Monday 4 March 2019

चल चल, री मेरी रामपिआरी...

जिल्हा नाशिक. पाथर्डी फाट्याजवळचं नरहरी नगर. इथं राहणारे तीन हरहुन्नरी तरूण. सुनील बोराडे, सुशील बारी आणि शंतनू क्षीरसागर या तिघांनी तब्बल पाच महिन्याच्या परिश्रमानंतर एक 'परीस' तयार केला आहे. काय, नाही समजलं ना... अहो त्यांनी चक्क परीस नामकरण केलेली एक खरीखुरी स्पोर्टस् कार तयार केली आहे. आपण कायम इटालियन आणि फेरारी कार फक्त बघतच बसायची का...असा प्रश्न त्यांना नेहमी पडायचा. त्यातूनच तिघांनी एकत्र येऊन एक आविष्कारच घडविला आहे. सुनील हा बारावी झालेला घरची परिस्थिती बेताची. तर सुशील आणि शंतनू हे नुकतेच डिप्लोमा उत्तीर्ण. सुनीलच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली ही गोष्ट. तब्बल पाच महिने दिवस रात्र काम करून त्यांनी साकारली त्यांच्या स्वप्नातील एक कार. या कारचं डिझाईन भारतात कुठल्याही कारमध्ये दिसणार नाही. टाकाऊतून टिकाऊ चा उपयोग करून ही कार बनली आहे. या कारला त्यांनी मित्शूबिशी लान्सरचं मशीन बसविलं असून या कारची लांबी सतरा फूट आहे. तर उंची साडेतीन फूट. रुंदी पावणे सहा फूट. पेट्रोल वर चालणारी ही कार दहाचं एवरेज देते. या कार तयार करण्यासाठी त्यांना पाच लाख रुपये खर्च आला. अशा प्रकारच्या स्पोर्टस् कारची बाजारातली किंमत कोटीच्या घरात आहे. 

सुनील, सुशील आणि शंतनू तिघांचीही घरची परिस्थिती बेताची. त्यामुळे मित्रांकडून कर्ज घेऊन त्यांनी भांडवल उभारलं. तसंच क्राऊड फंडिंगमधूनही काही पैसे जमा केले. ‘ले मन रेसिंग कार’ बघून या कारचं डिझाईन सुचल्याचं ही मुलं सांगतात. साध्या रोडवर चालणारी या प्रकारातील ही एकमेव गाडी असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. या कारच्या यशस्वी निर्मितीनंतर आता कार कंपनी काढण्याचा त्यांचा विचार आहे. गाडी बनविण्यासाठी प्रथम स्केच, क्ले मॉडेल, फोटोशॉपमध्ये थ्रीडी रेन्डरिंग केले व एक मॉडेल अशा सगळ्या पायऱ्या त्यांनी पार पाडल्या. आणि मगच मॉडेल बघून त्यांनी खरीखुरी स्पोर्टस् कार तयार केली. लाल रंगात चमचमणाऱ्या या कारची रचना खूपच देखणी आहे. ‘ले मन रेसिंग कार’ला त्यांनी रेस ट्रॅकऐवजी साध्या रस्त्यावर चालणारा पर्याय देऊन वेगळेपणा दिला आहे.
- प्राची उन्मेष, नाशिक

No comments:

Post a Comment