Wednesday 17 October 2018

शांतिवननं दिला हात म्हणून, त्या बालविवाहितांचं सावरलं आयुष्य


ऊसतोड कामगारांचा जिल्हा,बीड. वर्षातील सहा ६ महिन्यांहून अधिक काळ जिल्ह्यातील ५ लाखांवर मजूर ऊसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकात स्थलांतरित होतात. हेच बालविवाहाचं मूळ. अनेक मुलींचं बालपण करपून टाकणारं. शिकण्याच्या, खेळण्याबागडण्याच्या वयात संसार आणि संकटं झेलणाऱ्या या मुलींच्या कहाण्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत.
शिरुर तालुक्यातील पूजा. ऊसतोडणीसाठी जाताना मुलीला सोबत घेऊन जाणं किंवाएकटीला घरी ठेवणं, दोन्ही धोकादायक. १४ व्या वर्षी पाटोदा तालुक्यातील १९ वर्षांच्या ऊसतोड मजुराबरोबर तिचं लग्न लावण्यात आलं. लग्नानंतर हातात पुन्हा काेयताच. वयाच्या १६ व्या वर्षी पूजा गरोदर राहिली. सातवा महिना सुरू असतानाच एक दिवस पतीचं अपघाती निधन झालं. संसार म्हणजे काय हे नीट उमगायच्या आधीच तिचा संसार संपलाही होता. आईवडिलांनी माहेरी आणलं. तिला मुलगी झाली. सासरच्या मंडळींनी पूजा माहेरी असतानाच तिला सगळ्या संपत्तीतून बेदखल केलं. वंचित मुलांसाठी काम करणाऱ्या शांतिवन संस्थेकडे हे प्रकरण आलं. संस्थेचे दीपक नागरगोजे यांनी पूजाला आधार दिला.
दीपक म्हणतात, ''अवघ्या काही महिन्यांची ज्ञानेश्वरी आणि १७ वर्षांची तिची आई पूजा शांतिवनात दाखल झाल्या. अनेक प्रश्न त्यांच्यासमोर होते. सुरुवातीला तिला मानसिक आधार दिला. समुपदेशन केलं. तिच्या संपत्तीत तिला हक्क मिळावा यासाठी न्यायालयीन लढाई सुरू केली." अॅड अजय राख यांनी हा खटला मोफत चालवला. निकाल पूजाच्या बाजूनं लागला. दरम्यानच्या काळात संस्थेनं पूजाला दहावीच्या परीक्षेला बसवलं. तिला ६५ टक्के मिळाले. पूजाला स्वत:च्या पायावर उभं राहता यावं यासाठी संस्थेनं पुण्यात एका परिचारिका महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. मुलीच्या भविष्यासाठी मुलीला शांतिवनात ठेवून पूजानं प्रशिक्षण पूर्ण केलं. सध्या ती पुण्यात एका रुग्णालयात नोकरी करत आहे .
दुसरी घटना अंबाजोगाई तालुक्यातील. करुणाचं १५ व्या वर्षी गरिबीमुळे आईवडिलांनी लग्न करुन दिलं. काही दिवस चांगले गेल्यावर सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू झाला. चक्क वेश्याव्यवसाय करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जाऊ लागला. करुणानं माहेर गाठलं. पण काही दिवसांनी आईवडिलांनी समजून घालून तिला परत पाठवलं. पुन्हा सासरच्या मंडळींकडून तसाच दबाव. आत्महत्या करण्यासाठी निघालेली करुणा तिच्या एका शिक्षिकेच्या संपर्कात आली. त्यानंतर मानवलोकचे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. द्वारकादास लोहियांकडे हा प्रश्न गेला. त्यांनी तिला शांतिवनमध्ये पाठवलं . शांतिवननं करुणाचंही पालकत्व स्वीकारलं. सध्या ती लातूरला बारावीत शिकत आहे.
''अठराविश्व दारिद्र्य, उद्योगव्यवसायांचा अभाव यामुळे बीड जिल्ह्यात ऊसतोडणीशिवाय पर्याय नाही.'' दीपक सांगतात. ''स्थलांतरामुळे शिक्षण, आरोग्य, बालविवाह या समस्या गंभीर आहेत. बालविवाह होत नसल्याचं जरी सांगण्यात येत असलं, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी बालविवाह होत आहेत. यावर कायम स्वरूपी उत्तर मिळण्यासाठी इथल्या मूळ प्रश्नांवर काम करणं आवश्यक आहे.''
वाचकहो, तुम्ही या मालिकेतल्या स्टोरीज वाचून, अधिकाधिक शेअर करून आमच्या या मोहिमेत सहभागी व्हावं, हेच कळकळीचं सांगणं. कारण, नकोच करूया लगीनघाई! 
- अमाेल मुळे, बीड

No comments:

Post a Comment