Wednesday 3 January 2018

घोषणेतलं ‘आनंददायी शिक्षण’ इथे भेटतं...

“काय गं, खिचडी खाल्लीस का? हात स्वच्छ धुतलेस का? आस्थेने, आपुलकीने आपल्या शाळेतल्या विद्यार्थींनींची विचारपूस करणार्‍या मुख्याध्यापिका सुजाता पाटील आणि तेवढयाच आनंदाने प्रतिसाद देणारी विद्यार्थिंनी पाहताच मन हेलावलं. 
अलिबागच्या कुरुळ गावातल्या सु.ए.सो शाळेत ‘नवी उमेद’ने नोव्हेंबर महिन्यात बालहक्क सप्ताहात फेसबुक लाइव्ह केलं होतं, तेव्हा माझं तिथे जाणं झालं. मला ही शाळाभेट छान अनुभव देऊन गेली. शाळा म्हटलं की मुलांचा गोंगाट, शिक्षकांच्या ओरडण्याचे आवाज, छोट्या इयत्तेतल्या मुलांचं रडणं असं माझ्या मनात होतं. इथे आल्यावर मात्र भ्रम दूर झाला. शाळेत सगळेजण अगदी शांतपणे आपापली कामं करत होते. शिक्षकांशी बोलताना जाणवलं, की ते शिक्षक कमी आणि मुलांचे पालक जास्त आहेत. मुलं शिक्षकांभोवती इतक्या जिव्हाळ्याने वावरत होती, जणू आपल्या आईभोवतीच आहेत. एकंदरीत, शाळा एका घरात राहाणार्‍या एकत्र कुटुंबासारखी भासत होती. सुजातामॅडम प्रत्येक मुलाची कहाणी सांगत असताना जणू त्या मुलाची आई आता मीच.... इतकं मायेने सांगत होत्या.
१९९२ ला अलिबाग कुरुळ गावी सृजन प्राथमिक विद्यालय आणि सु.ए.सो. माध्यमिक शाळा ॲड प्रमोद आणि सुजाता पाटील या पतीपत्नींनी एका चाळीत सुरू केली. अनेक अडचणींवर मात करत तिला मोठं, सुसज्ज केलं. प्राथमिक शाळा स्वयंअर्थसहाय्यित आहे. या शाळेची पटसंख्या १२५. शिक्षकसंख्या ८. आणि अमराठी भाषक मुलं सुमारे ६० टक्के. माध्यमिक शाळा अनुदानित. पटसंख्या १५४. शिक्षक ९. अमराठी भाषक विद्यार्थी सुमारे ५० टक्के. दोन्ही शाळांत, प्रत्येक वर्गात मुलांची संख्या २० ते २५ एवढीच. इथल्या वर्गात लक्ष वेधून घेतात भिंतीवर खाली लावलेले फळे. तसं का? तर मुलांच्या उंचीप्रमाणे त्यांना फळे वापरता यावेत, म्हणून. प्रत्येक मुलासाठी स्वतंत्र फळा, ज्यावर स्वत:ला वाटेल ते मुलं लिहू, रेखाटू शकतो. विचार करा, सिमेंटची भिंतही नसलेल्या पक्क्या घरांपासून वंचित असलेल्या मुलांना इथे स्वत:चं विश्व मुक्तपणे रेखाटायची संधी मिळते. मुलांनी आपापल्या फळ्यावर रेखाटलेली चित्रं मोठ्या आवडीने आम्हाला दाखवली. घोषणेतलं ‘आनंददायी शिक्षण’ आम्हाला इथे दिसलं.
मोठ्या इयत्तेतील मुलांकरिता सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, computer lab व वाचनालय. शाळेत स्थानिकांहून स्थलांतरित, मराठी मातृभाषा नसलेली मुलं अधिक आहेत. परप्रांतीय मुलांना तुम्ही कसं सामावून घेता? आम्ही विचारलं. सुजाता पाटील म्हणाल्या, आम्ही त्यांना मराठी शिकवून मेन स्ट्रीम मध्ये सामावून घेतो. आर्थिक हातभार लावण्याकरिता पालकांच्या कामात मदत करणार्‍या मुलांना ही शाळा शिक्षण देते. एकीकडे राज्यात पटसंख्या कमी असल्याने १,३०० शाळा एकाच वेळी बंद करण्याचा निर्णय सरकार घेतयं आणि दुसरीकडे स्थलांतरित मुलांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचे अचाट प्रयत्न सुजाता पाटील आणि त्यांचे शिक्षक करत आहेत. विद्यार्थी आणि फक्त विद्यार्थीच केंद्रस्थानी ठेवून ही शाळा चालवली जाते, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यात सरकारी अनुदान तुटपुंजं. प्राथमिक वर्गांना अनुदान मिळतच नाही. अशा अनेक अडचणी. वेळप्रसंगी पदरमोड करून पैसे उभे करावे लागतात. तरीही एक सामाजिक जबाबदारी म्हणून पाटील पतीपत्नी ही शाळा चालवतात.
ही शाळा पाहिल्यावर माझं शोधकार्य संपल्यासारखं झालं. माझ्या मनातली आदर्श शाळा मला सापडली. मला तिथल्या आनंदी विद्यार्थ्यांचा चक्क हेवा वाटला.

- लता परब.

No comments:

Post a Comment