Friday 19 January 2018

प्रयोगातून आली जलसाक्षरता

उपलब्ध असलेल्या पाण्याचे सुयोग्य नियोजन हा पाणीबचतीचा मूलमंत्र आहे. जसे नळातून वाया जाणारे पाणी आम्ही वाचविले त्याचप्रमाणे पावसाळ्यात कोसळणारे पावसाचे पाणीही जमा करायला हवे, या विचाराने डोक्यात ठाण मांडले. पावसाचे पाणी ‘जलपुर्नभरण योजने’तून जमिनीखाली साठविता येते, हे माहिती होते.

हीच योजना नाशिकमधील बागलाण तालुक्यातील आमच्या शाळेत राबविण्याचे निश्चित केले. त्यासाठी शाळेच्या छताचे क्षेत्रफळ, आमच्या क्षेत्रात अंदाजे पडणारा पाऊस याचा अंदाज घेतला. सुमारे एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार लीटर पाणी या प्रयोगाद्वारे एका वर्षात जमा होऊ शकते असा आम्ही कयास बांधला.
त्यानुसार 2016 च्या ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण सेवा योजनेद्वारे आर्थिक मदत घेतली आणि अठरा हजार रुपयांत आमच्या शाळेत जलपुर्नभरण योजना कार्यान्वित झाली.

त्यासाठी पावसाळ्यात छतावरुन वाहणारे पाणी पाईप्सद्वारे जमिनीखाली एका मोठ्या खड्ड्यात सोडले. त्या खड्ड्यात विटांचे तुकडे, कोळशाचे तुकडे आणि मुरुम टाकला. पावसाळ्यात त्या पाईप्सद्वारे पाणी खड्ड्यात जाऊ लागले. खड्ड्यात टाकलेल्या विटा आणि मुरुमाच्या तुकड्यांनी त्या पाण्याचे शुद्धीकरण होते. यामुळे आमच्या जमिनीतील पाण्याचा स्तर उंचावला आहे. पूर्वी शाळेतील बोअर उन्हाळ्यात केवळ 15 ते 20 मिनिटेच चालायची. 2017 च्या उन्हाळ्यात मात्र ही बोअर सहज 45 मिनिटे चालली आणि उन्हाळ्यातही पाणी मिळाले. या पावसाळ्यात आणखी जास्त पाणी जमिनीखाली जाऊन पाण्याचा साठा वाढेल, असा अंदाज आहे.उपलब्ध पाणी जपून वापरावं तसंच पाणी प्रदूषित होऊ नये ही देखील आपलीच जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना हेसुद्धा सप्रयोग समजावून सांगण्यासाठी गेल्या वर्षी आम्ही आणखी एक प्रयोग केला. आमच्या आसखेडा गावाजवळून मोसम नदी वाहते. गणेशोत्सवानंतर गावातील बहुतांश मूर्त्यांचे विसर्जन त्याच नदीत होते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, प्लास्टिक हार आणि निर्माल्य सर्रास नदीत फेकले जाते. यामुळे नदी प्रदूषित होते, हे अभ्यासात आपण मुलांना शिकवतोच पण ती नदी किती प्रमाणात प्रदूषित होते, हे विद्यार्थ्यांना सप्रमाण दाखविण्याचं निश्चित केलं.
2016 साली गणेशोत्सवाआधी नदीच्या पाण्याचा पीएच, क्लोरिन, नायट्रेट, फ्लुरॉईड यांची तपासणी आम्ही पर्यावरण सेवा योजनेद्वारे मिळालेल्या उपकरणांद्वारे केली. काही दिवसांनी गणेशविसर्जन झाले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी विद्यार्थ्यांनी पुन्हा या सगळ्या चाचण्या केल्या. पाण्याचा पीएच सुमारे दोन टक्क्यांनी वाढला होता, तर पाण्याचा जडपणा (हार्डनेस) सुमारे 100 अंकांनी वाढला होता. नायट्रेट, क्लोरिन, फ्लुरॉईडसचे प्रमाणही लक्षणीयरित्या वाढल्याचे विद्यार्थ्यांनी नोंदविले.
प्रत्यक्ष प्रयोगातून विद्यार्थ्यांना प्रदूषणाची गंभीर समस्या जाणवली. आपले पाणीसाठे आपण काळजीपूर्वक वापरायला हवेत, ते प्रदूषित होऊ नयेत ही आपली सामूहिक जबाबदारी आहे हे त्यांना पटले. यानंतर आम्ही गावात कृत्रिम जलाशयात मूर्तीच्या विसर्जनाचा आणि शाडू मातीच्याच मूर्तींचा आग्रह धरतो. इतकेच नव्हे तर माझ्या शाळेतले विद्यार्थी स्वत: शाडूच्या गणेशमूर्ती बनवून त्याची विक्री करतात. जलसाक्षरतेविषयी सातत्याने केलेल्या जनजागृतीमुळे माझ्या शाळेतील विद्यार्थी जबाबदार नागरिक होण्याच्या मार्गावर आहेत, याचे मला समाधान वाटते.

- जयवंत ठाकरे.

No comments:

Post a Comment