Monday 1 October 2018

मुलांना हवं संरक्षित वातावरण


एक नवजात बाळ जन्माला आलं आहे.. घराकडून, घरातल्या वडिलधार्‍यांकडून त्याला गरज आहे चांगल्या संगोपनाची, काळजीची. आजूबाजूचे वातावरण आणि शिक्षण हे मुलांच्या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडते. किती पालक खरंच आपल्या मुलासाठी सुरक्षित आणि त्याला प्रोत्साहन देणारं वातावरण बनवण्यासाठी प्रयत्नशील असतात? घरातील अशा वातावरणामुळेच वाढत्या वयातील मुलांना उत्तेजन मिळू शकते. खरंतर ही अगदी साधी गरज. पण आपण याबद्दल काळजी घेतो का? बरीच मुलं यापासून वंचित असलेली बघायला मिळतात.
मायेची उब असणारी जवळीक किंवा माणसांशी घट्ट नातं ही पहिली पायरी असते. पालकांकडून किंवा सांभाळणार्‍या व्यक्तींकडून मुलांच्या शारिरिक आणि भावनिक गरजा नीट समजून घेण्याकडे कल असेल तर लहान मुलं सुरवातीपासूनच आपल्याशी एक नातं तयार करु शकतात. संशोधनामध्ये असं दिसतं की, लहानपणापासून संरक्षित वातावरणात वाढलेल्या मुलांची सामाजिक आणि मानसिक कौशल्यं जास्त चांगली असतात. याउलट असुरक्षित नातेसंबंध असलेल्या वातावरणामध्ये वाढलेल्या मुलांमध्ये काही काळाने शिक्षणविषयक किंवा वर्तनात्मक समस्या आढळून येतात.
मुलांच्या लहान वयातल्या विकासासंदर्भात काम करणार्‍या तज्ञांच्या म्हणण्यानुसार आपण ह्या मूलभूत गरजांची जाणीव पालकांना आणि वडीलधार्‍या व्यक्तींना करून द्यायला हवी. मुलांची काळजी कशी घ्य़ावी, त्यांच्या वयाशी सुसंगत असणारे खेळ त्यांच्याशी कसे खेळावेत हे मार्गदर्शन सध्याच्या पालकांना आवश्यक आहे.
खरंतर अशावेळी आर्थिक कमतरतेचा प्रश्न नसतोच, तो असतो पालकत्त्वामधल्या अपुर्‍या कौशल्यांचा. आज बालमानसतज्ञ म्हणून काम करताना मी अश्या अनेक आया बघितल्या आहेत ज्यांना २ वर्षाच्या मुलांशी कसं बोलायचं किंवा खेळायचं ते कळत नाही. एकत्र कुटुंब पद्धतीचा होत जाणाऱ्या र्‍हासाचा संगोपन पदधतीवर कसा परिणाम होऊ शकतो ह्याच हे उदाहरण.
आजोबा किंवा काकांचे मुलांना पाठीवर बसवून घोडा घोडा खेळणे, किंवा आजीने लहान मुलांना त्यांच्या आईवडिलांच्या लहानपणीच्या गमतीजमती सांगणे, आईबरोबर बसून मटार सोलणे, भाज्या निवडणे अश्या दैनदिन जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा मुलांच्या आयुष्यात खेळाचे पर्याय आणि आणि मानसिक दृष्ट्या मिळणारे उत्तेजन यावर परिणाम होत असतो.
सध्या तर तंत्रज्ञानाने मुलांच्या संगोपनासाठी एक मोठाच पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. आधुनिकीकरण आणि वेळेची कमरतता यामुळे इलेक्ट्रॅनिक उपकरणांवर अवलंबून रहायची वेळ आली आहे. जी मुलं अजून धड बोलायला ही शिकलेली नाहीत ती मोबाईल फोन हाताळायला अगदी सहज शिकली आहेत आणि त्यावरती त्यांचे आवडते युटयुब व्हिडीओज ही सहज बघतात. पण हे शिक्षण खरचं पर्याय ठरु शकतं का? हल्लीच्या काळात आता हे आपल्याला ही माहित झालय, की हा इलेक्ट्रॅनिक उपकरणांवर वाढता वेळ मुलांच्या बाबतीत भाषेबाबत विलंबाचं आणि वर्तनात्मक समस्यांचं एक महत्वाचं कारण ठरतोय.
पालकत्त्व हे जरी वेळखाऊ काम असलं तरी यामधूनच पालक मुलांमध्ये बोलणे, गप्पा मारणे, वाचणे, गाणे, नाचणे अशी अनेक कौशल्यांची देवाणघेवाण होत असते. स्क्रीन हा कधीच पालक, शिक्षक आणि अन्य कशाचीच जागा घेऊ शकत नाही. समोरासमोर होणारा संवाद किंवा मानवी प्रतिक्रियांची देवाणघेवाण ह्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. पालकत्त्वाचा आनंद यातून शोधा, अनुभवा, त्याचा आनंद घ्या.
वरील कौशल्यांशी ओळख झालेली मुलं बौद्धिक चाचणीमध्ये, पूर्व शैक्षणिक कौशल्यांमध्ये, प्रत्यक्ष करायच्या कामांमध्ये ठळकपणे उजवी ठरतात. यासाठी मुलांच्या आयुष्यातली पहिली काही वर्ष फार महत्त्वाची असतात. या वेळेला त्यांच्या मेंदुच्या मज्जासंस्थेची क्षमता विकसित होत असते. अनेक लाखो, अब्ज एवढ्या चेतापेशींची जोडणी या काळात मेंदुमध्ये घडत असते, आणि त्याचा वापर होणे ही तितकेच आवश्यक असते. मेंदुमध्ये संरचनात्मक आणि कार्यशील बदल हे फक्त अनुभव आणि शिक्षण यातूनच निर्माण होऊ शकतात.
पुष्कळ वेळेला माझ्या पेशंट्समध्ये वडील म्हणून असणारी पालकांची भूमिका या विषयांसंदर्भात चर्चा होते. ह्ल्लीच्या काळात आधुनिक वडिलांची भूमिका नक्कीच बदलते आहे आणि हे वडीलही पालकत्वामध्ये सजगपणे भाग घेताना दिसत आहेत. पण तरीही यासंदर्भातले सिद्धांत आणि प्रत्यक्षातली परिस्थिती यात फरक आहेच. काही वडिलांचं म्हणणं आहे की पालकत्वामध्ये त्यांना दुय्यम स्थान मिळतं. तसंच कुटुंबामध्ये किंवा विशेषत: पत्नींकडून (आयांकडून) वडील उगाचच त्यांची जागा बळकावत असल्याचा, किंवा आईच्या भूमिकेची नक्कल करत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो.
या विषयांसंदर्भातल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, मुलांच्या बाल्यावस्थेमध्ये वडिलांचं त्यांच्याबरोबर असलेले नातं आणि जवळीक हे मानसिक व भावनिक दृष्ट्या मुलांच्या बाबतीत खूप परिणामकारक ठरते. आणि मुलांच्या नंतरच्या वर्तनावर त्याचा जबरदस्त प्रभाव आढळतो.
पालकत्वामधला महत्त्वाचा भाग म्हणजे प्रोत्साहन अ्थवा कौतुक, प्रेम. हे सुरक्षित नातेसंबंधामधले महत्त्वाचे घटक. जेव्हा मुलं सुरवातीपासूनच एखाद्या सकारात्मक गोष्टींना सुंदर पद्धतीने सामोरी जातात ते त्यांच्या भविष्यातल्या चांगल्या वर्तनाचा जडणघडणीची गमक ठरतं.
यशस्वी बालविकासाची दु-सूत्री म्हणजे उत्तेजन आणि प्रोत्साहन. तसंच आई वडिलांनी प्रत्येक दिवसातला मुलांना दिलेला काही मिनिटांचा वेळ हा एक सर्वोत्तम वारसा असतो.
- डॉ. लीना श्रीवास्तव. विकासात्मक बालरोगतज्ञ

No comments:

Post a Comment