच्या प्रयत्नांत आहे. कृष्णा आणि त्याची देशी-परदेशी सदस्यांची टीम भारतातल्या मुंबई, दिल्लीसह विविध शहरांतले स्लम टुरिजम प्रकल्प सांभाळतात.
धारावीत हे पर्यटन सुरू केलं, तेव्हा स्थानिकांनी विरोध केला. प्रवाशांना इथे कशाला आणताय, इथे बघण्यासारखं आहे तरी काय, असं लोक म्हणायचे. पण कृष्णाने त्यांना मनवलं. विरोध हळुहळु मावळला.
टूर कंपनीबरोबरच त्यांनी ‘रिॲलिटी गिव्ह’ या नावाची एनजीओही सुरू केली आहे. टूर्समधून मिळालेल्या नफ्याचा काही हिस्सा या एनजीओतर्फे समाजसेवेची कामं करण्यासाठी वापरला जातो. ‘रिॲलिटी गिव्ह’तर्फे धारावीतल्या मुलामुलींसाठी इंग्लीश, कंप्युटर वगैरे विषयांचे क्लासेस चालवले जातात. या क्लासेसचं सगळं व्यवस्थापन धारावी, माटुंगा लेबर कँप परिसरातलीच मुलं-मुली बघतात.
धारावीतच जन्मले-वाढलेले चेतन-राजेशसारखे काही स्मार्ट गाइड्स तयार झालेत. ते पर्यटकांना धारावी दाखवतात. कचर्‍याचं हातांनी केलं जाणारं वर्गीकरण, गारमेंट्सशिलाई, प्लॅस्टिक रिसायकलिंग, धातू वितळवण्याचं प्रचंड धोक्याचं काम, चामड्याचं कटिंग आणि त्यापासून स्त्री-पुरुषांसाठी बॅग्ज, पर्सेसची निर्मिती, कुंभारवाड्यात माती रगडून मडकी, पणत्या घडवणं, लिज्जत आणि अन्य कंपन्यांचे पापड लाटणं, वाळवणं, वेफर्स, चिवडा वगैरे बनवणं – धारावी ही उद्योगनगरी असल्याची साक्ष देणारी ठिकाणं. राजेश-चेतन चटपटीतपणे इंग्लिश बोलतात. ते १२वी पास आहेत. रिॲलिटी टूर्स कंपनीच्या स्टाफवर आहेत. त्यांना महिना १५ हजार पगार आहे. त्याखेरीज पर्यटकांकडून टिप मिळते. अडचणीच्या काळात मोठी मदत देणारे प्रवासीही भेटतात. पैशाच्या मिळकतीहून बरंच काही मिळतं, असं ते सांगतात. प्रतिष्ठा मिळते, समज वाढते. आमच्यातल्या काहींना परदेशी जायची संधीही मिळाली आहे. आमच्यातला मयूर तर फुटबॉल खेळायला ऑस्ट्रेलियालाही जाऊन आलाय.
या टूर्स गरिबीचं प्रदर्शन करणार्‍या असतात, असा आक्षेप घेतला जातो. पण यावर मतंमतांतरंही आहेत. मुळात धारावी गरीब आहे का, हा मुद्दा आहे. अनेक व्यावसायिक तिथे राहातात. करोडोंची उलाढाल होते. धारावीत कोणी रिकामं, निरुद्योगी बसलेलं दिसतच नाही. तुम्ही धारावी बघायला म्हणून जाता. पण तिथल्या कुणाचं तुमच्याकडे लक्षही नसतं. प्रत्येक जण बाराबारा, सोळासोळा तास आपापल्या कामात मग्न. घरं लहान आणि दाटीवाटीने असली तरी घराघरात आवश्यक ते सारं सामानसुमान आहे. शौचालयं वगैरे अपुरी आहेत. पण सुधारणाही होत आहेत.
स्वतः कृष्णा आणि त्याच्या स्टाफमधले सगळेच सांगतात, की गेल्या पंधरा वर्षांत धारावी खूप बदललीये. घरोघरी एकाहून अधिक कमावणारे लोक आहेत. या टुरिझमने धारावीचं काहीच नुकसान नाही. महाराष्ट्र आणि भारतभरातले लोक इथे आहेत. प्रचंड उत्पादन होतं. सगळे असंघटित उद्योग इथे चालतात. मुंबईच्या आर्थिक वाढीत धारावीचं मोठं योगदान आहे. मुंबईत येणार्‍या पर्यटकांना याची जाणीव करून द्यायलाच हवी, असंही एक मत. मुंबईत याल तेव्हा स्लम टुरिझमचा अनुभव तुम्हीही घेऊ शकता.

No comments:

Post a Comment