Tuesday 5 March 2019

आठवी ब च्या मुलांचे शंकासमाधान


काही वर्षांपूर्वीची घटना. साधरणतः ४० वर्ष वयाची एक शिक्षिका, तिला होत असलेल्या मासिकपाळीच्या त्रासासंदर्भात माझा सल्ला घेण्यासाठी ओपीडीत आली. मी तिला तपासून, औषध लिहून दिलं. जाताना ती विचारते, ' सर तुम्ही कौन्सेलिंग करता?' म्हटलं, ‘हो, का बरं विचारताय?’
“मी शाळेत आठवी आणि नवव्या वर्गाला शिकवते. तास संपवून मी वर्गाच्या बाहेर पडताना एक विद्यार्थी माझ्या जवळ येऊन बोलला- टीचर आज तुम्ही खूप सेक्सी दिसताय! मी हदरलेच! मी त्याला काही बोलण्याच्या आतच त्याने धूम ठोकली. तो पळाला. मी विचारात पडले. डॉक्टर तुम्ही सांगा, असा प्रसंग पुन्हा घडला तर तो कसा हाताळायचा?” यावर त्या शिक्षिकेला योग्य सल्ला दिला आणि ती घरी गेली. माझ्या मनात मात्र अनेक प्रश्न एकाच वेळी गर्दी करायला लागले. मी त्या शाळेच्या मुख्याध्यापकाकडे गेलो, त्यांना हा प्रसंग सांगितला. मला तुमच्या शाळेतील आठवी-नववीच्या वर्गातील मुलांशी संवाद साधण्याची इच्छा आहे, परवानगी द्या, अशी विनंती केली. वर्गात कुणीच नाही, फक्त मी आणि मुलं. मुलांशी मुक्त संवाद साधला. मुलांनी त्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या लैंगिक भावनांविषयी अनेक प्रश्न विचारले. मुलांचं हे त्यांच्या लैंगिक भावना उत्तेजित होणारं वय, या संदर्भातील त्यांच्या मनातील शंकांचं समाधान करून देण्यासाठी तर मी आलो होतो. स्त्री-पुरुषाच्या शारीरिक संबंधाबद्दल जवळपास प्रत्येकालाच काहीतरी विचारायचं होतं. मुलांनी कोणते प्रश्न विचारले? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात घोंगावत असणार! हे सारे प्रश्न आणि त्याची शास्त्रीय भाषेतील उकल घेऊन भेटू पुढच्या भागात... टेक केअर!- डॉ किशोर अतनूरकर, नांदेड

No comments:

Post a Comment