Saturday 6 October 2018

आता मैदानातल्या मातीतही उमटू लागली आहेत मूळाक्षरं

संध्याकाळचे साडेसहा. एका मैदानावर गोलाकार बसलेली अभ्यासात मग्न असलेली मुलं. त्यातल्याच काही विद्यार्थ्यांना सर इंग्रजीचे उच्चार समजावून सांगत आहेत. मग थोड्या वेळाने एक चिमुरडी पाठ्यपुस्तकातला धडा वाचून दाखवते. थोड्या वेळाने त्यांना मजा करायची हुक्की येते आणि मग बंजारा समाजाची होळीत म्हटली जाणारी गोरमाटी बोलीभाषेतील गाणी 4-5 मुली नाचत- नाचत म्हणतात, सगळे जण टाळ्या वाजवून त्यांना साथ देतात. थोड्याच वेळात अंधार पडतो. मग सर लाईट लावतात आणि विद्यार्थी परत अभ्यासात गढून जातात.
ही आहे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील हिवरखेडा जिल्हा परिषद शाळेतील रात्र अभ्यासिका.
जून 2017 पासून हा रात्र अभ्यासिकेचा उपक्रम मुख्याध्यापक सुनील मोरे यांनी हिवरखेडा शाळेत सुरू केला आहे. याविषयी मोरे सर सांगतात, “2012 सालापासून मी हिवरखेडा शाळेत कार्यरत आहे. मुलांची गुणवत्ता सुधारण्यासाठी माझे नेहमीच प्रयत्न सुरू असतात. पण 2017च्या एप्रिल महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील प्रगत बीट गडहिंग्लजला मी भेट दिली. तिथल्या शाळा, आत्मविश्वासाने पटापट उत्तरं देणारी चुणचुणीत मुलं हे सगळंच मला चकित करून गेलं. मी विचार करू लागलो की माझ्या शाळेतील मुलांनाही असंच चुणचुणीत बनवायला हवं, त्यांच्यात सगळ्या क्षमता आहेत. पण शिक्षक म्हणून मी त्यांच्यावर आणखी मेहनत घेण्याची गरज आहे. आणि त्यातूनच मला रात्र अभ्यासिकेची कल्पना सुचली.”
मोरे सरांची ही कल्पना गावकऱ्यांना खूप पसंत पडली. या हिवरखेडा गावात 90 टक्के बंजारा समाज राहतो. बहुतेकांची शाळेत शिकणारी पहिली किंवा दुसरीच पिढी आहे. या गावातल्या 60 टक्के घरात आजही वीज नाही. त्यामुळे संध्याकाळी शाळा सुटल्यावर अंधार पडल्यावर अभ्यास करायचा म्हटलं तर कंदिल किंवा चिमणीच्या उजेडाशिवाय गत्यंतर नाही. त्यातून मग बरेचदा मुलं अभ्यासाचा कंटाळा करतात आणि मग अभ्यासात मागे पडतात. म्हणूनच 4 वाजता शाळा सुटल्यावर दररोज संध्याकाळी 6 ते रात्री 9 या काळात रात्र अभ्यासिका घेण्याचा निर्णय घेतला.
रात्र अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेतला खरा, पण सरांच्या लक्षात आले की शाळेतसुद्धा वीज नाही. सरांनी ग्रामस्थांची बैठक घेतली. मोरे सर म्हणतात, “घरात वीज नाही म्हणूनच मुलांचा शाळेत अभ्यास घ्यायचा तर शाळेत वीज हवीच, हे लोकांनाही पटत होतं. आमच्या गावचे सरपंच आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल राठोड यांनी तात्काळ त्यांच्या घरातून विजेचं कनेक्शन देण्याची तयारी दाखविली. लाईट फिटिंगसाठी सात हजार रुपयेही दिले, इतकंच नव्हे तर मुलांच्या अभ्यासासाठी कितीही वीजबिल आलं तरी ते मी भरेन, अशी तयारीही दाखविली.”
गेल्या सहा महिन्यात या रात्रशाळेच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली असल्याचं निरीक्षण मोरे सर नोंदवितात. सर सांगत होते, “रात्र अभ्यासिकेमुळे मुलं गटात अभ्यास करतात, त्यामुळे त्यांना मजा येते. पहिलीचे विद्यार्थी तर थेट मैदानातल्या मातीतल्या धूळपाटीवरच आपली पहिली मुळाक्षरे गिरवतात. अवघ्या सहा महिन्यात पहिलीचे विद्यार्थी 1 ते 100 अंक लिहायला, बेरजा करायला आणि एक अंकी संख्येची वजाबाकी करायलाही शिकले आहेत.”

- स्नेहल बनसोडे-शेलुडकर

No comments:

Post a Comment