Monday 4 March 2019

सदा आबाची ऐका वाणी...पाणीबाणी (भाग तीन)

सदाआबा : मित्रांनो, आम्हा उसतोडीला आलेल्या माणसांची जशी दैना हाये, तशीच तऱ्हा गावाकडल्या लोकांचीबी. हंडाभर पाण्यासाठी इल्यान माळ भटाकावं लागतंय. कानडीमाळी (ता. केज) इथल्या महिलांचे पाण्यासाठी असेच हाल.. इथल्या बायनाबाई खाडे सांगत्याती, "दीड दोन काेसांहून पाणी आणावं लागतं, गावात पाण्याची सोय नाही, अजून टँकरही सुरु नाही म्हणून दोन चार वेळेला पाहुण्यांकडे जाऊन राहिलो आम्ही." तर गयाबाई राऊत म्हणत्यात "दोन घागरी पाण्यासाठी विहिरीवर ताटकळत बसावं लागतं." कमल खाडे यांस्नि आलेला अनुभव तर लै वंगाळ. त्यांनी सांगितलं, "सकाळपासून पाण्यासाठी भटकंती करायची, ज्याच्याकडे पाणी उपलब्ध आहे तोे पाण्यासाठी पैसे मागणार. कारण इतर लोक विकत पाणी घेेतात. आता हाताला काम नाही तिथं पाण्यावर पैसा खर्च करणार कसा ? ‘एकवेळ जेवायला नका देऊन पण पाणी द्या. अशी विनवणी कराया लागतीय."

बीड जिल्ह्यातला प्रत्येक गावात अशा अनेक कमलताई, बायनाबाई, गयाबाई हायेत. ज्यांची दिस पाण्याच्या शोधातून उगतो आन मावळतो बी पाणी शोधता शोधता...
‘दुष्काळवाडा’ अशी ओळख झालेल्या मराठवाड्यात औंदा स्थिती भयानक हाये. बीड जिल्ह्यात ऑक्टोबर पासूनच पाण्याचा ताप सुरू झालाय. अजून तर कडक उन्हाळ्याचा मार्च, मे महिना उजडायचा हाय. पाण्यासाठी आता वाद होणार हायेती. आमचे एसपी जी.श्रीधर म्हणत्यात, "येत्या काही दिवसांत पाण्यासाठी होणारी भांडणे राेखणे आमच्यासाठी आव्हान असणार आहे, पाण्याच्या वादातून जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचीच काळजी घ्यावी लागत आहे." साहेबांचंबी खर हाय, कुठंच पाणी नाय.
माणसांनाच पाणी नाही तिथे जनावरांचा तर विचारच नग. चारा अाणि पाण्याच्या टंचाईमुळे पोटच्या पोरापरीस जपलेले पशूधन कवडीमोल भावात विकावे लागत आहे. नेकनूर आणि हिरापूर (जि.बीड) हे जिल्ह्यतीन दोन्ही पशूंचे बाजार सध्या फुल्ल आहेत. दुष्काळाने अस आमचं जगणं अवघड केलंय.
-------
पूरक माहिती : बीड जिल्ह्यात यंदा ३३४ मिमि म्हणजे सरासरीच्या ५० टक्के पाऊस झाला. मांजरा आणि माजलगाव हे दोन मोठे प्रकल्पसुद्धा मृत साठ्यात आहेत. लघु पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात आजघडीला ६३ प्रकल्प मृतसाठ्यात आहेत तर ६० पूर्णत: कोरडे पडलेत. ०४ प्रकल्प ५० टक्केच उरलेत ०५ प्रकल्प २५ टक्के तर तर १२ प्रकल्पांत पाणीसाठा २५ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. ते किती दिस पुरणार हा सवालच आहे.
१७० टँकर सुरू केले आहेत मात्र अनेक गावांना अद्यापही टँकर मिळालेले नाही. कारखाने बंद झाल्यानंतर मजूर परतले की टंचाई झळा आणखी तीव्र होतील.
- अमोल मुळे, बीड.

No comments:

Post a Comment