Monday 1 October 2018

३ वर्षात दोनशे महिला उद्यमशील

बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातलं नागझरी. इथल्या राजमणी आणि मीरा शिंदे. रोजच्या कामातून मिळणाऱ्या वेळेचा सदुपयोग करावा, रिकामं बसण्यापेक्षा काहीतरी करावं, असं या दोघींना वाटत होतं. खामगाव कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशिक्षणाविषयी त्यांना कळलं. त्यांनी गावातल्या आणखी काही महिलांना एकत्र आणलं.
प्रशिक्षणानंतर कापडी पिशव्या निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. प्रायोगिक तत्त्वावर विक्रीला आणलेल्या पिशव्यांच्या हातोहात विक्रीमुळे आत्मविश्वास दुणावला. त्यातून झाली ‘महालक्ष्मी बॅग हाऊस’ची उभारणी. "केंद्राच्या प्रशिक्षणामुळे हा व्यवसाय सहज, सुलभ, रोजगार देणारा असल्याचं लक्षात आलं. व्यवसायात उतरण्याचा आत्मविश्वास मिळाला." राजमणी शिंदे सांगत होत्या.
नागझरीप्रमाणेच निपाणी जवळका, बेळगाव, गुळज,शिरूर, पाटोदा,बीड, गेवराई, आष्टी इथल्या २०० हुन अधिक महिला उद्यमशील झाल्या आहेत. रुई इथल्या महिला बचतगटानं अलीकडेच केळी चिप्स तयार करण्याचा उद्योग सुरू केला आहे.
खामगाव कृषी विज्ञान केंद्राच्या कुक्कुटपालन, शेळीपालन, मधुमक्षिका पालन, रेशीम उद्योग, हस्तकला उद्योग, अन्न प्रक्रिया व पदार्थ निर्मिती अशा विविध मोफत प्रशिक्षणाचा लाभ २०१४ पासून महिला घेत आल्या आहेत.
२०१४ पासून केंद्राने हा उपक्रम सुरू केला. केंद्राचे तज्ञ गावागावात जातात. गरजा, आवड लक्षात घेऊन आतापर्यंत सुमारे ४० शिबिरं घेण्यात आली आहेत. कार्यक्रम समन्वयक प्रा. अरुण गुट्टे, विषय विशेषज्ञ डॉ साधना उमरीकर, डॉ दीपक कच्छवे,प्रा किशोर जगताप यासाठी प्रयत्नशील असतात.
-अनंत वैद्य.

No comments:

Post a Comment