Friday 12 October 2018

ऐन वेळी रद्द झालेला एक (बाल) विवाह असाही..!


लग्न मंडपात गुंजत असलेले सनईचे मंगल सूर, आप्तेष्टांची लगबग, मंडपात येणाऱ्या पाहुण्यांच्या हातावर अक्षता ठेवून त्यांचे होत असलेले स्वागत, मंडपामागून येणारा पंचपक्वान्नांचा सुवास, मारुती मंदिराकडून येणारा बँडचा आवाज… आरतीच्या लग्नाची अशी जय्यत तयारी झाली होतीे. नवरी मुलगी आरती नखशिखांत नटली होती. भरजारी शालू, हातावर मेंदी. बोहल्यावर चढायची वेळ झाली. तेवढ्यात.... पोलीस आणि काही अधिकारी मंडपात पोहचले. उपस्थितांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. “पोरगी नाबालिग हाये वाटते, तवाच त् पोलीस आले!” आणि ते खरंच होतं. ‘कुमारी’ आरती ‘सौ’ होणार असल्याची चाहूल लागताच एका समाजसेवकाने या बालविवाहाची खबर ‘चाईल्डलाईन’ला दिली.
यवतमाळ जिल्ह्यात आर्णी तालुक्यात असलेलं भंडारी हे गाव. गावात नाथजोगी समाजाची मोठी वस्ती. हा समाज भटकंती करून उपजीविका करतो. कुटुंबातील पुरूष सतत फिरतीवर राहत असल्याने घरात मुलगी वयात आली की तिचं लग्न लावून देण्याची परंपरा समाजात रूळली. ही प्रथा आजही सुरू आहे. ही घटना मार्च 2018 मधील. आरतीने नुकतीच वयाची 16 वर्षे पूर्ण केली होती. तत्पूर्वी, इयत्ता सातवीपासूनच तिने शाळा सोडली होती. त्यामुळे तिच्यासाठी नवऱ्या मुलाचा शोध सुरू झाला. नजिकच्याच दिग्रस तालुक्यात असलेल्या सावंगा इथल्या याच समाजातल्या एका मुलाचं स्थळ आरतीसाठी तिच्या नातेवाईकांनी शोधलं. पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुलगी पंसत पडली. बोलणी झाली आणि 17 व्या वर्षीच आरतीचं लग्न ठरलं. 28 मार्च 2018 रोजीचा मुहूर्त पक्का झाला. आरतीच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची. त्यामुळे नवऱ्या मुलाच्या गावी हा लग्न सोहळा ठरला. दोन्ही कुटुंबांकडून लग्नाची तयारी झाली. आरतीचं कुटुंब 27 मार्चला तिला घेऊन सावंगा इथे लग्नघरी पोहचले.
‘ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट’ या गावांमध्ये काम करते. या संस्थेच्या आणि चाईल्डलाईन 1098 च्या जिल्हा समन्वयक अपर्णा गुजर म्हणाल्या, “एका कार्यकर्त्याला आरतीचा बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली. त्याने लगेचच ही माहिती ‘चाईल्डलाईन हेल्पलाईन 1098’ वर कळवली. यवतमाळ चाईल्डलाईनच्या सदस्य नलिनी यांनी ही माहिती देणाऱ्या कॉलरसोबत संपर्क साधला. नंतर महिला व बालविकास अधिकारी, बालकल्याण समिती, बालसंरक्षण अधिकारी यांना या बालविवाहाची कल्पना दिली. नलिनी भगत आपल्या टीमसह आरती सातवीपर्यंत शिकत असलेल्या भंडारी गावातल्या जिल्हा परिषद शाळेत पोहचली. शाळेच्या मुख्याध्यापकांना लग्नाबाबत माहिती देऊन आरतीच्या शाळेच्या दाखल्याची झेरॉक्स मिळविली. दाखल्यामुळे कळलं की आरती 18 वर्षांच्या आतलीच आहे. तिचा विवाह बेकायदेशीर असल्याचा पुरावा टीमला मिळाला. हा दाखला घेऊन टीमचे सदस्य दिग्रस पोलीस ठाणे आणि तहसीलदारांकडे पोहचले. तिथे आरती 18 वर्षा आतील आहे आणि तिचं लग्न होत असल्याची माहिती दिली. या माहितीने प्रशासन खडबडून जागं झालं. चाईल्डलाईन टीम सदस्यांसह ठाणेदार आर.डी. शिससाठ, तहसीलदार एस.डी. राठोड, ग्रामसेवक जी.एच. चतूर, प्रकाश चहानकर, महिला पोलीस कर्मचारी हे सारे सावंगा गावात पोहचले. तिथे पोलीस पाटील शरद शिंदे आणि सरपंच लक्ष्मीबाई खडके यांना गाठून गावात होत असलेल्या बालविवाहाची माहिती दिली. ज्या विवाहास आपण पाहुणे म्हणून जाणार तो बालविवाह असल्याचे ऐकून पोलीस पाटील आणि सरपंचही अवाक झाले. सर्वांनी वेळ न दवडता लग्नमंडपाकडे धाव घेतली. तिथे लग्नाची सर्व तयारी झाली होती. घटनेची माहिती कळताच जिल्हा बालसंरक्षण अधिकारी रवी आडे हेसुद्धा पोहचले होते. सर्व अधिकारी वर्गाने आरतीचे आई-वडील आणि नवऱ्या मुलाच्या आई-वडिलांकडे लग्नाबाबत अधिक विचारपूस केली. वधू-वरांसह त्यांच्या पालकांचं समुपदेशन करून त्यांनी हा विवाह रद्द करावा, असा प्रस्ताव ठेवला. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असून तो सिद्ध झाल्यास दोन वर्षांपर्यंत शिक्षा आणि एक लाख रूपये दंडाची तरतूद असल्याची माहिती दिली.
प्रयत्नांना यश आलं. वधू-वरांच्या पालकांनी त्यांची मुलं कायद्याने सज्ञान झाल्यावर हा विवाह करण्यास अनुमती दिली. उपस्थितांनीही टाळ्या वाजवून या निर्णयाचं स्वागत केलं. बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली, त्याच दिवशी तो विवाह थांबवून चाईल्डलाईन आणि प्रशासनाने आपलं कर्तव्य चोख बजावलं. हा बालविवाह तर थांबला, पंरतु आलेले वऱ्हाडी मात्र पंचपक्वानांचा आस्वाद घेऊन आणि बालविवाह विरोधातील जनजागृतीने तृप्त होऊनच मंडपाबाहेर पडले!
वाचकहो, तुम्ही या मालिकेतल्या स्टोरीज वाचून, अधिकाधिक शेअर करून आमच्या या मोहिमेत सहभागी व्हावं, हेच कळकळीचं सांगणं. कारण, नकोच करूया लगीनघाई!
- नितीन पखाले

No comments:

Post a Comment