Monday 1 October 2018

ताईनं दिलं जगण्याचं बळ


30 सप्टेंबर 1993 ची सकाळ. नागपुरातल्या महिला आयोगाच्या कार्यक्रमासाठी, भल्या पहाटेच नीलमताई गो-हे आणि त्यांच्या कार्यकर्त्या नागपूरच्या दिशेने रवाना झाल्या होत्या. पण वाटेतच त्यांना समजलं की, लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी इथं भीषण भूकंप झाला आहे. आणि हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. लगेचंच नीलमताईंनी तातडीने गाड्या लातुरच्या दिशेने वळवल्या. तोपर्यंत लातुरात अनेक स्वयंसेवक, नेते, कार्यकर्ते आणि मदतनीस जमले होते. नीलमताईसुद्धा त्यांच्यातल्याच एक. भुकंपाचं दु:ख हळूहळू कमी होत गेलं तसं, तिथं मदतकार्यासाठी आलेले लोक परतू लागले. मात्र, तिथल्या प्रश्नांचं भलंमोठं वेटोळं मागे तसंच शिल्लक राहिलं होतं.

अनाथ मुली आणि विधवा महिलांचंं आकाश अक्षरशः फाटलं होतं. या महिलांना संकटात टाकून परतायचं, हे काही नीलमताईंच्या मनाला पटेना. इथं शाश्वत आणि चिरंतन काम करण्याची गरज असल्याचं त्यांना जाणवलं. मग सुरू झालं त्यांच्या स्त्री आधार केंद्राचं काम. भूकंप झाला, तेव्हा अगदी सुरुवातीच्या काळात ट्रकच्या ट्रक भरून मदत यायची, धडधाकट लोक धावत जाऊन हवं ते सामान घ्यायचे. पण अनाथ, अबला महिलांना मात्र ते शक्य व्हायचं नाही. परिणामी, गरज असूनही या महिलांना काहीच मिळायचं नाही. हे निलमताईंनी हेरलं आणि त्या अबला महिलांपर्यंत त्यांनी मदत पोचवायला सुरुवात केली. किल्लारीच्या भुकंपात जवळपास चारशे मुली अनाथ झाल्या होत्या. भुकंपामुळे त्या मुलींना भरपूर मदत मिळत होती. त्यामुळे त्यांचे अनेक नातेवाईक येत, आणि या मुलीला आम्ही सांभाळतो असं सांगत. पण ते नीट सांभाळ करतील का, असा प्रश्न होता. हा प्रश्न नीलमताईंनी त्यावेळचे जिल्हाधिकारी प्रवीण परदेशी यांच्यासमोर मांडला. प्रवीण परदेशी यांनी या मुली कुठल्या नातेवाईकांकडे जास्त सुरक्षित राहू शकतील याचा अहवाल ताईंना तयार करायला सांगितला. ताईंनी सखोल अभ्यास करून त्या मुलींना कुणाच्या ताब्यात द्यायचं , हा अहवाल तयार केला. त्यानुसार मुली त्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्या. विशेष म्हणजे चारशेपैकी एकाही मुलीची आजपर्यंत तक्रार आली नाही इतकं हे सर्वेक्षण तगडं होतं. 
अनाथ मुलींबरोबर या भागात विधवा महिलांचाही प्रश्न गंभीर होता. विधवा बाई म्हटलं की तिच्या नशिबी अवहेलना ठरलेलीच. गाव आणि माणसं कशी वागवतील याची शाश्वती नव्हती. त्यावेळी या विधवा महिलांचे दूरदूरचे नातेवाईक यायचे आणि त्यांची शेती आम्ही करतो, असं सांगायचे. पण नीलमताईंनी ठरवलं की, विधवा महिलांनी कुणाच्याही ताब्यात जायचं नाही. या महिलाच स्वत:ची शेती कसतील आणि त्यासाठी स्त्री आधार केंद्र त्यांना मदत करेल.
आज या गोष्टीला 25 वर्ष झाली, तरी स्त्री आधार केंद्र किल्लारी आणि परिसरातल्या 52 गावात या विधवा महिलांना शेती करण्यासाठी मदत करत आहे. गावात एकट्या पडलेल्या या महिलांना जगण्याचं बळ मिळावं यासाठी नीलम गो-हेे यांनी गावागावात महिला संघटना उभारल्या आणि त्यातून या महिलांना जगण्याचं बळ दिलं. 1993 साली उध्वस्त झालेला किल्लारी आणि परिसर आज मोठ्या ताकदीने उभा राहिला आहे. आज या भागात कुठल्याही गावात जाऊन या महिलांना विचारलं तर त्या सहज सांगतात, ‘आम्हाला ताईंमुळे जगण्याचं बळ मिळालं..!’
- दत्ता कानवटे.

No comments:

Post a Comment