Monday 4 March 2019

लोकांना विष द्यायचं नाही..

लोकांना विष देऊन पैसे कमवायचे का? सातारा जिल्ह्यातल्या पाचगणी इथले शेतकरी उमेश भिलार यांना प्रश्न पडला. उत्तरही त्यांनीच शोधलं, नैसर्गिक पद्धतीनं स्ट्रॉबेरी शेतीतून. गेली चार वर्ष ते नैसर्गिकरित्या स्ट्रॉबेरी पिकवत आहेत. मुंबई-पुण्यात त्यांच्या स्ट्रॉबेरीला आज मागणी आहे. सध्या २५० रुपये किलो भाव मिळत आहे. पण त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता.
लेख, प्रदर्शनं यातून भिलार यांना रासायनिक शेतीचे तोटे समजू लागले. नैसर्गिक शेतीकडे वळण्याचा निश्चय झाला. पण हे मोठं आव्हान होतं. कारण एव्हाना त्यांच्या जमिनीची सुपीकता पूर्णपणे नष्ट झाली होती. अशा मृत जमिनीचा कस पुन्हा मिळवण्यासाठी किमान सात वर्ष तरी लागतात. उत्पादन कमी येणं, वेळेवर न येणं, ग्राहक कसे मिळवायचे, घरातून पाठिंबा नाही, अशा अनेक समस्या होत्या. भिलार यांनी अभ्यास करून काही समस्यांवर उपायही शोधले. 

प्लॅस्टिक बाटल्या कापून त्यावर लाल- पिवळा रंग दिला. ग्रीस लावलं आणि स्ट्रॉबेरीवर हल्ला करणाऱ्या कीटकांना रोखण्याचं तंत्र घरीच बनवलं. बाजारात १२ रुपयाला मिळणारा हा सापळा त्यांनी घरी ३ रुपयात केला. रासायनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्याला एका वाफ्यावर १०० किलो उत्पादन मिळायचं तेव्हा भिलार यांना फक्त ३० किलो मिळे. भावही म्हणावा तसा मिळत नसे.
आता एकूण एक एकर क्षेत्र लागवडीखाली असून दररोज सुमारे ८० किलो स्ट्रॉबेरीचं उत्पादन मिळतं. भिलार आधी ग्रामपरी आणि ग्रामपरीच्या माध्यमातून अन्नदाता या संस्थांशी जोडले गेले. त्यामुळे त्यांना बाजारपेठ उपलब्ध झाली. विरोध असूनही घरातली मंडळी त्यांना मदत करतात. सकाळी ६ ते संध्याकाळी ६ असं अविरत काम सुरू असतं. नैसर्गिकरित्या स्वतःपुरता भाजीपालाही ते पिकवतात. अजून काही वर्षात जमीन सुपीक होईल. मग पिकाला कुठलंही जैविक खत बाहेरून घालावं लागणार नाही. तेव्हा तयार होणारी स्ट्रॉबेरी आतापेक्षा अधिक चविष्ट असेल असं भिलार सांगतात. नैसर्गिक शेतीचे शेतीला, निसर्गाला आणि माणसाला होणारे फायदे अगणित आहेत. गावातले इतरही काही तरुण नैसर्गिक शेतीकडे वळत आहेत. गावातली शेती शाश्वत कशी करता येईल याचा विचार भिलार करत आहेत.

- संतोष बोबडे, सातारा

No comments:

Post a Comment