Monday 4 March 2019

बालगृहातील अनाथ सुनीता बोहल्यावर चढली...


चि.सौ.कां.सुनीताचा शुभविवाह १५ फेब्रुवारी २०१९ रोजी पार पडला.दहा वर्षांपूर्वी ही सुनीता धुळ्यातल्या श्री संस्कार बालगृहात दाखल झाली. त्यावेळीच ती सौम्य मतिमंद असल्याचं निदान झालं होतं. हळूहळू तिच्या दैनंदिन हालचाली आणि व्यावहारिक वर्तणुकीत सुधारणा होऊ लागली. तिचं लग्नाचं वय आलं आणि बाकी पालकांप्रमाणेच संस्थाचालकांनी तिच्या विवाहसंदर्भात हालचाली सुरू केल्या. आधी त्यांना मानसोपचारतज्ञांनी सांगितलं की, सुनीता विवाह करू शकते, सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे संसार करू शकते. लगेचच वरसंशोधन सुरू झालं.

योगायोगाने धुळे तालुक्यातीलच फागणे येथील सुकलाल शर्मा यांनी त्यांच्या मुलाचा, वैभवचा विवाह सुनीतासोबत करण्यासाठी दीड वर्षांपूर्वी संस्थेकडे अर्ज सादर केला होता. बालगृहाची लग्न जुळवण्याची नियमानुसार प्रक्रिया असते. त्यानुसार बालगृहाच्या अध्यक्षा मंगला वाघ यांच्यासह शिक्षकसमितीची नेमणूक, मुलाच्या परिवाराची माहिती मिळवणं, विवाहाचा प्रस्ताव बालकल्याण समितीकडे पाठवणं, मुलाच्या चारित्र्यपडताळणीचा दाखला घेणं वगैरे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नेमलेल्या समितीने सकारात्मक अहवाल दिल्यावर विवाहास अंतिम मंजुरी मिळाली.
मुलगा वैभव हा खाजगी संस्थेत नोकरीस असून तो सुनीतासाठी योग्य असल्याचं सगळ्यांना जाणवलं. सुनीता अनाथ. व्हॅलेंटाईन डेच्या दुसऱ्या दिवशी शहरातील शाहू महाराज नाट्यमंदिरात सुनीताचा विवाह पार पडला. या विवाहाच्या निमंत्रण पत्रिका छापल्या होत्या. त्यात पालक म्हणून श्री संस्कार बालगृहाचा उल्लेख होता. असं करून, तिच्या पुनर्वसनासाठी झटणारे संस्थाचालक सुनील वाघ यांनी समाजात नवा आदर्श घालून दिला आहे.  सुनील म्हणतात, “सुनीताचा विवाह पार पाडून आम्ही जबाबदारीतून मुक्त होत असलो तरी संस्कार बालगृहात तिचं माहेरपण कायम जपलं जाईल. विवाहानंतरही आईवडिलांची सर्व कर्तव्यं आम्ही पार पाडू.” सुनीताच्या विवाहासाठी संस्थेचे कर्मचारी सध्या आर्थिक मदत गोळा करत आहेत. जमा होणाऱ्या निधीतून एक लाख रुपये फिक्स डिपॉझिट सुनीताच्या नावे केलं जाणार आहे. सुनीता आणि वैभव यांना आपणही म्हणूया: नांदा सौख्यभरे. 


- चेतना चौधरी, धुळे

No comments:

Post a Comment