Thursday 14 March 2019

संसार जोडणारी ‘सखी’

“काही कारणांमुळे आमच्यात गैरसमज झाले, कुरबुरी वाढल्या, संवाद खुंटला आणि आमचा सुखी संसार थेट घटस्फोटापर्यंत आला. पोलीस अधीक्षक कार्यालयातील सखी सेलकडे मी याबाबत मदत मागितली. अर्ज दिला. दोन तीन वेळा आम्हा दोघांना बोलावून कर्मचाऱ्यांनी समुपदेशन केलं. गैरसमजाच्या मुद्यांचं निराकरण केलं आणि तुटत चाललेला आमचा संसार व्हॅलेंटाईन वीकमध्ये पुन्हा जुळून आला”, हे सांगताना मीरा हावळे यांना अश्रू अनावर झाले होते. अर्थात संसार जुळल्याचे हे आनंदाश्रू होते. मीरा यांच्यासारख्या तब्बल १५० जोडप्यांच्या तुटणाऱ्या रेशीमगाठी या सखी सेलने मागच्या वर्षभरात जोडल्या आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून २०१८ मध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयात विविध स्वयंसेवी संस्था, वकील, डॉक्टर्स यांची स्वयंसेवक म्हणून मदत घेत सखी सेल सुरू करण्यात आला. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर म्हणाले, किरकोळ कारणांवरून संसार तुटतात, छळाचे गुन्हे नोंद होतात, दोन कुटुंबात कलह निर्माण होतो, अनेकदा प्रकरण हातघाईवर येऊन मारहाणीचे गुन्हे घडतात तर कधी कधी खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात याची परिणीती होते. सामाजिक, आर्थिक त्रास दोन्ही कुटुंबांना होतो. शिवाय, आई वडिलांच्या वादात मुलांची होरपळ होते, त्यांच्याही मनावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे हे संसार जोडण्याचे काम महत्वाचे आहे. राज्यात नागपूरमध्ये ‘भरोसा’, नगरमध्ये ‘दिलासा’ सेल कार्यरत आहेत. यासाठी शासनस्तरावरून अनुदान मिळते. पण बीड पोलिसांनी शासनाच्या अनुदानाशिवाय सखी सेल सुरू केला आहे. वर्षभरात दीडशे पेक्षा अधिक संसार जोडण्यात या सेलला यश मिळालं आहे. राज्याच्या अपर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांनीही या उपक्रमाचं कौतुक केलं.
समुपदेशनानंतर संसार जोडलेल्या जोडप्यांना पुन्हा नव्याने संसारासाठी शुभेच्छाही देण्यात येतात. हा कार्यक्रमही अनोखा असतो. जोडप्याला व्यासपीठावर बोलावले जाते, सर्वांसमोर पती पत्नीला गुलाबाचे फुल देत झाले गेले विसरून जाण्यास सांगतो. पत्नीही आनंदाने गुलाब स्विकारते. यानंतर पोलीस दलाकडून मान्यवरांच्या हस्ते साडीचोळी व कपडे असा आहेर करून या जोडप्याला नव्याने ‘नांदा सौख्यभरे’ शुभेच्छा दिल्या जातात.
- अमोल मुळे, बीड

No comments:

Post a Comment