Friday 5 October 2018

बाबाचं मनोगत :महिन्याभराने बघितलं बाळ

२०१० मध्ये माझं लग्न झाल्यानंतर संसाराच्या वेलीवर ईश्वरी नावाचे फुल उमललं. पत्नी आराधना गरोदर असतांना डॉक्टरांनी तिला प्रसूतीची तारीख २५ ते ३१ डिसेंबर पर्यंतची दिली होती. मला तर बाळाचा जन्म ३१ डिसेंबर रोजी व्हावा असं मनोमन वाटायचं. कारण माझा वाढदिवस ३१ डिसेंबरला असतो. मग काय बाप आणि बाळाचा वाढदिवस एकाच दिवशी साजरा करता आला असता. पण असं काही झालं नाही. शेवटी २४ डिसेंबर २०११ रोजी पत्नीला प्रसव वेदना वाढल्या. सकाळी १० वाजता मी दुचाकीवरून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी प्रसुतीची तयारी सुरू केली काही तासात मला ऑपरेशन थिएटरमध्ये बोलावून घेतलं गेलं. बाळाची पोझीशन दोन पायावर बसलेल्या अवस्थेत असून सिझेरियन करावं लागेल, असं सांगितलं गेलं. नाहीतर आईच्या जीवाला धोका होईल असं डॉक्टरांनी सांगताच मी सिझरसाठी होकार दिला. 
थोड्याच वेळात आतून आवाज आला, ‘मुलगी झाली.’ अमावस्येच्या दिवशी माझ्या घरी ईश्वरी नावाची लक्ष्मी आली. अमावस्येला ती झाल्याने मूळ नक्षत्र शांती आली. आणि ती शांती होईपर्यंत शास्त्रानुसार एक महिना बापाला मुलीचे तोंड पाहता येणार नव्हतं. हे जोतिष्यांनी सांगितलं. मग काय, मी पत्नीशी बोलायला आलो की नातेवाईक माझ्या मुलीचा चेहरा झाकून टाकायचे. त्यामुळे माझ्या मनात जन्मलेल्या बाळाबद्दल आणखीच कुतुहल वाढलं होतं. आपली मुलगी कशी दिसत असेल, तिचे डोळे कसे असतील, नाक कसे असेल, ती दिसायला कोणावर गेली आईवर की बाबावर असे प्रश्न मनात घर करून होते. घरात छोटे बाळ आहे. पण आपल्याला पाहता येत नाही या बद्दल मनात थोडी नाराजी सुध्दा होती. घरात सकाळच्या वेळी मुलीला अंघोळीसाठी नेत असतांना ती माझ्या नजरेला ती पडली की, घरातील लोक म्हणायचे तुम्ही इकडे पाहु नका. असा एक महिना मी कसाबसा घरात काढला. शेवटी घरात मूळ नक्षत्र शांतीचा कार्यक्रम ठरला. ईश्वरीला सुपात ठेऊन गाईच्या खालून वर देण्यात आलं. नंतरच मी मुलीला पाहिलं. तिचा चेहरा पाहिल्यानंतर खूप आंनद झाला.
आता लेकीचं लाडाचं नाव छमु आहे. सुरूवातीला घरात पोटावर रांगत असलेल्या माझ्या लेकीने घराचा ताबा कधी घेतला हे कळालंही नाही. ऑफिसला जाण्या अगोदर आणि आल्यानंतर तिची काळजी घेणे, तिला खेळवणे, दवाखाना पाहणे हे सुरू झालं.
ईश्वरीला शाळेची गोडी लागली पाहीजे म्हणून आम्ही तिला बीडच्या संस्कार विद्यालयात इंग्लीश स्कूलमध्ये एलकेजी घातलं. शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत सोडायला गेलो तर रडू लागली. परंतू त्याच दिवशी तिने शाळेत बाईंना कविता म्हणून दाखवली. आणि हळूहळू शाळेत रमली. शाळा सकाळी सात वाजता असल्याने पहाटे साडेपाच पासून मी तिच्या तयारीत असतो. शाळेत शिक्षक दिन असो की, सावित्रीबाई फुले, जिजाऊ जयंती, अशा प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक वेळी भाषणात ती बक्षीस पटकावेतच. शाळेत ही तिने मैत्रिणींचा गोतावळा जमवला आहे. नोकरीत व्यस्त असल्याने मला तिच्या अभ्यासाकडे लक्ष देता येत नाही. परंतु पत्नी मात्र तिचा अभ्यास घेते. आमच्या कुटुंबात आजोबानंतर वडील व वडिलांनतर आम्हालाही बहीण नाही. आता ईश्वरी भाऊबीज व राखीपौर्णिमेला मला राखी बांधते. माझ्या बहिणीच्या रूपातच माझी मुलगी आहे. फेंडशीप डेला तर शाळेत जाण्यापूर्वी तिने मला बेल्ट बांधला आणि म्हणाली, “बाबा सुध्दा एक मित्रच असतात.”
- दिनेश लिंबेकर. पत्रकार.

No comments:

Post a Comment