Thursday 25 October 2018

वंदनाची गोष्ट : भाग १

का ताई? नाव का नाही लिहिणार माझं? लिहा की - जरुर लिहा - लोकांनाही कळू दे, वंदनानं आयुष्यात कसा दु:खाचा डोंगर उचलला ते. मला भीती नाही. जन्मल्यापासून झगडतीए, आता पुढे काय होणार माहीत नाही. पण मला आजाद व्हायचंय. त्यासाठीच माझी लढाई. 
ताई, लहानपणापासूनच मी अशीच जोरजोरात हसते. मला हळूहळू हसता येतच नाही. माझी लेक दिशा मला म्हणतेसुध्दा, आई तू काय लहान आहेस का? किती मोठ्याने हसतेस! पण तेवढीच गोष्ट माझ्यात राह्यलीय. माझं हसणं. माझी दिशा कशी हुशार आहे, तशीच माझ्या लहानपणी मी हुशार होते. शाळेत जायची मला हौस. पण म्हणतात ना, कधीकधी जवळची माणसंच तुमची दुश्मन असतात. तसंच झालं. बारा तेरा वर्षांची असेन मी. माझी मोठी बहीण तिच्या मुलाबाळांना घेऊन आमच्याकडे राहत होती. माझी सकाळची शाळा. मी रात्री दप्तर भरून ठेवायची, माझी बहीण रात्रीतून ते गायब करायची. माझं लहान वय. मला कळायचं नाही, मी दप्तर शोधत बसायची पण ते मिळायचं नाही, माझी शाळा बुडायची. मग बहीण मला ढिगभर कपडे धुवायला द्यायची. पाण्याचा नळ घरापासून लांब. तिथवर कपड्याचा ढीग उचलून न्यायचा, कपडे धुवायचे आणि घरी आणून वाळत घालायचे. धुणी-भांडी करायची. तिच्या लेकरांना भरवायचं. माझं आयुष्य म्हणजे काम काम काम. शाळा सुटली. मी आयुष्याला जाम वैतागलेले. अशात मला बाबू भेटला. मी सोळाएक वर्षांची असेन. ताई, खरं सांगतेय, या घरच्या कामापासून सुटका होईल, या आशेनेच मी त्याचा हात धरून पळून गेले.
यानं मला दिव्याला नेलं. तिकडं आम्ही दोघं एक झोपडी बांधून राहू लागलो. जे मिळत होतं, त्यात सुख मानून राह्यलो. मी वयानं लहान मुलगीच होते की. पण एक दिवस असा प्रसंग झाला, तो मी काही विसरले नाही. बाबूचे दोन थोराड मित्र एका तेरा-चौदा वर्षांच्या मुलीला घेऊन आले. मला वाटलं, असलं एखाद्याची मुलगी. पण बाबू चपापला. मला म्हणाला, तू त्यांना इथून हाकलून लाव. त्या पोरीचं काही खरं दिसत नाही. त्याचं बोलणं ऐकून माझ्या जिवाचा थरकाप झाला. लक्षात आलं, तिला खराब करायला त्या दोघांनी तिला आणलं होतं. कचरा वेचणारी मुलगी होती. त्यातल्या एकानी तिला प्रेमाच्या थापा देऊन लग्नाचा वायदा केला होता. आपलं लग्न होणार आहे, या विचारानं बिचारी खुश होती. मी तिला आंधोळीचं पाणी काढून दिलं, माझे कपडे दिले. स्वैपाक केला. बाबू आणि ते दोघं घरात आले. त्यातल्या एकाला तीन मुली आहेत, हे मला माहीत होतं. त्याला ओरडून म्हणाले, का हो, तुमच्या मुलीबरोबर असं कुणी वागलं, तर चालंल का तुमाला? तो गप्प बसला पण बधला नाही. त्या पोरीला नंतर कुठे तरी धेऊन जायचा विचार असेल त्यांचा. जेवण झाल्यावर मला म्हणाले, चटई द्या आम्ही तिघं दुसरीकडं झोपू. मी म्हटलं, खबरदार. मी पोरीच्या शेजारी झोपन. तुम्ही पलीकडे पसरा. रात्रभर लाईट सुरू ठेवला. काळजातली धडधड कमी होत नव्हती. ती तेरा वर्षांची, मी सोळा-सतरा. पण तिला सोडलं नाही. पहाटे तिला हळूच उठवलं. बाकीचे झोपले होते. तिला घेऊन रेल्वे स्टेशन गाठलं. ती घाटकोपरला राहत होती. तिचं तिकिट काढलं आणि गाडीत बसवलं. घरी आल्यावर, ते दोघं विचारू लागले, ती कुठं गेली. मी म्हटलं, पाठवलं मी घरी तिला. आता तुम्ही निघायचं.
........
बाबूचे मित्र असे, हे लक्षात आल्यावर मी त्याच्याशी भांडभांड भांडले. एका पोरीच्या आयुष्यात नासाडी करायला निघालेले तुझे मित्र असे कसे, म्हणून त्याच्यावर खूप ओरडले. पण माझ्या आयुष्यात पुढं काय वाढून ठेवलंय याची कल्पना आली नाही मला. 
शब्दांकन: भक्ती चपळगावकर.

No comments:

Post a Comment