Thursday 14 March 2019

..आणि लग्नाची ‘मनीषा’ पूर्ण झाली!

१९७०-८० च्या दशकात मुलंमुली एकमेकांशी फारसं बोलतही नसत. प्रेमात पडणं हा गंभीर सामाजिक गुन्हा होता. त्यातही हे प्रेम आंतरजातीय असेल तर त्याचं रूपांतर लग्नात होण्याची शक्यता फारच कमी. पण संघर्षापेक्षा सामोपचारानं अनेक गोष्टी साध्य होतात.
नागपूर इथल्या शेवाळकर डेव्हलपर्स लिमिटेडचे आशुतोष आणि मनीषा शेवाळकर यांचीही लग्नगोष्ट अशीच हटके आहे.
आशुतोष यांनी नागपूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमधून डिप्लोमा केला आणि नोकरीकरिता ते यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी इथं आले. तिथे जयस्वाल कुटुंबातील त्यांचा एक मित्र होता. त्याच्या घरी येणंजाणं व्हायचं. तिथेच आशुतोष आणि मनीषा यांनी एकमेकांना पाहिलं. २२ एप्रिल १९८१ ला आशुतोषनी मनीषाजवळ प्रेमाची कबुली दिली. तेव्हा मनीषा १७ वर्षाच्या तर आशुतोष २० वर्षाचे होते.
"मनीषा मित्राची बहीण असल्यानं प्रेम व्यक्त कसं करायचं हे दडपण होतं." आशुतोष आपली लग्नगोष्ट सांगतात. "शिवाय ती कलार समाजातील आणि मी ब्राह्मण. त्यांच्या कुटुंबाचा दारू आणि औषधीचा व्यवसाय. तिचं कुटुंब अत्यंत श्रीमंत. त्या तुलनेत मी मध्यमवर्गीय. माझे वडील प्राचार्य राम शेवाळकर. साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात नाव असलेलं व्यक्तिमत्त्व. दोन्ही कुटुंबातील या आर्थिक, सामाजिक विषमतेसोबतच आमच्या प्रेमात जात आडवी येण्याची शक्यता होतीच. तरीही मी तिला प्रपोज केलंच. तिनंही मला स्वीकारलं. पण लगेचच लग्न करणं शक्य नव्हतं. थोडं स्थिरस्थावर होईपर्यंत वाट बघण्याचा निर्णय घेतला. प्रेमात पडल्यानंतर लग्न होईपर्यंतचा तो मधला काळ आम्हाला एकमेकांना समजून घेण्यासाठी मिळाला. आमच्या यशस्वी संसाराचं कारण म्हणजे जवळपास सहा वर्ष आमच्यात चाललेलं कोर्टिंग.
त्यावेळी वारंवार भेटी, बोलणं हे शक्यच नव्हतं. जे काही व्यक्त व्हायचं ते पत्रातूनच. लिहिलेलं पत्र तिच्यापर्यंत पोहचवायलासुद्धा १५-१५ दिवस वाट पाहावी लागे. जवळपास कपाटभर पत्र मी तिला त्या काळात लिहिली.
हळूहळू आमच्या प्रेमप्रकरणाबद्दल दोघांच्याही कुटुंबाला कळलं. तेव्हा दोन्ही कुटुंबातून आमच्या प्रेमाला विरोध झाला. परंतु माझ्या घरून फारसा विरोध झाला नाही. त्याचं कारण माझ्या आई-वडिलांचाही प्रेमविवाह होता. तो आंतरजातीय विवाह नसला तरी त्याला देशस्थ-कोकणस्थ ब्राह्मण अशी किनार होतीच. मी प्रेमात पडलो याची माझ्या कुटुंबियांना काळजी नव्हती. पण माझे आजोबा अत्यंत कर्मठ होते. शिवाय हभप म्हणून त्यांचा लौकीक होता. त्यांना हा आंतरजातीय विवाह मान्य झाला नसता. त्यांचं मन कसं वळवायचं, हा कुटुंबियांसमोर मोठा प्रश्न होता. मनीषाच्या कुटुंबात तिच्या आईचा आमच्या लग्नाला प्रखर विरोध होता. आता त्याच कुटुंबात मला त्यांचा जावई नाही, तर मुलगा मानतात.
 मी आंतरजातीय विवाह करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांनी मला त्यावेळच्या प्रथेप्रमाणे पळून जाऊन लग्न करण्याचा सल्ला दिला. परंतु मला धुमधडाक्यात, सर्वांसमोर लग्न करायचं होतं. अखेर ६ वर्षांनी तो दिवस उजाडला. २२ एप्रिल १९८७ ला सकाळी ६ वाजता आम्ही दोघे दोन्ही कुटुंबातील सदस्यांसह शेकडो आप्तेष्ट, स्नेही यांच्या साक्षीनं बोहल्यावर चढलो. मागणी घातल्याची तारीख २२एप्रिल असल्यानं त्याच तारखेला लग्न करण्याचं आम्ही ठरवलं होतं. आम्ही दोघे, आई, दोन मुली, एक मुलगा असं आमचं कुटुंब आहे. माझ्या व्यवसायात मनीषाचं पाठबळ असतं , मात्र हस्तक्षेप नसतो. ती मुलींसाठी नागपुरात होस्टेल चालविते."
आपल्या यशस्वी वैवाहिक आयुष्याचं श्रेय आशुतोष आणि मनीषा एकमेकांवरील खऱ्या प्रेमाला देतात. "मनापासून प्रेम असेल तर एकमेकांना सांभाळून घेण्याची मानसिकता राहते. निव्वळ शारिरिक आकर्षणातून प्रेमात पडलं तर असे विवाह फार काळ टिकत नाहीत. जगात परिपूर्ण कोणीच नसतं. प्रेम असलं की दोष पचवले जातात." आशुतोष-मनीषा सांगतात.
-नितीन पखाले. #लग्नगोष्टी

No comments:

Post a Comment