Sunday 3 March 2019

मेंदूची व्यायामशाळा

 मेंदूची व्यायामशाळा आणि त्यातील सापशिडी, अलेक्सा, झिरो बजेटमधून विज्ञान, पालघरच्या शाळेची परसबाग, हे 'आम्ही शिक्षणाचे वारकरी' मधले विशेष लोकप्रिय उपक्रम. राज्यातल्या उपक्रमशील शिक्षकांच्या ७०० उपक्रमांमधून निवडलेले ३५ आणि राज्य सरकारच्या विविध शैक्षणिक मंडळांचे १५, अशा एकूण ५० स्टॉलचं 'आम्ही शिक्षणाचे वारकरी, हे प्रदर्शन. नांदेडमध्ये १६ ते १८ जानेवारी दरम्यान हे प्रदर्शन भरलं होतं. मेंदूची व्यायामशाळामध्ये मेंदूला विचार करायला लावणारे विविध खेळ आणि सापशिडी. १० बाय १० च्या सापशिडीचं मैदानी रूप. वाईट सवयी, चुकीच्या गोष्टी केल्या तर साप खाऊन टाकतो. चांगलं, सकारात्मक काम केलं तर बक्षीस.

 जसं जंक फूड खाणं मुलांसाठी वाईट. त्यामुळे जंक फूड या क्रमांकावर आलं की साप गिळून टाकतो. शिस्त या क्रमांकावर आलं की प्रगतीची शिडी. नांदेडमधल्या जिल्हा परिषदेच्या मल्टीर्पपज हायस्कूलचा हा स्टॉल. एकावेळी ३० ते ४० मुलं हा खेळ खेळू शकतात. खेळाचे निर्माते बाळासाहेब कच्छवे यांनी खेळाबद्दल माहिती दिली.''मोबाईल, इंटरनेटच्या युगात मैदानी खेळ खेळण्याची वृत्ती कमी होत चालली आहे. हे लक्षात घेऊन या खेळाला मैदानी खेळाचं रूप दिलं. मुलांना चांगलं आणि वाईट कळावं हाही यामागचा हेतू.'' सापशिडीबरोबरच मेंदूला चालना देणारे स्टॉलवरच्या इतरही खेळांनी लोकांची मनं जिंकून घेतली. जवळपास १० हजार लोकांनी या स्टॉलचं कौतुक केलं. ''प्रत्येक मूल बुद्धिमान असतं पण या बुद्धीचा योग्य प्रकारे वापर कसा करावा, याचं तंत्र मुलांना, पालकांना माहित नसतं. हे तंत्र या स्टॉलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्याचं कच्छवे सर सांगतात. मुख्याध्यापिका दुर्गादेवी कच्छवे, राजाराम राठोड, नागोराव येवतीकर, शेख ईरफान या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून साकारलेला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम. याअंतर्गतच आम्ही शिक्षणाचे वारकरी उपक्रम. २०१५ पासून या उपक्रमाची सुरुवात झाली. यंदा जानेवारी महिन्यात नांदेडसह मुुंबई, कोल्हापूर, वर्धा, आणि जळगाव अशा पाच जिल्ह्याच्या ठिकाणी हा उपक्रम झाला. महिनाखेरीला जळगावमध्ये त्याचा समारोप झाला. या कार्यक्रमात मेंदूची व्यायामशाळा स्टॉलचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. शिक्षण विभागातील संचालक डॉ. सुनील मगर, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, वारी प्रमुख दत्तात्रय वाडेकर, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे स्वीय सहाय्यक डॉ. गजानन पाटील आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम जाणून घेण्याची संधी नांदेडकरांना मिळाली. त्यामुळे ही वारी शिक्षणक्षेत्रातील अभिनव जत्राच ठरली आहे.




- उन्मेष गौरकर, नांदेड

No comments:

Post a Comment