Monday 1 October 2018

बाबाचं मनोगत : आणि त्याच्या त्या वाक्याने माझ्यातला बाप खरोखर सुखावला

बाप काय असतो त्याचवेळी समजते ज्यावेळी आपण आपल्या मुलाला पहिल्यांदा पाहतो आणि हातात उचलून घेतो. मलाही माझा बाबा मानसचा जन्म झाला त्यावेळी समजला. मूल लहान असते त्यावेळी ते फक्त हट्ट करत असते. त्यांच्या गरजा भागविण्यासाठी रडते, अगदी साध्या साध्या गोष्टीवर खळखळून हसते. बाप हा संरक्षक किवा गरजा पुरवणारी व्यक्ती असतो. भावनिक दृष्ट्या मूल आईला जवळ असते. एखादया वस्तुसाठी रडणं आणि हसणं यांच्या पुढच्या भावना समजायला यायला उशीर असतो . . आणि त्या भावना येतात तेव्हा आपलं मूल आता मोठ होत चाललंय याची बापाला जाणीव होते. अशा जाणिवेचा एक प्रसंग. 
हृदयाची ऑपरेशन करणारा डॉक्टर असल्याने कामाच्या व्यापात मुलांच्या भावना इतक्या जवळून अनुभवता येत नाहीत. पण त्या दिवशी मला वाटलं माझा छोटा मानस आता मोठा झालाय. पाचवीच्या वर्गात असलेला दहा वर्षाचा मानस रात्रीच्या जेवणाच्या वेळी माझ्याकडे पहात होता. मधूनच त्याच्या आईकडे पहात होता. त्याला काहीतरी सांगायचं आहे असं वाटत होतं. शेवटी आईच म्हणाली मानसला तुला काही सांगायचे आहे का? मी मानसकडे पाहिलं. मानस थोडासा अवघडल्यासारखा वाटत होता. आज जरा काही वेगळाच दिसत होता. पहिल्यांदा वाटलं काहीतरी चूक केलीय. गडबड झालेली दिसतेय. म्हणून असा दिसतोय. पण नंतर तो बोलू लागला, "बाबा आज शाळा सुटली पण गाडी यायला वेळ होता. मग मी शाळेच्या गेट वरच गाडीची वाट पहात बराच वेळ उभा राहिलो. गाडीची वाट पाहत होतो तिथे एक वॉचमन अंकल होते त्यानी मला माझं नाव विचारले. कोण रे तू ? कशासाठी वाट पाहतोय? मी माझं नाव सांगितलं. मानस अंधारे. मी नाव सांगितल्यानंतर तो वॉचमन माझ्याजवळ आला. मला विचारले ते डॉक्टर विजय अंधारे तुझे कोण रे ? मी म्हणालो, माझे बाबा आहेत ते!" तर तो म्हणाला, " तुझे बाबा खूप चांगले आहेत. ते एक देव माणूस आहेत. आमच्या इथल्या एका गरीब माणसाचा पण त्यांनी जीव वाचवला. खरंच तू नशीबवान आहेस. तुझे बाबा एवढे चांगले आहेत." असा मानस बोलला आणि त्याचे डोळे भरुन आले. तो रडू लागला. माझ्यासाठी हे खूप नवीन होतं. मानसला यापूर्वी मी असं कधी पाहिलं नव्हतं. मी त्यावेळी थोडे हसुन बोललो, "अरे, ते तर माझं कौतुक करत होते मग का रडतोयस ? " त्यावर त्यांचं उत्तर अालं, “बाबा मला तुझा अभिमान आहे.. I am proud of you Baba".
...मला कळालं, मानस मोठा झालाय. त्याला चांगलं, वाईट समजण्याची कुवत आली आहे. आपला बाबा काहीतरी चांगलं काम करतोय हे त्याच्या लक्षात येत आहे. आणि त्यालापण त्याच्या बाबासारखं एक चांगला व्यक्ती व्हायचं आहे. पण मी पुढे बोललो. "हे बघ, बाबा अाज जे कमावतो ना ते योग्य गरजूना देणार. तुला फक्त शिक्षण देणार आहे .मग तू ठरव खरंच तुला तुझ्या बाबांचा अभिमान आहे की नाही! विचार कर आणि सांग. त्यावर तो म्हणाला "हो हो आहे. बाबा तू जे करणार ते बरोबर असेल. मला चालेल. मी पण असेच काम करेन की तुला अभिमान वाटेल" I already felt proud. डॉक्टर म्हणून रूग्ण बरा करण्यासाठी केलेले प्रयत्न, मिळालेलं यश आणि ज्यांच्या मानसिक पाठिंब्यावर आपण हे सगळं करतो त्यांची समर्थ साथ तिही इतक्या लहानवयात… डॉक्टरच्या जीवनात हा दुग्ध शर्करा योग दुर्मीळ. तो मला जाणवला. आणि त्याच्या त्या वाक्यानी माझ्यातला बाप खरोखर सुखावला.
बाबाचं मनोगत :डॉ. विजय अंधारे. हृदय शल्यविशारद.

No comments:

Post a Comment