Saturday 27 October 2018

इथं अंगणवाडीच्या मुलीही सांगतात जिल्ह्यांची नावं

लातूर जिल्ह्यातील ढोकी येथील जिल्हा परिषद शाळा. ढोकीची शाळा पहिली ते चौथीचीच आहे. ढोकी शाळेचे शिक्षक किरण साकोळे सांगतात, ‘मी उस्मानाबादहून आंतरजिल्हा बदली होऊन इथं रुजू झालो. शाळा सुरू झाल्यानंतरच्या दुसऱ्या आठवड्यात मी सहज कुतूहल म्हणून विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्यात किती तालुके आहेत, त्या तालुक्यांची नावं सांगा असा प्रश्न विचारला. एकाही विद्यार्थ्याला एकूण तालुके किती हे सांगता आलं नाही. काही विद्यार्थ्यांनी एक–दोन तालुक्यांची नावे सांगितली, पण बहुतेकांनी तालुक्यांऐवजी बीड, औरंगाबाद अशी आपल्याला आठवतील त्या शहरांची नावंच ठोकून दिली.’
सर पुढे सांगतात, ‘एकाही विद्यार्थ्याला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची नावे सांगता येत नाहीत हे बघून मी जरा अस्वस्थच झालो. निदान सामान्यज्ञान म्हणून तरी आपल्या जिल्ह्यात किती तालुके आहेत हे सांगता यायला हवे. उद्या एखाद्या अधिकाऱ्याने सहज या विद्यार्थ्यांना तालुके विचारले आणि त्यांना तेही सांगता आले नाहीत, तर ते शिक्षक म्हणून आपले अपयश असेल, असे विचार डोक्यात येऊ लागले. मुलांना जिल्ह्याचा भूगोल आला तर पाहिजे पण तो पारंपरिक घोकंपट्टीतून नको तर खेळातून, समजून घेऊन लक्षात राहायला हवा. त्या दृष्टीने मी विचार सुरू केला.’
फक्त एखाद्या वर्गाला शिकविण्यापेक्षा संपूर्ण शाळेचाच उपक्रम घेऊ, असं सरांनी ठरवलं. त्यांनी प्रथम भूगोलातील लातूर जिल्ह्याचा नकाशा मुलांना दाखविला. लातूर जिल्ह्यात 10 तालुके आहेत, नकाशाची दिशावार कशी रचना आहे ते सांगितलं. मग शाळेच्या मैदानात ते मुलांना घेऊन गेले. लातूर जिल्ह्याचे तालुके ज्या दिशांना आहेत, त्याप्रमाणे मुलांना उभं केलं. प्रत्येक विद्यार्थ्याला चाकूर, रेणापूर, शिरूर–अनंतपाळ, उदगीर अशी तालुक्यांची नावे दिली. प्रत्येकाने मोठ्याने ते नाव म्हणायचं. मग समोर बसलेल्या प्रेक्षक विद्यार्थ्याने तालुकास्वरूप उभे असलेल्या विद्यार्थ्यांच्या हातावर टाळी मारून त्या तालुक्याचं नाव सांगायचं, हा खेळ सुरू केला. या खेळामुळे अगदी काहीच दिवसांत विद्यार्थ्यांचे तालुके तोंडपाठ झाले. अगदी शाळेतील अंगणवाडीची मुलगीसुद्धा राज्यातील 36 जिल्ह्यांची नावे सांगते.
मग सरांनी लातूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांविषयीही असाच प्रयोग केला. लातूरमधून वाहणारी मुख्य नदी मांजरा. एका मुलीला मांजराचे नाव देऊन उभे केले. ती मुलगी मग नदीची माहिती देते. उदा. ‘मी लातूरची जीवनवाहिनी आहे. माझा उगम बालाघाटच्या डोंगररांगात होतो. पुढे वाहताना रेणा, तावरजा, घरणी या नद्या माझ्यात येऊन मिळतात‘ असं ती सांगते. मग बाकीच्या मुलींपैकी कोणी रेणा, कोणी तावरजा बनतं. मांजरा नदीला पुढे उस्मानाबादहून वाहत येणारी तेरणा नदी मिळते आणि त्या पुढे कर्नाटकात वाहत जातात. त्यामुळे आणखी एका मुलीला तेरणेचे नाव दिले आणि मग त्या सगळ्या एकमेकींचा हात धरून वर्गाबाहेर निघून गेल्या, म्हणजे कर्नाटकात पोहोचल्या असे मानण्यात येते.

- स्नेहल बनसोडे–शेलुडकर

No comments:

Post a Comment