Tuesday 5 March 2019

१८ व्या वर्षी आपल्याला पंतप्रधान निवडण्याचा अधिकार असतो... पण जोडीदार निवडण्याचा नाही!


श्वेता आणि महेश. दोघंही इंजिनिअर. २०११ मध्ये एका सामाजिक शिबिराच्या निमित्ताने त्यांची भेट झाली. श्वेता सध्या पुण्यात एका सोफ्टवेअर कंपनीत काम करते. तर, महेश BAIF पुणे येथे सिनिअर प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून काम पाहतो. मिळतेजुळते विचार, सामाजिक जाणीव, निसर्गाची आवड, त्याचं राहणीमान ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला, तेव्हा त्या दोघांना जाणवलं की, आपल्या नात्याच्या भविष्याचा विचार करायला हवा. त्यांचं एकमेकांसोबतच नातं हे ह्याच काही दिवसात आणखी उलगडत गेलं. २०१५ साली श्वेताचं शिक्षण पूर्ण झालं आणि नोकरीसाठी ती पुण्यात आली. या ५ वर्षाच्या काळात त्यांनी एकमेकांच्या घरी जाणं सुरू ठेवलं. त्यातून लग्नासाठी अनुकूल वातावरण तयार व्हावं, लग्न हा विषय घरात निघाल्यावर उगाच तांडव नको, हा ह्यामागचा हेतू. पुढं काय होईल, कसं होईल याचा विचार श्वेता-महेशने कधीच केला नाही. फक्त सकारात्मक विचार आणि प्रयत्न हेच धरून ते हे नातं पुढं नेण्याचा प्रयत्न करत होते.
२०१६ पासून दोघांनीही घरी लग्नाविषयी स्पष्टपणे बोलण्यास सुरूवात केली. एकदा, श्वेता सहजच बाबांना म्हणाली, “माझ्या मित्रांपैकी मी कोणासोबत लग्न करेन, असं तुम्हाला वाटतं? ” तिचे बाबा म्हणाले, “महेश! अजून कोण असणार?” आणि श्वेताने होकारार्थी मान हलवली.
आणि या लग्नासाठी पहिली श्वेताच्या घरच्यांची संमती मिळाली. मग श्वेताच्या आई वडिलांनी महेशसोबत लग्नाविषयी बोलण्यास सुरूवात केली. पण महेशच्या घरातून ह्या लग्नाला मान्यता नव्हती. महेशच्या घरून होकार आल्यानंतर लग्न व्हावं असं श्वेताच्या आईवडिलांना वाटत होतं. पुढे एक ते दीड वर्ष त्यांनी होकाराची वाट पाहिली. निदान दोघांच्या प्रेमासाठी तरी महेशच्या घरचे तयार होतील असं त्यांना वाटलं. पण परिस्थिती वेगळी होती. आपल्या मुलाचा जोडीदार हा खालच्या जातीचा आहे, म्हणून महेशच्या घरून लग्नाला विरोध होता. अजून किती दिवस थांबायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. २०१७ मध्ये लग्न करायचं अस त्यांनी ठरवलं. कागदपत्रं जमा करून कोर्टात दिली आणि केवळ 7 लोकांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीने लग्न लागलं. लग्नाचा एक फोटो महेशच्या घरी पाठवण्यात आला. घरातील लोकांना हे लग्न मान्य नव्हतं. श्वेताला असंख्य फोन येऊ लागले. शिव्या आणि रागाच्या शब्दांचा भडीमार करण्यात आला.
याविषयी श्वेता म्हणते, “वयाच्या १८ व्या वर्षी आपल्याला पंतप्रधान निवडण्याचा अधिकार असतो पण आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार नसतो.” त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. शेवटी, स्वतःच्या बचावासाठी काही दिवस लपूनही राहावं लागलं. पण असं किती दिवस? त्यांनी पुन्हा नव्याने संसाराला सुरवात केली.
दरम्यानच्या काळात महेशचे भावनिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न त्याच्या घरच्यांनी केला. पण महेश ठाम होता कारण श्वेताकडे तो एक माणूस म्हणून पाहत होता. दोघेही स्वतःच्या निर्णयावर ठाम होते.
१७ डिसेंबर २०१७ रोजी श्वेताच्या घरच्यांनी लग्न सार्वजनिकपणे करावं, हे ठरवलं. आंतरजातीय विवाह हे नेहमी चारचौघात होतात. त्याचा उत्सव होत नाही, तर हे लग्न एक उत्सव म्हणून साजरा करायची कल्पना महेश-श्वेताच्या डोक्यात आली. दोघंही वाईल्ड लाईफ फोटोग्राफर. त्यांच्या लग्नामध्ये त्यांनी स्वतः काढलेल्या फोटोचे प्रदर्शन ठेवलं. सोबतच गडचिरोली भागातील लोकांनी बांबूपासून बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शनही ठेवलं. पुण्यामध्ये ‘वायू’ नावाची एक संस्था आहे. घरातून निघणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून स्वयंपाकरीता लागणारा वायू तयार करण्यासाठी ही संस्था मदत करते. निसर्गासाठी उपयुक्त असा हा उपक्रमसुद्धा तिथे मांडण्यात आला. एकूणच, त्यांच्या या आंतरजातीय लग्नोत्सावला नैसर्गिक उत्सवाचं स्वरूप मिळालं. लग्नाला येणाऱ्या लोकांना फक्त जेवण लक्षात न राहता तीन नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या. दोघांनीही सगळ्यांसमोर आपलं मनोगत व्यक्त केलं. आज दोघेही त्यांच्या आयुष्यात सुखी आहेत.
त्यांच्या नात्याला ८ वर्ष आणि लग्नाला १ वर्ष झालं आहे. मात्र, अजूनही श्वेता सासरी गेलेली नाही. महेश घरी जातो. घरचे त्याच्यासोबत बोलतात. पण श्वेताशी नाही. पण, घरचे नक्कीच स्वीकारतील अशी आशा श्वेता आणि महेशला आजही आहे.

- विजय भोईर, पुणे

No comments:

Post a Comment