Thursday 25 October 2018

‘ड्रॅगन’मुळे फुलली शेती

ड्रॅगन फ्रुट. थायलंड, व्हिएतनाम या देशातील हे फळ. आपल्या देशातील काटेरी निवडुंगा्सारखं दिसणारं. या फळाचं आरोग्यविषयक महत्त्व अधोरेखित झालं. आणि त्याची मागणी प्रचंड वाढत गेली. पौष्टिक मानलं जाणारं, अनेक आजारांवर गुणकारी, कुठल्याही खता-औषधांशिवाय वेगानं वाढणारं, कमी पाण्यावर येणारं हे फळ.
पुण्या-मुंबईत ड्रॅगन फ्रुटला खूप मागणी आहे. सध्या त्याचा दर तब्बल ४०० ते ५०० रूपये किलो आहे. हे ड्रॅगन फळ मराठवाड्यातील उस्मानाबादसारख्या मागास भागात प्रथमच बहरून आलं आहे. जागजी या उस्मानाबाद येथील गावात राम आणि नितीन सावंत भावंडांनी पारंपरिक शेतीला फाटा देत ३२ गुंठ्यावर ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. साधारण वर्षभरापूर्वी लागवड केलेल्या या झाडाला आठ महिन्यातच फळ
आलं. विशेष म्हणजे पूर्णपणे जैविक पद्धतीने या फळाची जोपासना करण्यात आली आहे. याविषयी राम सावंत म्हणाले, “पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात २०-२५ वर्षापासून ड्रॅगन फ्रुटची शेती केली जात आहे. त्यात लोकांना आलेलं यश तपासून आम्हीही शेतात ड्रॅगन फ्रुटची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्यावर्षी सांगली जिल्ह्यातून १६०० रोपं आणून लागवड केली. झाडे म्हणजे पानांना पानांची जोड असते. त्यामुळे दोन पानांमध्ये आधार द्यावा लागतो. त्यासाठी सिमेंटचे ४०० खांब उभारले. पिकासाठी ठिबक सिंचनाचा उपयोग केला. लागवडीसह एकूण दीड लाख रूपये खर्च आला. एरव्ही या फळाला १५० ते २०० रूपये प्रति किलो दर मिळतो. मात्र, सध्या स्वाईन फ्ल्यू आणि डेंग्यूच्या साथीमुळे मुंबई, पुणे, नागपूर या महानगरात ड्रॅगन फ्रुटची मागणी वाढली असून, ४०० ते ५०० रूपये प्रती किलो दराने व्यापाऱ्यांकडून मागणी येत आहे.”
हे फळ दोन प्रकारामध्ये आहे. काटेरी निवडुंगाशी साधर्म्य सांगणारं ड्रॅगन फ्रुट नैसर्गिक वातावरणात वाढतं. त्याला कुठल्याही किटकनाशक औषधांची किंवा खतांची गरज भासत नाही. थायलंडचे फळ लाल तर व्हिएतनामचं फळ पांढरं आहे. दोन्हीची चव सारखीच आहे. डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू, हिवताप, मधूमेह आदी आजारांवर गुणकारी आहेत, असं मानलं जातं. मात्र, त्याला वैद्यकीय दृष्ट्या पुष्टी मिळालेली नाही. सुमारे ४२ अंश सेल्सिअस तापमानातही फळ येऊ शकते, असं सावंत बंधू सांगतात.
लागवडीनंतर वर्षात फळ येण्याची शक्यता असते. मात्र, आठ महिन्यातच फळ आल्याने सावंत बंधुंचा मोठा फायदा झाला. चार महिन्यात त्यांनी ५ वेळा फळांची तोडणी केली. साधारण साडे चार ते पाच टन उत्पादन निघालं. त्यातून ५ ते ६ लाख रुपये मिळाल्याचा दावा ते करतात. फळाचं सरासरी वजन ५०० ते ८०० ग्रॅम आहे. झाडांचं आयुर्मान २५ वर्षे आहे. विशेष म्हणजे, सावंत यांनी ड्रॅगन फ्रुटच्या मधोमध सफरचंदाच्या झाडांची लागवड केली आहे. पुढच्या वर्षापर्यंत त्यातूनही उत्पादन मिळेल, असा त्यांना विश्वास वाटतो. दुष्काळी पट्ट्यात सावंत यांनी केलेला प्रयोग प्रेरणादायी आहे. त्यांच्या वेगळ्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. वेगळी वाट धरली तरच शेतीत राम आहे, असं म्हणायला वाव आहे.
- चंद्रसेन देशमुख.

No comments:

Post a Comment