Monday 25 March 2019

दुष्काळात माणूस बनतो आधार (सदा आबाची एैका वाणी...भाग क्रमांक ६)

दुष्काळात समदीकडून अडचणी येतात. पण काही चांगलं बी घडतं आसपास. तुम्ही म्हणसाल ह्यो सदा आबा फकस्त नकारात्मक बोलतो. तर आता सांगतो एक सकारात्मक गोष्ट...
पुण्याच्या 'निरंजन' सेवाभावी संस्थेने दुष्काळी भागातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, गरजू आणि गरीब मुलांचे शैक्षणिक पालकत्त्व घ्यायाचं ठरीवलं. त्याचा लै लेकरांना आधार होणार हाये.
शिरूर कासार (जि.बीड) येथील जयेश कासट १९९७ साली व्यवसायासाठी पुण्याला गेले. व्यवसायात चांगला जम बसल्यावर तिथंच स्थायिक झाले. परंतु, त्यांस्नी गावचा लळा व्हताच. दुष्काळी परिस्थितीमुळे गावच्या शेतकऱ्यांची दैना जयेश यांना बघवत नव्हती. त्यांच्यासाठी काही करता येईल का असा विचार, प्रयत्न जयेश सतत करत.
यातून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना आधार देण्याचं त्यांनी ठरीवलं. जयेश यांनी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेऊन आधार व्हायाचं ठरीवलं. मंग काय पाहता पाहता विराज तावरे (बारामती), स्वप्नील देवळे (पुणे), अभय जाजू (सोलापूर), अतुल डागा (नगर), जगदीश मुंदडा (हडपसर), नवनीत मानधनी (धर्माबाद, नांदेड), ब्रम्हानंद लाहोटी, अमित गायकवाड, आनंद जाखोटीया, भरत लढे, प्रतिम जगताप (अमेरिका), रमेश तोष्णीवाल (लातूर) यांच्यासह ५० तरुण म्होरं आले. 'निरंजन'सेवाभावी संस्था स्थापून ७ वर्षांपूर्वी २०११ साली शिरूर कासार येथील २५ मुलांना दत्तक घेतले. गरजूंना दत्तक घेण्याचा ह्यो उपक्रम आत्तापर्यंत सुरू हाये. नगर जिल्ह्यातील १०० मुलांना दोन वर्षांपासून, पुणे जिल्ह्यामधील नांदगाव (ता. मुळशी) येथील पाच वर्षांपासून ६० मुले तर रायगड येथील ९८ शेतकऱ्यांच्या मुलांना सहा वर्षांपासून शैक्षणिक मदत ते देतायेत.  
२५ मुलांपासून सुरू केलेला हा उपक्रम ५०० मुलापर्यंत पोचला आहे. यंदा (२०१९) राज्यभरातील एक हजार मुलांना संस्था आधार देणार हाय. 'निरंजन'मधील सर्व सभासद पदरमोड करत हा उपक्रम राबवत आहेत. दत्तक घेतलेल्या मुलांना गणवेश, बूट, दप्तर, पुस्तके, वह्या आणि वर्षभर पुरेल इतके शैक्षणिक साहित्य देतात.
हमाल, मापाडी यांच्या मुलांसाठीही हे युवक काम करत आहेत. रायगड झेडपी शाळा हिरकणीवाडी शाळेतील ९८ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्त्व संस्थेने स्वीकारलं. गड, किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या गावांतील शेतकऱ्यांची मुलंही दत्तक घेऊन त्यांना आधार दिला जाईल, असं विराज तावरे यांनी सांगितलं. अनेक शेतकरी नैराश्यातून आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. त्यामुळे त्याच्या मागे असणाऱ्या कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकरी आत्महत्या थांबाव्यात यासाठी 'निरंजन' संस्थेकडून जनजागृती केली जाते. याशिवाय तंबाखूविरोधी जनजागृती रॅली, अस्थमा अवेरनेस कॅम्प, मधुमेह, ज्येष्ठ नागरिक आरोग्य जागृती, पोलिसांसाठी हास्ययोग तसेच पुण्यातील पोलिस स्टेशनमध्ये प्रथमोपचार पेट्यांचे वाटप, आळंदी देवस्थान पालखी सोहळ्यासोबत जाणाऱ्या दिंड्यांना प्रथमोपचार पेट्या, आरोग्य शिबिरे घेतली जातात, अशी माहिती त्यांनी दिली.
संस्थेचे अध्यक्ष जयेश कासट सांगतात, "ग्रामीण भागात दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. शेतकऱ्यांची मुलं शिकली तर त्या कुटुंबाचं भवितव्य बदलेल हा उद्देश ठेवून आम्ही आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील मुलं, शेतकऱ्यांची मुलं, अनाथांना मदत करतो. दरवर्षी विद्यार्थी संख्या वाढवत आहोत. यातून मानसिक समाधान मिळतं."
लोकहो, तुमास्नी या संस्थेच्या कार्यात खारीचा वाटा उचलायचा असलं तर जयेश कासट, (मो.क्र.8007884483) यांच्याशी संपर्क करू शकता. 
- सूर्यकांत नेटके, अहमदनगर

No comments:

Post a Comment