Friday 12 October 2018

ज्या वयात मुलींच्या हातात पेन, पुस्तक हवं, त्या वयात त्यांच्या हातात पाळण्याची दोरी होती!

तिचं नाव जयश्री. घरची परिस्थिती बिकट. आई-वडील मजूर. 2008-09 मध्ये त्यांनी तिला पहिलीत दाखल केलं. त्या वयातही घरचं काम आटपून ती शाळा शिकू लागली. 2012 च्या चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ती जिल्ह्यात गुणवत्ता यादीत झळकली. आता स्वप्न माध्यमिक शिक्षणाचं. शाळा सुरू झाली. पण... ती वयात आली. आणि घरच्यांनी लगीनघाई केली. तिच्या ऐन उमेदीच्या शिकण्याच्या वयात तिचं लग्न लावून दिलं. नुकताच मी तिचा शोध घेतला. तेव्हा असं समजलं की, दोन वर्षांपूर्वी जयश्रीचं लग्न झालं. आणि आता ती एका मुलाची आई आहे. शिक्षण घेऊन अधिकारी व्हायचं स्वप्न पाहणारी जयश्री आज घरात मुलाला सांभाळत बसली आहे.
ही घटना रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातली. इथल्या पाले खुर्द या आदिवासी वाडीवर मी 2006 साली शिक्षक म्हणून नोकरीला लागलो. ती शाळा चौथीपर्यंत. सलग 10 वर्ष त्याच ठिकाणी काम केलं. या 10 वर्षात आदिवासी लोकांचा जगण्याचा, त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा संघर्ष जवळून पाहण्याची संधी मिळाली. मुलांना कोणत्या परिस्थितीतून शिक्षण घ्यावं लागतं. त्यातही आई-बाप कामावर गेल्यावर धाकट्या भावंडांना सांभाळणाऱ्या मुलींनी शिक्षण घेणं किती संघर्षाचं असतं ते पाहिलं. 2006 ते 2016 या काळात चौथीच्या10 तुकड्या शिक्षण घेऊन पुढे गेल्या. आपण एवढं तयार करून, शिकवून विद्यार्थी पुढं पाठवतो. या मुलांचं नंतर काय होतं? हे माझे विद्यार्थी सध्या काय करत आहेत, ते बघावंसं वाटलं. आणि सुरू झाली शोधमोहीम. याच शोधमोहिमेत ही जयश्री सापडली.
मी अगोदर 10 वर्षातील सर्व विद्यार्थ्यांची यादी काढली. त्यांची नावं शोधली, मुलं आणि मुलींची स्वतंत्र माहिती घ्यायला सुरवात केली. आणि धक्कादायक माहिती मिळत गेली. मन सुन्न होत गेलं. ज्या वयात मुलींच्या हातात पेन हवं, पुस्तक हवं, त्या वयात त्यांच्या हातात पाळण्याची दोरी होती.
या पाड्यात 30 ते 35 घरं. 2006 ते 2012 या वर्षात चौथीला शिकत असलेल्या माझ्या 19 विद्यार्थिनींची ही आकडेवारी. 2006 साली चौथीला असणारी मुलगी आज 2018 ला पदवीशिक्षण घेत असली पाहिजे. तर 2012 साली चौथीला असणारी मुलगी 10 वीला असली पाहिजे, पण इथे काय परिस्थिती आहे पहा.
2006 ते 2012 पर्यन्त 19 मुलींचा शोध घेतला.
19 पैकी 17 मुलींना शिक्षण दहावीच्या अगोदर सोडावं लागलं.
19 पैकी फक्त 2 मुली 12 पर्यंत शिकल्या.
19 पैकी 15 मुलींचा बालविवाह झाला. त्यातील बऱ्याच मुलींना आज मुलं आहेत.
म्हणजे,
7 वर्षात 89% मुलींना घरची आर्थिक परिस्थिती, गरिबी यामुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. अवघ्या 11% मुली 12 वी पर्यंत शिक्षण घेऊ शकल्या. उच्च शिक्षण तर खूप लांब राहिलं.
ही आकडेवारी एका छोट्याशा 30 घरांच्या आदिवासी पाड्यावरची आहे. राज्यात असे हजारो आणि देशात लाखो पाडे आहेत. तर मुलींच्या शिक्षणाबाबतचं देशातलं वास्तव काय असेल?
दोष कोणाचा, जयश्रीचा? पालकांचा? गरिबीचा? की जयश्री एक मुलगी आहे याचा...?

- गजानन पुंडलिकराव जाधव.

No comments:

Post a Comment