Tuesday 9 October 2018

त्यांनी निवडलं आयुष्य!

" बाळाच्या मेंदूची वाढ नीट झालेली नाही, मूल जन्माला येईल पण व्यंग असेल, काय करायचं?" डॉक्टरांनी बाळाच्या आईला रिनाला विचारलं. आईने पुढचा कसलाच विचार न करता आपल्या बाळाचं म्हणजे समिक्षाचं आयुष्य निवडलं. डिलिव्हरी नॉर्मल झाली. पण जन्मत:च समिक्षाचं डोकं खूप मोठं होतं. मानेला फुगा. डोळे तिरळे. डोळ्यांवर शस्त्रक्रिया. डोक्यात शण्ट. समिक्षा भालेराव आता १२ वर्षांची आहे.वाढत्या वयाबरोबर पाठीचा बाकही वाढू लागला. समिक्षा जन्मल्यापासून फक्त बसू शकते. झोपणंसुद्धा पोटावरचं. पायाचे स्नायू नीट काम करत नसल्यानं एक पाय सरळ तर एक पाय वाकडा. घरातल्या घरात रांगणारी समिक्षा जिद्दीनं शाळेत मात्र जाते. गोरेगावच्या आरे कॉलनीतल्या महानगरपालिकेच्या शाळेत ती सहावीत आहे. शाळा-अभ्यास, वाचन, हस्तकला, चित्रकला यात ती आपला दिवस आनंदात घालवते. हालचालींवर मर्यादा असल्यामुळे आई पूर्ण वेळ शाळेत थांबते. हुशार,बोलक्या स्वभावाच्या समिक्षाला शिक्षिका आणि इतर सर्व मदत करतात.
समिक्षा, तिचे आईवडील आणि महाविद्यालयात शिकणारा भाऊ वृषभ भाड्याच्या छोट्याशा घरात राहतात. वडील दीपक रिक्षा चालवतात. अपुऱ्या मिळकतीला हातभार म्हणून समिक्षाचा भाऊ अर्धवेळ काम करतो. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी मुलांचं शिक्षण सुरूच ठेवण्याचा आई -वडिलांचा निर्धार आहे. संपूर्ण भालेराव कुटुंब त्यांच्या पाठीशी आहे.
भाटिया ,लीलावती,वाडिया ,बॉम्बे हॉस्पिटल इथं समिक्षावर आतापर्यंत १६ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ऑपेरेशन थिएटरमध्ये जाताना वाटणारी भीती, वेदना यावर मात करणारी समिक्षा किती हिंमतीची आहे हे तिच्या बोलण्यातून जाणवतं. देणगीदारांच्या योगदानामुळे शस्त्रक्रियांसाठी जास्त खर्च आला नाही.
शिक्षणाचं महत्त्व तर ती जाणून आहेच. डॉक्टर व्हायचं असल्याचं ती आत्मविश्वासाने सांगते.
'तारक मेहता का उलटा चष्मा' ही मालिका ती आवडीनं बघते. पाणी-पुरी ,वडापाव हे तिचे आवडीचे पदार्थ. समीक्षा तिचं दुःख आनंदानं जगण्याच्या आड येऊ देत नाही. जिद्दीनं जन्माला आलेली समिक्षा त्याच जिद्दीनं स्वतःच्या पायावर एक ना एक दिवस उभी राहील यात शंकाच नाही !
-मेघना धर्मेश ,
पायात बळ नाही म्हणून काय झालं? मनाचे इरादे तर पक्के आहेत ना !

No comments:

Post a Comment