Friday 19 October 2018

पालकांकडून लिहून घेतलं की, गजाला १८ वर्षांची होईपर्यंत तिचं लग्न करणार नाही

 

भांडुप उपनगरातली एक शाळा. दहावीचा वर्ग. अवखळ, वयात आलेल्या मुली आणि त्यांचा एकच गलका. आज गजाला मात्र कोपऱ्यातल्या बाकावर मान खाली घालून गप्प बसली होती. वर्गात सर आले तरी ती उभी राहिली नाही. हे पाहून मुली तिची थट्टा करू लागल्या. गजाला मात्र उदास होती. आता मात्र तिच्या मैत्रिणीही गप्प झाल्या. काहीतरी गंभीर बाब असावी हे सरांच्याही ध्यानात आलं.
शाळा सुटल्यावर गजाला टीचर्स रूमच्या बाहेर सरांना भेटली. तिचं शाळेत येणं बंद होणार होतं . तिची सावत्र आई तिचं लग्न लावून देत होती पण गजालाला लग्न न करता पुढे शिकायचं होतं. सरांनाही ऐकून धक्का बसला. तशी ती अभ्यासातही हुशार होती. तिची हुशारी वाया जाणार म्हणून त्यांनाही वाईट वाटलं. गजाला सरांना विनवणी करत होती की तुम्ही घरी येऊन अम्मीला समजवा की मला पुढे शिकायचं आहे. सरांनी तात्पुरता दिलासा देऊन तिला घरी जायला सांगितलं.
दुसऱ्या दिवशी सर गजालाच्या घरी गेले. गजालाच्या अम्मीला समजावलं. पण ती ऐकायला तयारच नव्हती. गजालाची जबाबदारी घेणार नसल्याचं, तिला शिक्षण देण्यास असमर्थ असल्याचं स्पष्टपणे सांगितलं. तिच्या शिक्षणाची जबाबदारी शाळा घेईल, असं सांगूनही अम्मी तिच्या निर्णयावर ठाम होती. सर निराश होऊन परतले.
त्यानंतर गजाला शाळेत आली नाही. वर्गातील मुलींनी गजलाचं लग्न ठरल्याची बातमी आणली. सर अस्वस्थ झाले त्यांना मार्ग सुचत नव्हता. त्यांनी परिसरातील जनवादी महिला संघटनेकडे संपर्क साधला. एका 15 वर्षाच्या मुलीचं लग्न 37 वयाच्या पुरुषाबरोबर लावलं जात असल्याचं संघटनेच्या सुगंधी फ्रांसिस यांना कळलं. त्या ताबडतोब गजालाच्या घरी गेल्या. तिथे त्यांना असं काही होणार नाही याची खात्री दिली गेली.
तरीही, सुगंधीताई त्यांच्यावर लक्ष ठेवून होत्या. एके दिवशी गजालाच्या घरात पाहुणे दिसू लागले, गडबड जाणवू लागली. सुगंधीताईंना खबर लागली. कुसुम आणि विद्या या कार्यकर्त्यांसह त्या गजालाच्या घरी पोचल्या. लग्न लावण्यासाठी काजीदेखील हजर होता. हा बालविवाह असून कायद्यानुसार गुन्हा असल्याचं त्यांनी सर्वांसमक्ष पुन्हा गजालाच्या कुटुंबाला बजावलं. तिथे आलेल्या पाहुण्यांना मुलगी फक्त 15 वर्षाची आहे, याची कल्पना नव्हती. तेही विरोधात उभे राहिले. गजाला, तिचे पालक, लग्नाचं वऱ्हाड यांना पोलीसठाण्यात नेलं. तिथे पालकांकडून लिहून घेतलं की, 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत गजालाचं लग्न लावण्यात येणार नाही. या अटीवर मुलीच्या पालकांवर केस दाखल झाली नाही. समजुतीने प्रश्न सोडवला.
हे गेल्या वर्षी घडलं. आज, गजालाचं शिक्षण सुरळीत सुरू आहे. सुगंधीताई सांगतात, ''तिची अम्मी नाराज दिसते. पण ती संघटनेला वचकून आहे.''
वाचकहो, तुम्ही या मालिकेतल्या स्टोरीज वाचून, अधिकाधिक शेअर करून आमच्या या मोहिमेत सहभागी व्हावं, हेच कळकळीचं सांगणं. कारण, नकोच करूया लगीनघाई!

- लता परब.

No comments:

Post a Comment