Friday 26 October 2018

गुन्हेगारी सोडण्याचा त्यांनी केला संकल्प

बीडचं जिल्हा कारागृह. एरवी कारागृहाच्या आवारात फारसे कोणी जात नाही. पण, बीडमधील काही संवेदनशील तरूण एकत्र आले. आणि त्यांनी कैद्यांमध्ये सुधारणा व्हावी, त्यांनी गुन्हेगारी सोडून द्यावी म्हणून प्रयत्न करायचे ठरवलं. सुरूवात झाली, कीर्तनमहोत्सवाने. श्रावणात सलग सात दिवस हा कीर्तनमहोत्सव केला. यात, सात दिवस मान्यवर कीर्तनकारांनी कीर्तनं सादर करून कैद्यांना उपदेश दिला. कारागृहाच्या आतील भागात शेवटच्या दिवशी ग्रंथदिंडी निघाली. टाळ-मृदंगाचा आणि विठू नामाचा जयघोष करत २८१ बंदी दिंडीत सहभागी झाले. काहींनी तर देहभान विसरून पाऊली, फुगडी असे वेगवेगळे खेळ खेळत मनसोक्त आनंद लुटला. ग्रंथदिंडीची प्रदक्षिणा कारागृहातच पूर्ण करण्यात आली.
दिंडी मिरवणुकीनंतर नाना महाराज यांनी, कारागृहात जन्माला आलेले भगवान श्रीकृष्ण कर्माने श्रेष्ठ कसे बनले, हे त्यांच्या चरित्रातील काही प्रसंगांचे दाखले देत सांगितलं. संतविचारांच्या सानिध्यात भक्तीचा आनंद मिळतो. क्षणिक सुखासाठी आयुष्याचा नाश करू नका. इथून पुढे असं चांगलं काम करा, की आयुष्यात पुन्हा कारागृहाची पायरी चढायला नको, असं सांगितलं. मानवी जीवनाचं मुख्य प्रयोजन काय, हे लक्षात घ्या. भरकटलेलं आयुष्य जगून कुटुंब उध्वस्त करू नका. स्वतः उध्वस्त होऊ नका असं सांगितलं.
यावेळी कैद्यांनी चांगलं वागण्याचा संकल्प करत, गुन्हेगारी सोडण्याची शपथ घेतली. कीर्तनमहोत्सवातून मन परिवर्तन झाल्याची पावती देत २५ कैद्यांनी नाना महाराज नेकनूरकर यांच्या हस्ते तुळशीची माळ घालून घेत, गुन्हेगारी सोडून देण्याचा संकल्प केला. तसंच व्यसन करणार नाही, कोणाला नाहक त्रास देणार नाही, परोपकार करू ही ग्वाही दिली. हे कीर्तनमहोत्सवाचे फलितच.
कीर्तनानंतर उपस्थित मान्यवर मंडळीच्या हस्ते गोपाळकाल्याची दहीहंडी फोडण्यात आली. तो प्रसाद बंदी बांधवांना वाटप करण्यात आला.
कीर्तनकार सुरेश महाराज जाधव म्हणाले की, “सुधारणा आणि पुनर्वसन हे कारागृहाचं ब्रीद आहे. ‘जे खंळांची व्यंकटी सांडो’ या पसायदानातील उल्लेखाप्रमाणे दुष्ट प्रवृत्तीचा नाश होऊन कारागृहातील कैद्यात सुधारणा व्हावी, समाजातील गुन्हेगारी थांबावी यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न होता.” .
कारागृह अधिक्षक महादेव पवार म्हणाले, “कारागृहात कीर्तनमहोत्सव झाल्यानंतर वातावरण बदललं आहे. भजन- कीर्तनाचे कार्यक्रम कारागृहात घ्यावेत, अशी मागणी आता कैदी करत आहेत. इथलं वातावरणही शांत आहे. इथून बाहेर पडल्यानंतर आम्ही पुन्हा गुन्हेगारीकडे वळणार नाही, असा संकल्प कैद्यांनी केला असून जवळपास सर्व कैद्यांच्या वागण्या-बोलण्यात सुधारणा झालेली आहे.”
सुरेश महाराज जाधव, कीर्तनकार 
- दिनेश लिंबेकर.

No comments:

Post a Comment