Friday 19 January 2018

मुलांशी बोलणारी शेहनाझची बालवाडी

 मुंबई स्पेशल
बांद्रा म्हटलं की लोकांना मोठ्या इमारती, महागड्या वस्तूंची दुकानं, बॉलीवूड तारकांची घरं, हॉटेल्स वगैरे आठवतं. पण बांद्र्याची एक दुसरी बाजू देखील आहे. इथली स्टेशन बाहेरची छोटी दुकानं, मोडकळीस आलेल्या इमारती, खाटकांची दुकानं आणि झोपडपट्टी वस्तीत राहणारी, रोज मुंबईला सेवा देणारी असंख्य सामान्य माणसं हे देखील बांद्र्याचे वैशिष्ट्य. असं असताना इथल्या वस्तीत शिकण्याची वृत्ती निर्माण व्हावी म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. शेहनाज अन्सारी हे त्यातील एक नाव.
शेहनाझ राहत असलेल्या 'बाझार रोड'च्या वस्तीत टॅक्सी चालविणारे, भाजी विकणारे, खाटीक, छोट्या कारखान्यांमध्ये काम करणारे असे अनेक लोक होते. यांची मुलं म्हणजे त्यांच्या कुटुंबातील शाळेत जाणारी पहिली पिढी होती. अशा परिस्थितीत शेहनाझने २००५ ह्या वर्षी ‘प्रथम’ संस्थेच्या मदतीने बालवाडी सुरु केली. अजूनही ती सुरु आहे. आता, ज्या मुलांचे आई-वडील कधीच शाळेत गेले नाहीत, त्यांना शाळेचं सोडा, पण बालवाडीचं महत्त्व तरी कसं समजावायचं? त्यामुळे जेव्हा शेहनाझ त्यांच्या घरी जाऊन, तुमच्या मुलाला माझ्या बालवाडीत पाठवा असं सांगायची तेव्हा '३ वर्षाच्या मुलाला काय करायचं शिकवून' असे प्रश्न तिच्यासमोर उपस्थित केले जायचे.
एक तर, महानगरपालिकेची शाळा पहिलीपासून सुरु व्हायची. आणि त्याआधी शिकण्याची काही सोय नव्हती. तिथं खाजगी बालवाड्या नव्हत्या असं नाही, पण त्या सधन कुटुंबातल्या लोकांसाठी होत्या. त्यामुळे वस्तीतली मुलं जेव्हा शाळेत जायची, तेव्हा जेमतेम दोन वर्ष शाळेत टिकायची आणि नंतर काही जमत नाही, म्हणून शाळा सोडून द्यायची. शेहनाझने तिथल्या लोकांना हे लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केला. पण हे समजावून सांगणं सोपं काम नव्हतं.
पहिल्या वर्षी तिच्या बालवाडीत ८ ते १० मुलं होती, आणि ही संख्या नंतरच्या वर्षांमध्ये वाढत गेली. शेहनाझच्या बालवाडीत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संवाद! ती सतत मुला-मुलींशी बोलत असते. मुलांशी बोलल्यामुळे ती खुलतात, आणि नंतर सर्व गोष्टी ती घरी जाऊन त्यांच्या पालकांना सांगतात. तिच्याच शब्दात सांगायचं तर, ती मुलांद्वारे त्यांच्या पालकांशी संवाद साधते. अक्षरं आणि अंक शिकताना जे खेळ होतात, ते मुलं घरी जाऊन सांगतात. त्यामुळे मुलं काय करत आहेत हे पालकांना समजतं. त्याशिवाय लसीकरण, पोषक आहार आणि एकूण स्वच्छता ह्या बाबत ती पालकांशी विशेष संवाद साधते. त्यामुळे झालेला एक छोटासा, पण महत्वाचा बदल ती आवर्जून सांगते. "आज मुलं त्यांच्या डब्यात घरी बनवलेलं जेवण घेऊन येतात. मी त्याचे महत्त्व सांगायच्या आधी बाहेरचे पदार्थ म्हणजे वडा-पाव, चिप्स वगैरे दिलं जायचं."
शेहनाझचं काम इथंपर्यंत सीमित राहिलेलं नाही. तिने अजून काही मुली तयार केल्या. त्यांनीही पुढं त्यांची बालवाडी सुरु केली. मदत करायला 'प्रथम' होतंच. पण शेवटी हा बदल घडवून आणला ह्या महिलांनीच!
- आशय गुणे

No comments:

Post a Comment