Monday 4 March 2019

शिक्षणसंस्कृतीचे सहृदय 'वाहक'

मिठ्ठू आंधळे त्यांच्या गावी आले असतानाची गोष्ट. एकदा गेवराईजवळच्या आठवडी बाजारात शंकर तेली नावाचा विद्यार्थी पुस्तकं विकत बसलेला आम्हांला दिसला. आंधळेंची आणि त्याची ओळख होती. हा गेवराईजवळच्या गरीब वस्तीत राहणारा गरजू मुलगा. शंकर गेवराईच्या महात्मा फुले शाळेत शिकतो. शंकरकडून समजलं की त्याच्या वस्तीत सुमारे 40-45 मुलं आहेत, जी कधीच शाळेत गेलेली नाहीत.
शाळेत कधीच न गेलेली 45 मुलं! हे आम्हांला फार मोठं आव्हान वाटलं. सर्वेक्षणासाठी थेट वस्तीत जाऊन पालकांशी बोलायचं आम्ही निश्चित केलं, त्या आधी राहुल आंधळेंनी वस्तीला भेट देऊन मुलांना खाऊ दिला आणि काही माहितीही काढली, जी आमच्यासाठी खूप उपयोगाची होती. गेवराई -बीड राष्ट्रीय महामार्गापासून 2-3 किमी आत नाथजोगी- बहुरूपी समाजाची वस्ती आहे. शंकर याच वस्तीवरून शाळेत येतो. हे लोक सोलापूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून बीडमध्ये स्थलांतरित झाले आहेत. खरा व्यवसाय बहुरूपी करामतींचा, पण आजकाल तो करून पैसे मिळत नाहीत म्हणून यांनी नवा व्यवसाय सुरू केला आहे, देव-देवता, महापुरूष यांचे फोटो, धार्मिक आणि इतर जनरल नॉलेजसारखी पुस्तकं, नकाशे, कॅलेंडर विकण्याचा. 
जुन्या- पान्या गोधड्यांपासून तयार केलेल्या पालांमध्ये राहणार हे लोक. शंकर सोडला तर वस्तीतील अनेकांना शिक्षणाचा गंध नाही. शिक्षणाचा वाराही नसलेली ही मुलं बाजारात मात्र पुस्तकं विकून एकप्रकारे ज्ञानदानाचंच काम करतात, हे ऐकून पोटात तुटलं. तेलुगुसदृश मराठी बोलणाऱ्या या वस्तीत आम्ही शिरलो. मुलांशी अनौपचारिक ओळख करून घेतली, त्यांना खाऊ दिला आणि शाळेत येणार का? असं विचारलं. हे विचारताच मुलं उड्या मारू लागली, ‘शाळा, शाळा, लय आवडते, शाळेत येणार’ असं ओरडू लागली. शाळेत प्रत्यक्ष न येताच शाळेचं नाव ऐकून आनंदी झालेली ही मुलं पाहून आमचे डोळे पाणावले.
यानंतर आम्ही मोर्चा वळविला या मुलांच्या पालकांकडे! “शिकण्याच्या वयात मुलांकडून काम करवून घेऊ नका, त्यांची शिकायची इच्छा आहे, तर त्यांना शिकू द्या, चांगले शिक्षण घेतल्यानेच मुलांचे पुढचे आयुष्य सुखात जाईल” असे आम्ही त्यांना कळकळीने समजावू लागलो.” मुलांना साळंत पाठवायला आवडेल, पण साळा लय दूर, रोडचं- गाड्यांचे भ्या वाटतं” त्यांचे आई- बाप सांगत होते. पालकांची भीतीही रास्त होती, राष्ट्रीय महामार्गावर खूप वर्दळ आहे. पण आम्ही यावर नक्की काहीतरी उपाय करू, तुम्ही मुलांना शाळेत मात्र पाठवा अशी विनंती करून आम्ही वस्ती बाहेर आलो.
पालकांच्या समस्येवर पुण्यातील विद्या प्राधिकरणातील समता विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून उपाय शोधला. सांगायला आनंद वाटतो की भारताच्या 72 व्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट 2018 रोजी ही सर्व 42 बालके आम्ही जिल्हा परिषद कन्या प्रशाला, गेवराई येथे दाखल केली आहेत. आयुष्यात कधीच शाळेचे तोंडही न पाहिलेल्या या 42 मुलांना स्वातंत्र्यदिनी खऱ्या अर्थाने जगण्याचे आणि शिकण्याचे स्वातंत्र्य मिळवून देण्यात आमचा थोडाफार हातभार लागला, याचा खूप आनंद वाटतोय.
- प्रवीण काळम- पाटील, शिक्षण विस्ताराधिकारी, पंचायत समिती गेवराई, जिल्हा बीड.
 

राहुल आंधळे यांच्या शैक्षणिक कार्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा: http://samata.shiksha/mr/rahul-andhale-kind-conductor/

No comments:

Post a Comment